भारत, अमेरिकेच्या विमानवाहक नौकांसह अरबी समुद्रात मलबार युद्धाभ्यास

Malabar Naval Exercise 2020 2nd phase भारत, अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया या चार देशांचे नौदल संयुक्तपणे १७ ते २० नोव्हेंबर या कालावधीत गोव्याजवळ अरबी समुद्रात मलबार २०२० युद्धाभ्यास करणार

Malabar Naval Exercise 2020 2nd phase
भारत, अमेरिकेच्या विमानवाहक नौकांसह अरबी समुद्रात मलबार युद्धाभ्यास 

थोडं पण कामाचं

  • भारत, अमेरिकेच्या विमानवाहक नौकांसह अरबी समुद्रात मलबार युद्धाभ्यास
  • भारत, अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया गोव्याजवळ अरबी समुद्रात करणार युद्धाभ्यास
  • १७ ते २० नोव्हेंबर या कालावधीत होणार युद्धाभ्यास

नवी दिल्ली: भारत (India), अमेरिका (United States of America - USA), जपान (Japan) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) या चार देशांचे नौदल संयुक्तपणे १७ ते २० नोव्हेंबर या कालावधीत मलबार २०२० युद्धाभ्यास (Malabar Exercise) करणार आहे. युद्धाभ्यासाच्या या दुसऱ्या टप्प्यात सहभागी होणार असलेल्या युद्धनौका, विमान, हेलिकॉप्टर यांच्या ताफ्याची माहिती जाहीर करण्यात आली. (Malabar Naval Exercise 2020 2nd phase Here's everything you need to know) 

मलबार २०२० युद्धाभ्यासाचा दुसरा टप्पा १७ ते २० नोव्हेंबर या कालावधीत गोव्याजवळ अरबी समुद्रात (Arabian sea) पार पडेल. याआधी पहिला टप्पा ३ ते ६ नोव्हेंबर या कालावधीत बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) विशाखापट्टणम (Visakhapatnam) बंदराजवळच्या समुद्रात पार पडला.

युद्धाभ्यासाच्या दुसऱ्या टप्प्यात भारताची विक्रमादित्य आणि अमेरिकेची निमित्झ या दोन विमानवाहक युद्धनौका युद्धाभ्यासात सहभागी होतील. तसेच दोन्ही विमानवाहक नौकांसोबत समुद्रात वावरणारा युद्धनौका, पाणबुड्या, हेलिकॉप्टर, टेहळणी विमाने आणि लढाऊ विमाने यांचा ताफा युद्धाभ्यासात सहभागी होईल. ऑस्ट्रेलिया आणि जपानच्या युद्धनौकाही युद्धाभ्यासात सहभागी होतील. भारताकडून मिग २९ लढाऊ विमानांचा ताफा तर अमेरिकेकडून एफ १८ लढाऊ विमानांचा ताफा आणि ईटूसी हॉकआय युद्धाभ्यासात सहभागी होणार आहे. समुद्रावरील तसेच खोल पाण्यातील पाणबुड्यांच्या युद्धांचा सराव या युद्धाभ्यासात होईल. भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान समुद्रातील मोठ्या युद्धाच्या दृष्टीने एकमेकांशी समन्वय राखण्याचा सराव करतील.

भारताकडून विक्रमादित्य या विमानवाहक युद्धनौकेव्यतिरिक्त कोलकाता आणि चेन्नई या दोन विनाशिका, रडारपासून स्वतःचे अस्तित्व लपवणारी तलवार फ्रिगेट, मालवाहक जहाज दीपक तसेच या सर्व जहाजांवरील विमान आणि हेलिकॉप्टरचा ताफा युद्धाभ्यासात सहभागी होणार आहे. खांदेरी ही स्वदेशी पाणबुडी आणि पी ८ आय हे टेहळणी विमानही भारताकडून युद्धाभ्यासात सहभागी होणार आहे. नौदलाच्या पश्चिम तळाचे प्रमुख आणि ध्वजाधिकारी रिअर अॅडमिरल कृष्णा स्वामिनाथन मलबार युद्धाभ्यासाच्या दुसऱ्या टप्प्याचे नेतृत्व करतील. 

अमेरिकेकडून निमित्झ या विमानवाहक युद्धनौकेव्यतिरिक्त क्रूझर प्रिंसटन, विनाशिका स्ट्रेट, पी ८ ए टेहळणी विमान युद्धाभ्यासात सहभागी होणार आहे. ऑस्ट्रेलियाकडून लांब पल्ल्याची बॅलरेट फ्रिगेट आणि एम एच ६० हे हेलिकॉप्टर मलबार २०२० युद्धाभ्यासात सहभागी होणार आहे. जपानही मलबार २०२० युद्धाभ्यासात सहभागी होणार आहे. युद्धाभ्यास सुरू असताना अरबी समुद्र आणि इराणचे आखात (पर्शियन आखात) या परिसरात भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांच्या ७० नौकांच्या मदतीने समुद्रातील प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवले जाईल.

नौदलाच्या मलबार युद्धाभ्यासासाठी भारत आणि अमेरिका यांच्यात १९९२ मध्ये करार झाला. या करारानुसार नियमितपणे भारत आणि अमेरिकेचे नौदल मलबार युद्धाभ्यास संयुक्तपणे करत होते. या युद्धाभ्यासात जपान २०१५ मध्ये पहिल्यांदा सहभागी झाला. यंदा ऑस्ट्रेलियाही या युद्धाभ्यासात सहभागी होणार आहे. मलबार युद्धाभ्यासाच्या निमित्ताने पहिल्यांदाच चतुष्कोनी (चतुर्भुज) सुरक्षा संवादाचे अर्थात क्वाडचे (Quadrilateral Security Dialogue - QSD or QUAD) सदस्य असलेल्या भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या चार देशांचे नौदल संयुक्त युद्धाभ्यास करणार आहे. 

युद्धाभ्यासाच्या निमित्ताने क्वाडचे सदस्य असलेले देश थेट चीनला संदेश देणार आहेत. चीन कृत्रिम बेटांची निर्मिती करुन तसेच पाकिस्तानच्या मदतीने भारताला चहूबाजूने घेरण्याचा प्रयत्न करत आहे. या प्रयत्नांना चोख प्रत्युत्तर म्हणून क्वाडचे सदस्य बंगालच्या उपसागरात तसेच अरबी समुद्रात मलबार युद्धाभ्यास करणार आहेत. या निमित्ताने क्वाडचे सामर्थ्य दाखवून देत चीनला स्पष्ट इशारा दिला जाईल. विस्तारवादी चीनची कृती त्याला क्वाडशी टक्कर घेण्यास भाग पाडेल आणि तसे झाले तर ते चीनसाठी महाग पडेल हा इशारा युद्धाभ्यासातून देण्याचा प्रयत्न असेल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी