Mamta Modi Meeting : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आज भेटणार पंतप्रधान मोदींना, ‘हे’ आहे मुख्य कारण

भाजपच्या कट्टर राजकीय विरोधक असणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या पंतप्रधान नरेंद्र मोदींची दिल्लीत भेट घेणार आहेत.

Mamta Modi Meeting
ममता बॅनर्जी पंतप्रधान मोदींना भेटून करणार महत्त्वाची मागणी  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दिल्ली दौऱ्यावर
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेणार भेट
  • द्रौपदी मुर्मू, सोनिया गांधी यांनाही भेटणार

Mamta Modi Meeting : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (West Bengal Chief Minister Mamta Banarjee) आज (शुक्रवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट (Meeting) घेणार आहे. गुुरुवारपासून दिल्ली दौऱ्यावर असणाऱ्या ममता बॅनर्जी या आजच्या दिवसात दिल्लीत अनेक महत्त्वाच्या गाठीभेटी करणार असून पक्षाची पुढची रणनिती ठरवण्यासाठी आजचा दिवस महत्त्वपूर्ण असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कट्टर राजकीय विरोधक असणाऱ्या ममता बॅनर्जी आज त्यांना भेटणार असल्यामुळे या भेटीबाबत उत्सुकता वाढली आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर मोदी आणि ममता बॅनर्जी यांच्यात एक प्रकारे संघर्षाचं वातावरण निर्माण झालं होतं. भाजपला पराभूत करून पश्चिम बंगालमध्ये तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपद मिळवलेल्या ममता बॅनर्जी या राज्यातील काही महत्त्वाच्या प्रश्नांसंदर्भात पंतप्रधानांची भेट घेणार आहेत. 

भेटीगाठींचा दिवस

पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्यानंतर ममता बॅनर्जी या काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांचीदेखील भेट घेण्याची शक्यता आहे. सोनिया गांधींची सध्या नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीकडून चौकशी सुरू असून त्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रपतीपदी निवडून आल्याबद्दल द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन त्यांचं अभिनंदनही ममता बॅनर्जी करण्याची शक्यता आहे. त्यानंतर रविवारी होणाऱ्या निती आयोगाच्या एका बेठकीला त्या हजेरी लावणार आहेत. द्रमुक, टीआरएस आणि आम आदमी पक्षाच्या काही नेत्यांसोबतही ममता बॅनर्जी यांची बैठक होण्याची शक्यता आहे. 

जीएसटीसंदर्भात पंतप्रधानांशी चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची बैठक आज नियोजित असून राज्यांना मिळणारा जीएसटीचा वाटा हा या बैठकीतील चर्चेचा प्रमुख विषय असणार आहे. त्याचप्रमाणे बीएसएफबाबतच्या धोरणावरही त्या पंतप्रधान मोदींशी चर्चा कऱण्याची शक्यता आहे. 

अधिक वाचा - Breaking News 05 August 2022 Latest Update: कर्ज पुन्हा महागण्याची शक्यता, आरबीआय आज पतधोरण जाहीर करणार

तृणमूलच्या खासदारांसोबतही बैठक

दरम्यान, गुरुवारी तृणमूल पक्षाच्या खासदारांसोबत मुख्ममंत्री आणि पक्षाध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी बैठक घेऊन चर्चा केली. पावसाळी अधिवेशात पक्षाची आगामी रणनिती कशी असावी, याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्याचप्रमाणे 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आगामी रणनितीवरही या बैठकीत चर्चा झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ममता बॅनर्जी यांचे भाचे आणि तृणमूल काँग्रेसचे महासचिव अभिषेक बॅनर्जी यांनीही या बैठकीत खासदारांना मार्गदर्शन केलं आणि पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या काही दिवसांत कुठल्या मुद्द्यांवरून सरकारला घेरावं, याबाबतचे काही प्रस्ताव मांडले. 

अधिक वाचा - CJI रमणांचा ठरला उत्तराधिकारी!, जाणून घ्या कोण आहे उदय लळित जे बनू शकतात सरन्यायाधीश

शिक्षक भरती घोटाळ्यावरून वाद

ममता बॅनर्जी सरकारमध्ये गेल्या वेळी शिक्षणमंत्री असलेले पार्थ चॅटर्जी सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. शिक्षण भरती घोटाळा प्रकऱणी आतापर्यंत ईडीनं टाकलेल्या धाडीत त्यांच्या निकटवर्तीयांकडे कोट्यवधी रुपयांची बेनामी मालमत्ता सापडली आहे. त्यावरून चॅटर्जींना पक्षातून काढून टाकण्याचा निर्णय बॅनर्जी यांनी घेतला होता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी