कुटुंबातील ४ सदस्यांच्या प्रवासासाठी ‘त्याने’ विमान घेतलं भाड्याने

लोकल ते ग्लोबल
Updated May 29, 2020 | 17:04 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Man Hired Aeroplane For his Family: भोपाळमधील एका व्यक्तीने बायको, मुलगी आणि सासू यांना दिल्लीला जाण्यासाठी १८० आसनक्षमतेचे एअरबस A-३२० हे विमान भाड्याने घेतले.

Man Hired 180 Seating Capacity Aeroplane For 4 Family Members
प्रतिकात्मक फोटो  |  फोटो सौजन्य: Representative Image

थोडं पण कामाचं

  • भोपाळमधील एका व्यक्तीने कुटुंबातील चार सदस्यांस्यांच्या प्रवासासाठी भाड्याने घेतले विमान
  • १८० आसन क्षमता असलेल्या विमानातून अवघ्या चार जणांचा प्रवास
  • भोपाळ ते दिल्ली प्रवासासाठी विमान भाड्याने घेतलं

नवी दिल्ली: लॉकडाऊनच्या या काळात कोणतीही व्यक्ती काहीही करुन स्वत:च्या घरी पोहचू इच्छिते. त्यासाठी वाटेल ती किंमत मोजण्यासाठी तो तयार असतो. देशभरात लॉकडाऊनच्या स्थितीमुळे अनेक मजूर स्वत:च्या मुलांना घेऊन कडक उन्हात पायी चालतांना दिसून येत आहेत. तर भोपाळ मधील एका व्यक्तीने कुटुंबातील ४ सदस्यांसाठी तब्बल १८० आसन क्षमता असलेले A-३२० हे विमान भाड्याने घेतले आहे.
 
भारताच्या पश्चिम विभागात असलेल्या एका विमान निर्मीती कंपनीकडून हे विमान भाड्याने घेण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बाजारभावानुसार या विमानाची किंमत १० लाख रुपये असू शकते. मात्र या बाबत अधिकृतरित्या कुठलीही माहिती देण्यात आली नाही. माध्यमातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या विमानाने दिल्लीहून सकाळी ९.०५ मिनिटांनी केवळ एका चालकासह उड्डाण केले. १०.३० वाजता हे विमान भोपाळच्या राजा भोज विमानतळावर पोहचले. नंतर ११.३० वाजता या विमानाने चार यात्रेकरुंसह उड्डाण केले आणि १२.५५ वाजता दिल्लीला पोहचले. भोपाळमधील एका व्यक्तीने कुटुंबातील व्यक्तींसाठी हा शाही थाट केला होता. सर्वसामान्य लोक कोणत्याही मार्गाने घरी पोहचण्यासाठी धडपड करत आहेत. विशेषत: मजूर शक्य होईल त्या मार्गाने घरी पोहचण्याचा प्रयत्न करत आहेत. औरंगाबाद जवळील करमाड बदनापूर दरम्यान ८ मे रोजीच्या पहाटे रेल्वेच्या मालगाडीने धडक दिल्याने १६ मजुरांचा मृत्यू झाला होता. तर मध्य प्रदेशात सिंमेट क्राँकिट मिक्स करण्याच्या टँकरमधून काही मजूर प्रवास करत असल्याची बाब समोर आली होती. सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात स्वगृही आणि स्वराज्यात परतण्यासाठी अनेक मजूर धडपड करतांनाचे चित्र मोठ्या प्रमाणावर समोर येत आहे. अनेक रेल्वे आणि रस्ते अपघातही मोठ्या प्रमाणावर घ़डले. 

चार्टर विमान भाड्याने घेण्याचे प्रमाण वाढतेय 

एअरबस ए३२० या विमानात एकावेळी १८० प्रवासी बसू शकतात. सध्या जगभरात कोरोना व्हायरसचा फैलाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. त्यामुळे अनेक श्रीमंत लोक आणि काही कंपन्या सध्याच्या काळात इतर प्रवाशांसोबत प्रवास करु इच्छित नाही. त्यामुळे सध्याच्या काळात मोठ्या प्रमाणावर एअरलाईन्स कंपन्या आणि चार्टर विमान कंपन्यांकडून चार्टर विमान खरेदी करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. यासाठी अनेक लोक जास्तीचे पैसे मोजण्याची देखील तयारी दर्शवत आहेत. तर कोरोना व्हायरसच्या प्रादूर्भावामुळे देशभर मागील दोन महिन्यांपासून लॉकडॉऊन जाहीर करण्यात आला होता. २५ मे पासून देशांतर्गत मालवाहू आणि विमान वाहतूक सेवा सुरू करण्यात आली आहे. 

वंदे भारत या अभियानाअंतर्गत परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी देशातील ठराविक विमानतळावरुन विमान वाहतूक सुरु करण्यात आली होती. लॉकडाऊनचे तीन टप्पे पूर्ण झाल्यानंतर चौथ्या टप्प्याच्या अखेरीस देशाअंतर्गत विमान वाहतूक सेवा सुरु करण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या वतीने घेण्यात आला. याबाबतची घोषणा केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी केली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी