नवी दिल्ली: देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग (Former PM Manmohan Singh) यांना दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस (All India Institute of Medical Sciences) (AIIMS) म्हणजे एम्सच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मनमोहन सिंग यांना ताप आला होता आणि त्यानंतर त्यांना अशक्यपणा जाणवतो आहे, अशी माहिती सूत्रांकडून समोर येते आहे. सोमवारी मनमोहन सिंग यांना ताप आला होता मात्र त्यातून ते बरे झाले होते. त्यानंतर त्यांना अशक्तपणा जाणवू लागला. सध्या त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. (Former PM Manmohan Singh admitted to AIIMS, his health is stable)
एम्सच्या प्रशासनाकडूनदेखील या माहितीची पुष्टता करण्यात आली आहे आणि त्यांनी मनमोहन सिंग यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे म्हटले आहे. मनमोहन सिंग यांना ताप आल्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली होती, मात्र आता त्यांची प्रकृती स्थिर आहे, असे एम्सकडून सांगण्यात आले आहे. पंजाबचे मुख्यमंत्री चरनजित सिंग चन्नी यांनी मनमोहन सिंग यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होण्याच्या शुभेच्छा देणारे ट्विट केले आहे.
तर ऑल इंडिया कॉंग्रेस कमिटीचे सचिव प्रणव झा यांनी ट्विट करत म्हटले आहे की 'माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या प्रकृतीबद्दल काही अफवा पसरल्या होत्या. मात्र त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर नेहमीचेच उपचार केले जात आहेत. आवश्यकता भासल्यास आम्ही त्यासंदर्भातील माहिती देऊ. त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद.' मनमोहन सिंह यांना एम्समध्ये दाखल केल्यानंतर त्यांच्या प्रकृतीसंदर्भातील शंकाना पूर आला होता. त्यानंतर प्रणव झा यांनी स्पष्टीकरण देणारे ट्विट केले आहे.
एप्रिल महिन्यात ८९ वर्षीय माजी पंतप्रधानांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले होते. त्यातून ते पूर्ण बरे झाले होते आणि त्यांना एम्समधून १० दिवसांच्या आत घरी पाठवण्यात आले होते. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे २००४ ते २०१४ या दहा वर्षांच्या काळात देशाच्या पंतप्रधानपदी होते. त्यांची अर्थतज्ज्ञ म्हणून जगभर ख्याती आहे. १९९२ मध्ये नरसिंह राव पंतप्रधान असताना मनमोहन सिंग हे देशाचे अर्थमंत्री होते. त्याच काळात देशातील उदारीकरणाला सुरूवात झाली होती. मनमोहन सिंग हे रिझर्व्ह बॅंकेच्या गव्हर्नरपदीदेखील होते. एक अर्थतज्ज्ञ म्हणून त्यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या. देशाचा अर्थमंत्री झाल्यानंतर त्यांना मोठ्या हिंमतीने उदारीकरणाचे धोरण राबवले. त्यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पांनी आणि अर्थविषयक धोरणांनी भारताच्या प्रगतीची दिशाच बदलून गेली. त्यानंतर देशाने झपाट्याने आर्थिक विकास साधला आहे. ते पंतप्रधानपदी असतानादेखील देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकासदर चांगला होता. त्या काळात देशाची अर्थव्यवस्था वेगाने विस्तारली आहे. त्याचाच फायदा आज समाजातील विविध स्तरांना होतो आहे. कॉर्पोरेट क्षेत्राची वेगवान वाटचाल त्यांच्याच कारकिर्दीत सुरू झाली होती.
पंतप्रधान नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री असताना आणि नंतर देशाचे पंतप्रधान असताना मनमोहन सिंग यांनी देशाच्या विकासात दिलेले योगदान अनन्यसाधारण आहे. त्यांनी दाखवलेल्या दूरदृष्टीमुळे आणि विरोधाची चिंता न करता घेतलेल्या दूरगामी निर्णयामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेने मोठी घोडदौड केली आहे. नव्वदच्या दशकात जगभर जागतिकीकरणाचे वारे वाहत असताना भारतीय अर्थव्यवस्थेला जागतिक प्रवाहाशी जोडण्याचे काम मनमोहन सिंग यांनी केले होते. त्यांच्यामुळे देशाची अर्थव्यवस्था खुली होत नवनवीन उद्योगांना मोठी संधी निर्माण झाली होती. त्याचा फायदा समाजाला होत उद्योगधंद्यांचा विकास झाला होता. विविध क्षेत्रामध्ये भारतीय कंपन्या आणि उद्योगांना त्यामुळे मुसंडी मारणे शक्य झाले होते.