Candidate for Presidential Elections : कोण असणार राष्ट्रपतीपदाचे उमेदवार? चर्चेतील नावं ऐकून व्हाल चकित

नवे राष्ट्रपती कोण असतील, याची सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. अमिताभ बच्चन यांच्यापासून ते रतन टाटांपर्यंत अनेक नावांच्या कल्पना लढवल्या जात आहेत. त्यातील कुठलं नाव प्रत्यक्षात उमेदवारीसाठी पात्र ठरू शकेल?

Candidate for Presidential Elections
कोण होणार राष्ट्रपती?  |  फोटो सौजन्य: Indiatimes, Representative Image
थोडं पण कामाचं
  • 18 जुलैला होणार राष्ट्रपतीपदाची निवडणूक
  • रामनाथ कोविंद यांना पुन्हा संधी मिळणार?
  • सोशल मीडियावर अनेक नावांची चर्चा

Candidate for Presidential Elections | भारताचे नवे राष्ट्रपती (New President) कोण असणार, या चर्चेचं सध्या देशभर जोर धरला आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची तारीख निश्चित झाल्यानंतर आता ही निवडणूक बिनविरोध होणार की नेहमीप्रमाणे विरोधक आपला उमेदवार देणार, याबाबत उत्सुकता आहे. भारतीय जनता पक्षानं उत्तर प्रदेश निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर पक्षाची स्थिती मजबूत झाली आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उत्तर प्रदेशमधील आमदारांच्या मताला सर्वाधिक किंमत असते. त्या पार्श्वभूमीवर भाजपचा आत्मविश्वास वाढला असला तरी उमेदवाराची निवड हा मतं जमवण्याच्या प्रक्रियेतील एक महत्त्वाचा घटक ठरणार आहे. 

निवडणुकीची समीकरणे 

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी लोकसभा, राज्यसभा आणि विविध राज्यांच्या विधानसभांचे आमदार मतदान करत असतात. त्यामुळे या सर्व ठिकाणी मिळून ज्याचं संख्याबळ अधिक, त्या पक्षाचा उमेदवार राष्ट्रपतीपदी विराजमान होत असतो. 2017 साली झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीशी तुलना केली, तर भाजपच्या खासदारांच्या संख्येत वाढ झाली आहे. मात्र आमदारांच्या संख्येचा विचार केला, तर प्रमाण घटलेलं आहे. त्यामुळे अधिकाधिक राज्यांतील आमदारांचं पाठबळ मिळवण्यासाठी भाजपने प्रयत्न सुरू केले आहेत. तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत भाजपसोबत युती केलेल्या अण्णाद्रमुक पक्षाचं पाठबळ आपल्याला मिळेल, याची भाजपला खात्री आहे. 

सोशल मीडियावर नावांचा सुकाळ

राष्ट्रपतीपदाचे उमेदवार कोण असतील, याची सोशल मीडियावर सध्या गरमागरम चर्चा सुरू आहे. सर्वाधिक चर्चेत असलेलं नाव आहे केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांचं. याबरोबरच दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांचं नावदेखील राष्ट्रपतीपदासाठी सोशल मीडियावर चर्चेत आहे. याशिवाय झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल द्रौपदी मुर्मू, छत्तीसगडच्या राज्यपाल अनुसुईका उइके यांच्या नावांचीही चर्चा आहे. काहीजणांनी रतन टाटा यांच्या नावाला पसंती दिली आहे, तर काहींच्या मते सध्याचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू हेच राष्ट्रपतीपदाचे योग्य उमेदवार आहेत. 

भाजपचे उमेदवार कोण?

राष्ट्रपतीपदाची मागची निवडणूक 17 जुलै 2017 या दिवशी झाली होती आणि 20 जुलै रोजी मतमोजणी झाली होती. या निवडणुकीत रामनाथ कोविंद यांचा विजय झाला होता. त्यानी युपीएच्या उमेदवार आणि लोकसभेच्या माजी अध्यक्ष मीरा कुमार यांचा पराभव केला होता. कोविंद यांना उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी अनेक नावांची चर्चा होती, मात्र तत्कालीन भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी संसदीय बोर्डाच्या बैठकीनंतर रामनाथ कोविंद यांचं नाव जाहीर केलं होतं. या घोषणेनंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. भाजपनं सत्तेत आल्यानंतर असे अनेक आश्चर्यकारक निर्णय घेतले आहेत. 

अधिक वाचा - New Endorsement Policy : दिशाभूल करणाऱ्या जाहीराती केल्यास होणार कारवाई, सेलेब्रिटींना राहावं लागणार सावध

विचारधारेला महत्त्व

भाजपनं रामनाथ कोविंद यांची केलेली निवड ही कधीही हिंदुत्वाच्या दृष्टीकोनातून पाहिली गेली नाही. याउलट मागास वर्गातील सामाजिक कार्यात सहभागी असणाऱ्या कोविंद यांची निवड ही प्रागतिक विचारांचं लक्षण मानली गेली. भाजपला त्यानंतर मिळालेल्या वेगवेगळ्या निवडणुकीतील यशातून ही निवड योग्यच असल्याचं सिद्ध झालं. थोडक्यात, राष्ट्रपतीपदाचा उमेदवार ठरवताना पार्टीच्या विचारधारेपेक्षाही मतांच्या राजकारणासाठी सुसंगत असा उमेदवार देण्याकडेच भाजपचा कल असेल, अशी शक्यता आहे. 

राजेंद्र प्रसाद यांच्या विक्रमाशी बरोबरी?

भारतात राजेंद्र प्रसाद यांचा अपवाद वगळता कुणीही व्यक्ती सलग दुसऱ्यांदा राष्ट्रपती झालेली नाही. यावेळी भाजपने जर पुन्हा रामनाथ कोविंद यांनाच उमेदवारी दिली, तर या विक्रमाची बरोबरी होऊ शकते. धक्कादायक निर्णयांसाठी प्रसिद्ध असणारा भाजप यंदा कुणाला उमेदवारी देणार, याची उत्सुकता त्यामुळेच वाढली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी