New Endorsement Policy : दिशाभूल करणाऱ्या जाहीराती केल्यास होणार कारवाई, सेलेब्रिटींना राहावं लागणार सावध

अनेकदा सोड्याच्या नावाखाली मद्याची जाहीरात किंवा पानमसाल्याच्या नावाखाली गुटख्याची जाहीरात आपण पाहतो. मात्र यापुढे नव्या जाहीरात धोरणानुसार हे प्रकार बंद होणार आहेत.

New Endorsement Policy
मॉडेलिंग करताना सेलेब्रिटींना घ्यावी लागणार काळजी  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • जाहीरातींसाठी नवे धोरण
  • सेलेब्रिटींना घ्यावी लागणार जबाबदारी
  • उत्पादनाची खरी आणि पूर्ण माहिती देणे बंधनकारक

New Endorsement Policy : ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या जाहीराती (advertisement) केल्या, तर यापुढे सेलेब्रिटींवर कडक कारवाई (Celebrity) होणार आहे. केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार मंत्रालयाने नवी पॉलिसी तयार केली असून सेलेब्रिटींना जाहीरातींची निवड करताना काळजी घ्यावी लागणार आहे. 

काय आहे नियम?

सेलेब्रिटी ज्या उत्पादनाची जाहीरात करत असेल, ते उत्पादन वापरल्याचा आपला अनुभव सेलेब्रिटींना शेअर करावा लागणार आहे. त्या उत्पादनाविषयी वैयक्तिक मतही द्यावं लागेल. शिवाय ते उत्पादन तयार होण्यासाठी कुठला कच्चा माल वापरण्यात आला आहे, याचे तपशीलही द्यावे लागणार आहेत. अनेकदा पानमसाल्याची जाहीरात असल्याचं भासवून प्रत्यक्षात मात्र गुटख्याची जाहीरात करण्यात येते. किंवा सोड्याची जाहीरात असल्याचं दाखवून मद्याची जाहीरात करण्यात येते. या प्रकारच्या जाहारातींना आता बसणार आहे. 

सर्व माध्यमांना नियम लागू

जाहीरातींबाबतचा हा नियम टीव्ही, प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक अशा तिन्ही माध्यमांना लागू असणार आहे. शुक्रवारपासून ही मार्गदर्शक तत्वे लागू करण्यात आली असून नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. 

असा असेल दंड

नियमांचं उल्लंघन झालं तर पहिल्या गुन्ह्यासाठी 10 लाख रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. दुसऱ्यांदा तीच चूक घडली तर मात्र 50 लाख रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे. याच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली असून जाहीरातींसाठीच्या उत्पादनाची निवड करताना नव्या नियमांचा विचार करून निर्णय घ्यावा लागणार आहे. 

अधिक वाचा - Aryan Khan on Drugs Case : माझी नाहक बदनामी करण्यात आली, आर्यन खानने पहिल्यांदाच बोलून दाखवली खंत

कलाकार आणि खेळाडूंना सावधानतेचा इशारा

देशातील सर्वाधिक जाहीरातींमध्ये चित्रपट कलाकार आणि खेळाडू मॉडेलिंग करत असतात. मॉडेल म्हणून एखाद्या जाहीरातीशी संबंधित असलेल्या सेलेब्रिटीनादेखील हेच नवे नियम लागू होणार आहेत. एखाद्या उत्पादनाची जाहीरात करत असताना त्याच्या विश्वासार्हतेची जबाबदारी प्रमोटरवर असणार आहे. प्रमोटरकडून जाहीरातीत जे जे दावे केले जातील, त्यापैकी एकही दावा फोल किंवा दिशाभूल करणारा असल्याचं आढळलं तर नव्या नियमांनुसार त्याच्यावर कारवाई होऊ शकणार आहे. 

कच्चा माल आणि वजनाचीही द्यावी लागेल हमी

एखाद्या उत्पादनाच्या वजनाबाबत जाहीरातीत असलेला उल्लेख आणि प्रत्यक्षातील त्या उत्पादनाचं वजन यात तफावत आढळली, तरीदेखील प्रमोटरला कारवाईला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. शिवाय, ते उत्पादन तयार करण्यासाठी कुठला कच्चा माल वापरण्यात आला आहे, याचे तपशीलही जाहीरातकर्त्याला द्यावे लागणार आहेत. अनेकदा एखाद्या पदार्थातील निवडक पदार्थांचे विवरण जाहीरातीत दिलेले असते. मात्र त्यात वापरण्यात आलेले काही पदार्थ जाहीर केले जात नाहीत. या बाबीचा ग्राहकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होण्याची शक्यता असते. या बाबीचा नव्या नियमावलीत विचार करण्यात आला असून उत्पादन तयार करताना वापरण्यात आलेल्या सर्व घटकांची माहिती जाहीरातदाराला सादर करणे बंधनकारक असणार आहे. ग्राहकांच्या हितासाठी नवं धोरण तयार करण्यात आलं असून नागरिकांनी सजगपणे या कायद्याचा उपयोग करावा आणि जाहीरातींच्या माध्यमातून होणारे गैरप्रकार थांबवावेत, असं आवाहन केंद्र सरकारनं केलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी