बंगळुरु: माणसाचा मृत्यू नेमका कधी आणि कसा होईल याची कुणालाही शाश्वती देता येणार नाही. मृत्यू कधीही माणसाला गाठू शकतो हे त्रिवार सत्य आहे. बंगळुरुमध्ये एका २१ वर्षीय एमबीएच्या विद्यार्थिनीला मृत्यू हा चक्क रॅम्पवॉक करताना झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही तरुणी आपल्या कॉलेजच्या फ्रेशर्स डेसाठी रॅम्पवॉकची प्रॅक्टिस करत होती. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रॅम्पवॉक करतानाच तरुणीला अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच तिचा मृत्यू झाला.
याबाबत माहिती देताना पोलिसांनी असं सांगितलं की, ही घटना पीन्या कॉलेजमधील आहे. ज्यावेळी फ्रेशर्स डेसाठी विद्यार्थी खास कार्यक्रमाची तयारी करत होते. दरम्यान मृत मुलीचं नाव शालिनी असं असल्याचं समजतं आहे. जी याच कॉलेजमध्ये एमबीएच्या पहिल्या वर्षात शिकत होती. कॉलेजच्या फ्रेशर्स डेसाठी शालिनी तयारी करत असतानाचा अचानक तिचा मृत्यू झाला. या सगळ्या प्रकारामुळे या कॉलेजमधील इतर विद्यार्थ्यांना आणि शालिनीच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तिच्या मृत्यूचं कारण हे हृदयविकाराच्या झटक्याने झालं असल्याचं सांगण्यात येत आहे. शालिनी ही कार्यक्रमाची तयारी सुरु असताना स्टेजच्या बाजूला उभी होती. यावेळी ती तिचा रॅम्पवॉकसाठी नंबर केव्हा येणार याची वाट पाहत होती. पण त्याचवेळी ती अचानक जमिनीवरच कोसळली. याविषयी पोलीस अधिकाऱ्यांनी अशीही माहिती दिली की, ही संपूर्ण घटना कॉलेजमधील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
जेव्हा दुसऱ्या विद्यार्थिनीने शालिनीला खाली पडलेलं पाहिलं तेव्हा तिने तिला तात्काळ उचलून जवळच्या रुग्णालयात नेलं. पण तिथे पोहचताच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. याप्रकरणी पीन्या पोलीस स्थानकात एफआयआर नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करणार असून शालिनीचा मृत्यू हा नैसर्गिक आहे की, तिने आत्महत्या केली आहे याचाही पोलीस शोध घेणार आहेत. दरम्यान, पोलीस याप्रकरणाशी निगडीत सर्व पैलू तपासून पाहणार आहेत. त्यामुळे याप्रकरणी नेमकं काय सत्य आहे हे लवकरच समोर येईल.