Millions of treasures found from the wreck of the San Jose Galleon ship that sunk near Colombia 300 years ago : द सॅन जोस गॅलन नावाचे जहाज १७०८ मध्ये कोलंबिया जवळ कॅरेबियन समुद्रात बुडले होते. ब्रिटिश रॉयल नेव्हीच्या हल्ल्यात जहाज बुडले होते. या जहाजाचे अवशेष २०१५ मध्ये सापडले. विशेष म्हणजे सापडलेल्या अवशेषांमध्ये कोट्यवधी रुपयांचा खजिना आढळला. हा खजिना जहाजामधून नेला जात होता.
ज्या वेळी जहाज बुडले त्यावेळी जहाजावर ६०० जण होते. या ६०० जणांपैकी फक्त ११ जण वाचले. जहाजाचे अवशेष समुद्रात नेमके कोणत्या ठिकाणी आहेत याचा अंदाज आल्यानंतर आधुनिक यंत्रणेच्या मदतीने शोध सुरू झाला. एक यंत्र समुद्रात ३१०० फूट म्हणजेच सुमारे ९५० मीटर खोल गेले. याच ठिकाणी जहाजाचे अवशेष आढळले. यंत्रावरील कॅमेऱ्यांनी पाठवलेले फूटेज तपासल्यानंतर जहाजात खजिना असल्याचे लक्षात आले.
सोन्याचांदीच्या वस्तू, सोन्याचांदीची नाणी आणि चिनीमातीच्या महागड्या वस्तू यांच्या रुपात खजिना जहाजामध्ये आहे. दीर्घ काळ समुद्रात खोलवर असल्यामुळे जहाजाच्या अवशेषांवर तसेच खजिन्यातील धातुच्या वस्तूंवर शेवाळ तसेच इतर सागरी वनस्पतींची वाढ झाली आहे. या वनस्पतींमुळे समुद्रातील खजिना ओळखण्यासाठी यंत्रातील कॅमेऱ्यांद्वारे वेगवेगळ्या अँगलने जास्त वेळ शूटिंग करावे लागले.
खजिन्यातील धातूच्या वस्तू आणि चिनीमातीच्या वस्तू लिहिलेल्या शब्दांचे कॅमेऱ्याने शूटिंग केले आहे. हे शूटिंग तज्ज्ञांच्या मदतीने तपासून खजिन्याविषयी जास्तीत जास्त माहिती मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे.
जहाजाचे अवशेष आणि खजिना या संदर्भात संशोधन करण्यासाठी कोलंबियाचे नौदल मोठी तांत्रिक मदत देत आहे. या मदतीसाठी संशोधकांच्या पथकाने कोलंबियाच्या अध्यक्षांचे आणि कोलंबियाच्या नौदलाचे आभार मानले.
समुद्रात बुडलेले जहाज आणि जहाजासोबत बुडलेली मालमत्ता या दोन्ही गोष्टी ऐतिहासिक वारसा समजल्या जातात. ज्या देशाच्या सागरी हद्दीत बुडलेले जहाज आणि जहाजासोबत बुडलेली मालमत्ता आढळते त्या देशाने संबंधित वारशाचे जतन करायचे असते. हा आंतरराष्ट्रीय नियम आहे. या नियमाचे पालन करणार असल्याचे कोलंबियाने जाहीर केले.
आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार स्पेनमधून निघालेले जहाज ब्रिटिश रॉयल नेव्हीच्या हल्ल्यात बुडले. जलसमाधी मिळालेले हे जहाज आता कोलंबिया या देशाच्या सागरी हद्दीत ऐतिहासिक वारसा रुपाने सुरक्षित आहे.