भोपाळ : मध्यप्रदेशातील (Madhya Pradesh) उमरिया (Umaria)जिल्ह्यात १३ वर्षीय मुलीचं दोनवेळा अपहरण (Kidnapped) करुन तिच्यावर कथितपणे ९ जणांनी सामूहिक बलात्कार (gang-raped) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात तक्रार दाखल झाल्यावर पोलिसांनी सात आरोपींना अटक केली आहे. ही माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की, पीडित मुलीच्या आईने १४ जानेवारी रोजी पोलिसांत तक्रार दाखल केली होती त्यानंतर शुक्रवारी सात आरोपींना अटक करण्यात आली आहे तर दोन आरोपी फरार आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ जानेवारी रोजी पीडित मुलीला बोलण्यात गुंतवले आणि त्यानंतर तिचं अपहरण करण्यात आलं. अज्ञातस्थळी नेल्यावर सात जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर पाच जानेवारी रोजी तिला सोडून दिलं. तसेच घडलेला प्रकार कुणालाही सांगितला तर त्याचे गंभीर परिणाम होतील अशी धमकी सुद्धा आरोपींनी पीडित मुलीला दिली. यामुळे पीडित मुलगी खूपच घाबरली होती आणि तिने तक्रार दाखल केली नव्हती.
यानंतर ११ जानेवारी रोजी या आरोपींपैकी एका आरोपीने पुन्हा एकदा पीडित मुलीचं अपहरण केलं. त्यानंतर तिला अज्ञातस्थळी नेलं. यावेळी पहिल्या घटनेतील तीन आरोपींनी आणि इतर दोन ट्रक चालक अशा पाच जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी ११ जानेवारी रोजी ती बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली. याच दरम्यान आरोपींच्या तावडीतून पीडित मुलीने सुटका करुन पळ काढला. यानंतर १४ जानेवारी रोजी पोलिसांत तक्रार करण्यात आली आणि पीडित मुलीचा जबाब नोंदवण्यात आला.
या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. सात आरोपींना अटक करण्यात आली असून इतर दोघांचा शोध सुरू आहे. कोतवाली पोलीस ठाण्यात ३७६ आणि ३६६ अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.