Rajya Sabha Elections 2022 | राज्यसभेच्या निवडणुकीचा निकाल काय लागणार, याकडे पूर्ण देशाचं लक्ष आहे. राज्यसभेसाठी पार पडणारी मतदानाची प्रक्रिया ही लोकसभा आणि विधानसभेपेक्षा बऱ्याच अंशी वेगळी आणि काहीशी क्लिष्ट असते. त्यामुळे अनेक आमदारांना सध्या टेन्शन आलं आहे. मतदान करताना एक छोटीशी चूक जरी झाली तरीसुद्धा निवडणुकीचा निकाल फिरू शकतो.
राज्यसभेसाठी मतदान करताना सहा बाबींची काळजी घेणं गरजेचं असतं. या सहापैकी एका बाबतीत तरी चूक झाली, तरी ते मतदान बाद होतं. एखाद्या उमेदवाराचं मतदान बाद होण्याचे राजकीय वर्तुळात अनेक अर्थ निघत असतात. सर्वप्रथम त्या लोकप्रतिनिधीने जाणीवपूर्वक स्वतःचं मत बाद केल्याचा संशय त्याच्यावर घेतला जातो. ज्या पक्षाच्या उमेदवाराचं मत बाद होतं, त्याच्या विरोधी पक्षाच्या पथ्यावर ही बाब पडते. त्यामुळे आपल्या पक्षाच्या कुणाचंही मत बाद होऊ नये, याची सध्या भाजप, काँग्रेससह सगळेच पक्ष काळजी घेताना दिसत आहे.
आपल्या लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष मतदानावेळी चुका करू नयेत यासाठी भारतीय जनता पक्षानं नुकतंच आपल्या सर्व खासदारांचं दोन वेळा ‘मॉक मतदान’ घेतलं. यात पहिल्या वेळी पाच खासदारांची मतं बाद झाली, तर दुसऱ्या वेळी दोन खासदारांची मतं बाद झाली. हा प्रकार समजल्यावर काँग्रेससह इतर पक्षांच्या गोटातही काळजीचं वातावरण आहे.
राज्यसभेचं मतदान बॅलेट पद्धतीनं होतं. बॅलेमध्ये उमेदवाराच्या नावापुढे प्रायोरिटीनुसार आकडे लिहायचे असतात. म्हणजेच उमेदवारांच्या नावापुढे 1, 2, 3 असे पसंतीक्रमानुसार आकडे लिहायचे असतात. त्यानुसार कुणाला पहिल्या पसंतीचं मत दिलं, कुणाला दुसऱ्या आणि तिसऱ्या हे समजतं. पहिल्या पसंतीची मतं ही सर्वाधिक महत्त्वाची असतात.
अधिक वाचा -Rajya Sabha Election 2022 LIVE Updates: राज्यसभेच्या १६ जागांसाठी मतदान, अपक्ष आमदारांवर लक्ष
लोकसभेच्या निवडणुकीपेक्षा राज्यसभेची निवडणूक अनेक अंगांनी वेगळी असते. लोकसभेला गुप्त मतदान असतं. मात्र राज्यसभेला फक्त 21 खासदार गुप्त मतदान करतात आणि इतरांनी पोलिंग एजंट्सना आपलं मत दाखवणं बंधनकारक असतं. काँग्रेसच्या 108 आणि भाजपच्या 71 खासदारांनी कुणाला मत दिलं, हे पोलिंग एजंटला दाखवावं लागेल. मात्र 21 खासदारांवर असं कुठलंही बंधन नसेल. उमेदवारांची नावं अल्फाबेटनुसार लिहिलेली असतात आणि प्रत्येकाच्या नावापुढे नंबर लिहिण्यासाठी चौकट दिलेली असते. या चौकटीत आकडा लिहून खासदारांना आपलं मत नोंदवायचं असतं.
पार्टीनं नेमून दिलेल्या अधिकृत एजंटशिवाय इतर कुणालाही आपलं मतदान दाखवणं महागात पडू शकतं. इतर कुणाला आपलं मतदान दाखविल्यास मत बाद होतं. काँग्रेस खासदार रणदीप सूरजेवालांचं मत गेल्या निवडणुकीत याच कारणामुळे बाद झालं होतं.
बॅलेट पेपरमध्ये काहीच न लिहिता तो मोकळा सोडला, तरी ते मत बाद होतं.
बॅलेट पेपरमध्ये प्रत्येक उमेदवारासमोर एकच आकडा लिहिणं बंधनकारक आहे. एकाच उमेदवाराच्या नावापुढे दोन किंवा त्याहून अधिक आकडे लिहिले, तरी मत बाद होतं.
राज्यसभेची मतदान प्रक्रिया निळ्या शाईनं होते. याशिवाय इतर कुठळ्या रंगाची शाई वापरली तरी मतदान बाद होतं.
जर उमेदवाराच्या नावासमोर अंकांऐवजी अक्षरात आकडा लिहिला, तरी ते मत बाद होतं.