नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी अयोध्येतील राम मंदिरच्या निर्मितीसाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची स्थापना करण्यात येत असल्याची घोषणा केली. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टमध्ये १५ सदस्य असणार आहेत. यात कायमस्वरूपी ९ आणि ६ नामनिर्देशित सदस्य असणार आहेत. या विश्वस्त मंडळाची स्थापना झाल्यानंतर केंद्र सरकारने या मंडळाला चक्क १ रूपयाचे रोख दान दिले आहे. पहिल्यांदाच मोदी सरकारने हे दान दिले आहे.
या मंडळामध्ये १५ सदस्यांचा समावेश करण्यात येणार असून त्यात दलित सदस्यही असेल अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टद्वारे अयोध्येत भव्य राम मंदिर निर्मितीच्या देशेने काम सुरू व्हावे या उद्देशाने केंद्र सरकारने विश्वस्त मंडळाला १ रूपयाचे दान देत दानाची सुरूवात केली आहे. विश्वस्त मंडळाला मंडळाला केंद्र सरकारच्या वतीने हे दान गृह मंत्रालयाचे सचिव डी मुर्मू यांनी दिले. हे विश्वस्त मंडळ स्थावर मालमत्तेसह विनाअट कोणत्याही व्यक्तीकडून कोणत्याही स्वरूपात दान, अनुदान, अंशदान आणि योगदान घेऊ शकणार आहे.
सुरूवातीच्या काळात हे विश्वस्त मंडळ ज्येष्ठ अधिवक्ता के परासरण यांच्या घरामधूनच काम करणार आहे. मात्र, त्यानंतर विश्वस्त मंडळाचे कायमस्वरूपी कार्यालय सुरू करण्यात येईल. या विश्वस्त मंडळाला राम मंदिर निर्माण आणि संबंधित विषयांवर स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचे अधिकार अशणार आहेत. विश्वस्त मंडळाचे नोंदणीकृत कार्यालय दिल्लीत असणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने ९ नोव्हेंबर रोजी निकाल देताना तीन महिन्यांमध्ये केंद्र सरकारने मंडळआची स्थापना करावी असा आदेश दिला होता. ही मुदत ९ फेब्रुवारी रोजी संपत असल्याने केंद्र सरकारने मंडळाच्या स्थापनेला मंजुरी दिल्याचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे केंद्र सरकारने पालन केले असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्ट केले. राम मंदिराचे बांधकाम तसेच संबंधित विषयावर श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट स्वतंत्रपणे निर्णय घेईल.
ज्येष्ठ विधिज्ञ केशवन अय्यंगार परासरण विश्वस्त मंडळात असतील. या विश्वस्त मंडळात जगतगुरू शंकाराचार्य, जगतगुरू माधवानंद स्वामी, युगपुरूष परमानंदजी महाराज हेदेखील सदस्य असणार आहेत. तसेच पुण्याचे गोविंददेव गिरी, अयोध्येतील डॉक्टर अनिल मिश्रा, कामेश्वर चौपाल आणि निर्मोही आखाड्याचे धीरेंद्र दास यांच्या नावांचा देखील समावेश आहे.