Modi to review vaccination : लसीकरण कमी झालेल्या ४८ जिल्ह्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार आढावा बैठक

Modi to review vaccination : देशात लसीचे (Vaccine) १०० कोटी डोस देऊनही आतापर्यंत १८ वर्षांवरील संपूर्ण लोकसंख्येला डिसेंबरपर्यंत किमान एक डोस देण्याच्या उद्दिष्टापासून आपण मागे आहोत.

Modi to review vaccination
लसीकरण कमी झालेल्या जिल्ह्यांची पंतप्रधान मोदी घेणार बैठक  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता घेणार आढावा बैठक
  • ४८ जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी संवाद साधणार आहेत.
  • उत्तरेकडील मणिपूर आणि नागालँड या राज्यातील प्रत्येकी 8-8 जिल्ह्यांचा समावेश आहे.

Modi to review vaccination : मुंबई : देशात लसीचे (Vaccine) १०० कोटी डोस देऊनही आतापर्यंत १८ वर्षांवरील संपूर्ण लोकसंख्येला डिसेंबरपर्यंत किमान एक डोस देण्याच्या उद्दिष्टापासून आपण मागे आहोत. आतापर्यंत देशातील ७८.६% लोकांनाच पहिला डोस दिलेला आहे. त्यापैकी फक्त ४४.८% लोकांनाच दोन्ही डोस दिले आहेत. यामुळे जी 20 शिखर परिषद (G20 Summit) आणि हवामान बदल परिषद  २६(COP26) मध्ये सहभागी होऊन देशात परतल्यानंतर लगेचच, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) 3 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून कमी लसीकरण झालेल्या जिल्ह्यांसोबत आढावा बैठक घेणार आहेत.

कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस ५०% पेक्षा कमी दिलेल्या आणि  दुसऱ्या डोसची व्याप्ती अत्यंत कमी असलेल्या जिल्ह्यांचा या बैठकीत समावेश असेल. या बैठकीत १३ राज्यांतील कमी लसीकरण व्याप्ती असलेल्या ४८ जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी संवाद साधणार आहेत. यावेळी या राज्यांचे मुख्यमंत्रीही उपस्थित राहणार आहेत.

आरोग्य मंत्र्यालायाच्या माहितीनुसार, २७ राज्यातील ४८ जिल्ह्यांमध्ये लसीकरण संथ गतीने सुरु आहे. उत्तरेकडील मणिपूर आणि नागालँड या राज्यातील प्रत्येकी 8-8 जिल्ह्यांचा समावेश आहे. झारखंडमधील सर्वाधिक जिल्ह्यांचा समावेश आहे. झारखंडमधील ९ जिल्ह्यात ५० टक्क्यांपेक्षा कमी लोकांनी पहिला डोस घेतलेला नाही. महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे.  या ४८ जिल्ह्यांपैकी २८ जिल्हे ईशान्येकडील ६ राज्यांचे आहेत. जास्त लोकसंख्येच्या राज्यांत ७५% पेक्षा जास्त लोकसंख्येला पहिला डोस दिलेल्या महाराष्ट्रातील ६ जिल्हे या यादीत आहेत. पण यूपीचा एकही जिल्हा यादीत नाही, तेथे फक्त ६५.८५% लोकसंख्येलाच पहिला डोस देण्यात आला आहे.

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आढावा बैठकीपूर्वी या राज्यात विशेष लसीकरण मोहीम राबवली जाण्याची शक्यता आहे. प्रत्येकाला घरी जाऊन लसीकरण केले जणार आहे. नुकत्याच झालेल्या बैठकीत मनसुख मंडाविया यांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या दुसऱ्या डोसचा मुद्दा उपस्थित केला होता. 10.34 कोटी लोकांनी निर्धारित वेळेत दुसरा डोस घेतला नसल्याचे मंडाविया यांनी आपल्या बैठकीत सांगितले. तसेच नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत सर्व पात्र असणाऱ्यांना पहिला डोस देण्यात यावा, अशी सूचना दिली होती.

जिल्ह्यांचा रिपोर्टकार्ड -

झारखंड -

पाकुर (३१.१%), साहेबगंज (३९.२%), गढ़वा (४२.७%), देवघर (४४.२%), पश्चिम सिंहभूम (४७.८%), गिरिडीह (४८.१%), लातेहार (४८.३%), गोड्डा (४८.३%) आणि गुमला (४९.९%) 

मणिपूर -

कांगपोक्पी (१७.१%), उखरूल (१९.६%), कामजोंग (२८.२%), सेनापती (२८.६%), फेरजॉल (३१.१%), तमेंगलॉन्ग (३५%), नोनी (३५.४%) आणि तैंग्नोपाल (४३.७%)

नागालँड -

किफीर (१६.१.%), तुएसांग (२०.८%), फेक (२१.९%), पेरेन (२१.९%), मोन (३३.५%), वोखा (३८.५%), जुन्हेबोटो (३९.४%) आणि लाँगलैंग (४०.४%)

अरुणाचल प्रदेश -

क्रदादी (१८.३%), कुरुंग कुमे (२७.४%), अपर सुबांसिरी (३२.१%), कामले (३६.४%), लोअर सुबांसिरी (४१.३%) आणि कमेंग (४२.५%) 

महाराष्ट्र -

औरंगाबाद (४६.५%), नंदुरबार (४६.९%), बुलढाना (४७.६%), हिंगोली (४७.८%), नांदेड (४८.४%) आणि अकोला (४९.३%)

मेघालय -

पश्चिम खासी हिल्स (३९.१%), दक्षिण गारो हिल्स (४१.२%), पूर्व गारो हिल्स (४२.१%), पश्चिम जांतिया हिल्स (४७.८%)

याशिवाय, नूह (हरियाणा २३.५%), थिरुवल्लूर (तामिळनाडू ४३.१%), दक्षिण सालमारा मनकाचार (आसाम ४४.८%), नारायणपूर (छत्तीसगड ४७.५%), उत्तर-पश्चिम दिल्ली (४८.२%), लॉन्गतलाई (मिजोरम ४८.६%), अररिया (बिहार ४९.६%) या जिल्ह्यांचा समावेस आहे.

जी-२० च्या बैठकीनंतर लगेचच बैठक घेणार पंतप्रधान मोदी

केंद्र सरकारतर्फे जारी निवेदनानुसार, पंतप्रधान विदेश दौऱ्याहून परतल्यानंतर लगेचच ही बैठक घेतील. मोदी सध्या जी-२० शिखर परिषद व हवामान बदलावरील सीओपी-२६ बैठकीत भाग घेण्यासाठी रोम आणि ग्लासगोच्या दौऱ्यावर आहेत. जी-२० च्या मंचावर पंतप्रधानांनी लस उत्पादन व कोरोनावर नियंत्रण मिळवण्याच्या उपायांसाठी जगाला मदतीचा प्रस्ताव दिला आहे. ईशान्येच्या १० जिल्ह्यांत ३०% पेक्षा कमी लोकांना पहिला डोस : ईशान्येच्या राज्यांची स्थिती जास्त खराब. मणिपूर व नागालँडचे ८-८ जिल्हे तर मेघालयचे ४ आणि अरुणाचलचे ६ जिल्हे लसीकरणात मागे. नागालँडच्या किफिर जिल्ह्यात फक्त १६.१% लोकांनाच पहिला डोस. ३०% पेक्षा कमी पहिला डोस देणारे १० जिल्हे आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी