Mansoon 2019: हवामान खाते म्हणते, मान्सून सहा जूनला केरळमध्ये येणार

लोकल ते ग्लोबल
Updated May 15, 2019 | 16:11 IST | टाइम्स नाऊ मराठी वृत्तसेवा

Mansoon: मान्सूनपूर्व पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे कधी एकदा पाऊस येतोय आणि धरणीला शांत करतोय, याचीच प्रत्येकजण वाट पाहू लागला आहे. हवामान शास्त्र विभागाने मान्सून केरळमध्ये सहा जूनला पोहचेल, असे म्हटलं आहे.

Monsoon rain
मान्सून भारतात ६ जूनला येण्याचा अंदाज  |  फोटो सौजन्य: BCCL

नवी दिल्ली : दुष्काळी परिस्थिती आणि अंगाची लाही लाही करणाऱ्या उन्हामुळे सगळ्यांच्या नजरा आता पावसाकडे लागल्या आहेत. मान्सूनपूर्व पावसानं ओढ दिली आहे. त्यामुळे कधी एकदा पाऊस येतोय आणि धरणीला शांत करतोय, याचीच प्रत्येकजण वाट पाहू लागला आहे. पण, मान्सूनच्या (Mansoon) आगमनाविषयी वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात आहे. स्कायमेट या खासगी हवामान संस्थेनं मान्सून (Mansoon) ४ जूनला केरळमध्ये प्रवेश करेल, असे म्हटलं होतं. तर, भारताच्या सरकारी हवामान शास्त्र विभागानं (आयएमडी) मान्सून (Mansoon) केरळमध्ये सहा जूनला पोहचेल, असे म्हटलं आहे.

मान्सून एक जूनला केरळ आणि सात जूनला महाराष्ट्रात पोहोचण्याची परंपरा आहे. यात एक-दोन दिवसांचा फरक राहत असतो. यंदा भारतीय हवामानशास्त्र विभागानुसार दरवर्षी एक जूनला भारताच्या दक्षिण सीमेवर प्रवेश करणारा नैऋत्य मान्सून यंदा थोडा उशीरा येण्याची शक्यता आहे. पाच दिवसांच्या उशिरानं मान्सून देशाच्या दक्षिण टोकाला केरळमध्ये प्रवेश करेल. आता या अंदाजामध्ये काही दिवस पुढे मागे होऊ शकतात, असे हवामान खात्यानं म्हटले आहे. पण, मान्सूनचे वारे पुढे सरकण्यासाठी लागणारी अनुकूल परिस्थिती तयार झाल्याचे हवामान खात्यानं स्पष्ट केले आहे. दरम्यान, स्कायमेट या खासगी हवामान संस्थेनं मंगळवारी मान्सून केरळमध्ये ४ जूनला दाखल होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

सर्वसाधारणपणे केरळमध्ये मान्सून सुरू होण्याची तारीख १ जून हीच आहे. पण, स्कायमेटनं यंदा मान्सूनला थोडा उशीर होणार असल्याचं म्हटलं आहे. तसेच यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता ही स्कायमेटनं व्यक्त केली आहे. यासंदर्भात स्कायमेटचे सीईओ जतिन सिंह म्हणाले, ‘अंदमान निकोबारमध्ये मान्सून २२ मे रोजीच पोहोचणार आहे. तर, नैऋत्य मोसमी वारे केरळमध्ये ४ जूनलाच पोहोचतील.’ भारताच्या चार विभागांमध्ये सरासरी पेक्षा कमी पाऊस पडण्याचे संकेत स्कायमेटच्या सिंह यांनी सांगितले आहे. त्यामध्ये देशाचा पूर्व आणि उत्तर पूर्वेचा ईशान्य भाग तसेच मध्य भारतातील काही भागात दक्षिण आणि वायव्य भागाच्या तुलनेत कमी पाऊस पडणार असल्याचा अंदाज सिंह यांनी व्यक्त केला आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार सरासरी पेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता ५५ टक्के आहे. तसेच भारतीय उपखंडात मान्सून सुरुवातीच्या टप्प्यात धीम्या गतीनं पुढे सरकण्याचा अंदाज आहे.

विदर्भ मराठवाडा राहणार कोरडा?

सध्या महाराष्ट्रात विदर्भ मराठावाडा दुष्काळात होरपळत आहे. पण, पावसाचा अंदाज या विभागाला दिलासा देणारा नाही. विदर्भ मराठवाड्यासह पश्चिम मध्य प्रदेश आणि गुजरातच्या काही भागात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे दुष्काळाची स्थिती आणखी बिकट होण्याची भीती आहे. तसेच उत्तर कर्नाटकच्या काही भागातही पाणी टंचाईचे संकट आहे. त्या भागात मात्र पावसाची शक्यता आहे. उत्तर आणि मध्य कर्नाटकसह रायलसीमा परिसरात पाऊस होण्याची शक्यता आहे. स्कायमेटनुसार उत्तर भारतात पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि दिल्लीच्या तुलनेत जम्मू-काश्मीर, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी