Monsoon Update । नवी दिल्ली : देशातील अनेक राज्यांमध्ये गरमीने भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान बुधवारी हवामान खात्याने सांगितले की, १५ जूनपासून मध्य आणि उत्तर भारतात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. आयएमडीचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी बुधवारी सांगितले की, आमच्या अंदाजानुसार १५ जूनपर्यंत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. या पावसामुळे भात, मका, कापूस, सोयाबीन, ऊस, भुईमूग या महत्त्वाच्या पिकांच्या पेरणीला मदत होणार आहे. (Monsoon will increase in the country from June 15, Citizens will get relief from the heat).
अधिक वाचा : कधी, कुठे आणि कसा पाहायचा IND vs SA पहिला टी-२० सामना
यंदा मान्सूनने केरळमध्ये २९ मे रोजी आपल्या सामान्य वेळेच्या दोन दिवस आधी हजेरी लावली होती. मात्र १ जूनपासून सरासरीपेक्षा ४२ टक्के कमी पाऊस झाला आहे. देशात ७० टक्के पाऊस हा मान्सूनमध्ये पडतो आणि हा पाऊस शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. आयएमडीचे महासंचालक म्हणाले की, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, आसाम, दक्षिण पश्चिम बंगाल, मेघालय, सिक्कीम आणि कर्नाटकच्या काही भागात जास्त पाऊस झाला आहे.
हवामान खात्याने सांगितले की, अरबी समुद्रातून दक्षिण द्वीपकल्पीय भारतावर येणाऱ्या पश्चिमेकडील वाऱ्यांमुळे येत्या पाच दिवसांत कर्नाटक, केरळ आणि लक्षद्वीपमध्ये मोठ्या प्रमाणात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार मुंबईत ११ जूनपर्यंत मान्सून सुरू होण्याची शक्यता आहे. लक्षणीय बाब म्हणजे मुंबईत मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र मुंबईपूर्वी कोकण आणि गोव्यात मान्सून सुरू होईल. तर दुसरीकडे दिल्लीतील जनतेला १५ जूनपर्यंत कडक उन्हापासून दिलासा मिळण्याची शक्यता नाही.