Church Attack in Nigeria: नायजेरियामधील (Nigeria) ओंडो (Ondo) राज्यातील एका कॅथोलिक चर्चवर(Catholic Church) रविवारी बंदूकधाऱ्यांनी केलेल्या अचानक हल्ल्यात महिला आणि मुलांसह 50 जण ठार झाले आहेत आणि अनेक जण जखमी झाले आहेत. ओंडो राज्यातील ओवो शहरात हा हल्ला झाल्याचे वृत्त डेली सबाने दिले आहे. रविवारी सकाळच्या प्रार्थनेदरम्यान चर्चमध्ये मोठ्या संख्येने लोक जमले असताना हा हल्ला झाला.
एजन्सीच्या म्हणण्यानुसार, बंदुकधारींनी प्रथम चर्चजवळ स्फोटकांचा स्फोट केला आणि नंतर प्रार्थना करणाऱ्या उपासकांवर गोळीबार केला, ज्यात अनेक लोक जागीच ठार झाले दरम्यान हल्लेखोरांनी पाद्रीचेही अपहरण केले. सुरक्षा कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून उपस्थित असलेल्यांना वाचवण्यात येत आहे. दरम्यान मृतांची संख्या अद्याप सांगणे कठीण असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. जखमींना ओवो शहरातील सरकारी रुग्णालयात नेण्यात आल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले आहे.
ओंडू राज्याचे गव्हर्नर अर्कुनरिन अकेरेडोलू यांनी एका निवेदनात हल्ल्याची पुष्टी केली. आपल्या निवेदनात राज्यपाल म्हणाले, "आज सेंट फ्रान्सिस कॅथोलिक चर्चमध्ये उपासना करत असलेल्या ओवो येथील निरपराध लोकांवर झालेल्या हल्ल्याने आणि त्यांच्या हत्येमुळे खूप दुःख झाले आहे."
अकेरेडोलू यांनी स्थानिकांना "शांत आणि सतर्क राहण्याचे" आवाहन केले कारण शहरात देखरेख ठेवण्यासाठी आणि सामान्य स्थिती पुनर्संचयित करण्यासाठी सुरक्षा दल तैनात केले गेले आहेत. राष्ट्राध्यक्ष मुहम्मद बुहारी यांनी या हल्ल्याचा निषेध केला आणि याला “घृणास्पद कृत्य” म्हटले. आतापर्यंत कोणत्याही गट किंवा संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही, तसेच हल्ल्यामागचा हेतूही कळू शकलेला नाही. अधिकारी रविवारी झालेल्या हल्ल्यांच्या संख्येचे मूल्यांकन करत आहेत, असे द न्यूयॉर्क टाइम्सने वृत्त दिले आहे.