Nupur Sharma Controversy : नुपूर शर्मा चुकल्याच, पण त्यावरून होणारा हिंसाचार सर्वस्वी चुकीचा! मुख्तार अब्बास नक्वीचं रोखठोक मत

नुपूर शर्मा प्रकरणी केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नुपूर शर्मांच्या विधानाचं कुणीही समर्थन करत नसून उदयपूरसारख्या घटना या दहशतवाद आहेत, अशी रोखठोक प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

Nupur Sharma Controversy
नुपूर शर्मा चुकल्यच, पण…  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • नुपूर शर्मा चुकल्याच, पण त्यावरील प्रतिक्रिया अधिक आक्षेपार्ह
  • गळा कापणे हा तर दहशतवाद झाला
  • भारत हा सेक्युलर देश - नक्वी

Nupur Sharma Controversy | भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या विधानाचं कुणीच समर्थन केलेलं नाही, मात्र त्यावरून उमटणाऱ्या हिंसक प्रतिक्रिया पूर्णतः चुकीच्या आणि अस्विकारार्ह असल्याचं मत भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी म्हटलं आहे. नुपूर शर्मांच्या विधानाबाबत खेद व्यक्त करत असतानाच त्यांनी या मुद्द्यावरून करण्यात आलेला हिंसाचार पूर्णतः चुकीचं असल्याचं मत एका वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केलं आहे. 

उदयपूरसारख्या घटनांचा निषेध

नुपूर शर्मांच्या विधानानंतर घडलेल्या उदयपूर हत्या प्रकरणाबाबतही नक्वी यांनी या कार्यक्रमात भाष्य केलं. ही घटना अस्विकारार्ह असून एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीचा गळा कापण्याच्या कृत्याचं समर्थन करताच येणार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. नुपूर शर्मा यांचं विधान चुकीचंच आहे, मात्र त्यावर येणारी प्रतिक्रिया ही अधिक चुकीची असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. हा भारत आहे. कुठलाही इस्लामिक देश नाही. भारत हा एक सेक्युलर देश आहे. आम्ही कधीच नुपूर शर्मांच्या विधानाचं समर्थन करू शकत नाही. पण गळा कापणे हा दहशतवाद झाला. विधान करणे हा दहशतवाद नाही. निर्दोष लोकांचा बळी घेणे हा दहशतवाद आहे. नुपूर शर्मांच्या विधानाचं समर्थन न करता या हत्येच्या घटनांचा मी निषेध करतो, असं नक्वी यांनी म्हटलं आहे. 

अधिक वाचा - Documentary Poster Issue : माझ्यासाठी काली माँ मांसाहार आणि मद्यप्राशन करणारी देवी, तृणमूल खासदार महुआ मोईत्रांंचं विधान, पक्षाकडून कानावर हात

हिजाब हॉरर हंगामा विसरला का?

आपण हिजाब हॉरर हंगामा विसरला काय, असा सवाल मुख्तार अब्बास नख्वी यांनी केला. अत्यंत सुनियोजित पद्धतीनं महिलांना घरी बसवण्याचा आणि चार भिंतींआड डांबण्याचा हा डाव असल्याचं ते म्हणाले. महिलांवर बंधन कोण लादतं? अल्‌ कायदा, तालिबान यासारख्या संघटनाच हिजाब हॉररचं समर्थन करतात. मुलींचं शिक्षण आणि करिअर यावर वरवंटा फिरवतात आणि त्यांना घराबाहेर पडू देत नाहीत. आपल्या देशातील नागरिकही अशा घटनांकडे आकर्षित होताना दिसतात. आपल्या देशातील ग्रँड ओल्ड पार्टीचे दोन नेतेही मग पुढे येतात आणि वाटेल ती विधानं करतात. कुणी कसलेही कपडे घालोत, बिकीनी घालो किंवा काहीही घालो, तुम्ही का बंधनं आणता, असा सवाल उपस्थित करतात. 

अधिक वाचा -  Ajmer : नुपुर शर्मा विषयी चिथावणी देणारे वक्तव्य केले, अजमेर दर्ग्याच्या खादिम सलमान चिश्तीला अटक

2014 पूर्वीच्या इतिहासावर नजर टाका

2014 साली पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सरकार आल्यापासून विकास हा एकमेव अजेंडा घेऊन सरकारचा कारभार सुरू आहे. मोदी सरकार येण्यापूर्वी भागलपूरमध्ये दीड वर्षं दंगली सुरू होत्या. त्यात हजारो लोक मृत्युमुखी पडले, अनेकांनी पलायन केलं. भिवंडीतील दंग्यांमुळे यंत्रमाग उद्योगावर विपरित परिणाम झाला. या देशात मोदी सरकार येण्यापूर्वी दंग्यांचा मोठा इतिहास सांगता येईल. मात्र आता सरकार केवळ विकासाच्या मुद्द्यावर आगेकूच करत असल्याचं ते म्हणाले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी