Naqvi Resigns | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातून दोन मंत्र्यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रिपदारून मुख्तार अब्बास नक्वी यांनी राजीनामा दिला. तर आरसीपी सिंग यांनी जनता दल युनायडेटच्या (जेडीयु) कोट्यातील स्टील खात्याचा राजीनामा दिला. यापैकी मुख्तार अब्बास नक्वी हे उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार असण्याची शक्यता दिल्लीच्या राजकीय वर्तुळात जोर धरते आहे.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी द्रौपदी मुर्मू यांच्या नावावर भाजपनं उमेदवारीसाठी शिक्कामोर्तब केल्यानंतर आता उपरराष्ट्रपतीपदासाठीची चाचपणी सुरू झाली आहे. त्यामुळे मुख्तार अब्बास नक्वी यांच्या उमेदवारीचा विचार भाजपच्या गोटात सुरू असल्याची माहिती आहे. नक्वी हे भाजपचा अल्पसंख्याक चेहरा आहेत. त्याचप्रमाणे पुरोगामी आणि सुधारणावादी विचारांचे मुस्लीम नेते अशी त्यांची ओळख आहे. देशात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही नक्वी यांच्या उपराष्ट्रपतीपदी विराजमान होण्यामुळे सकारात्मक संदेश जाऊ शकतो. शिवाय सर्वधर्मसमभावाचं पालन केलं जात असल्याचाही संदेश यातून इतरांना दिला जाऊ शकतो, असा विचार भाजपश्रेष्ठी करत असल्याची चर्चा आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेवरून राष्ट्रपती रामनात कोविंद यांनी नक्वी आणि आरसीपी सिंग यांचा राजीनामा स्विकारला आहे. नक्वी यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेलं अल्पसंख्याक मंत्रिपद स्मृती इराणी यांच्याकडे देण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतल्याची माहिती आहे. पंतप्रधानांच्या सल्ल्यावरून तसे आदेश राष्ट्रपती कोविंद यांनी दिले आहेत. तर ज्योतिरादित्य सिंदिया यांच्याकडे सध्या असलेल्या खात्यांसोबत स्टील खात्याची जबाबदारी दिली जाणार आहे.
अधिक वाचा - आता भाजपची दक्षिणस्वारी, पीटी उषा, इलैयाराजा यांच्यासह हे ४ दिग्गज राज्यसभेवर जाणार
नुकत्याच झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्तार अब्बास नक्वी आणि आरसीपी सिंग यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली होती. या दोघांनीही आपल्या कारकिर्दीत उत्तम कामगिरी बजावल्याचं कौतुक मोदींनी केलं होतं. या दोन्ही मंत्र्यांची ही शेवटची कॅबिनेट असल्याचे संकेत त्याच वेळी सर्वांना मिळाले होते आणि दोघांच्या राजीनाम्याची कुणकुण लागली होती. दोघांनीही आपापल्या घटनात्मक पदांचा राजीनामा दिला आहे आणि आता शुक्रवारपासून ते केवळ संसद सदस्य असणार आहेत.
अधिक वाचा - मोदींच्या मंत्रिमंडळातील एका मंत्र्याचा राजीनामा, श्रीकांत शिंदेंची केंद्रात वर्णी?
भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या विधानानंतर देशात काही ठिकाणी घडलेल्या हिंसक घटनांचा नक्वी यांनी निषेध केला होता. नुपूर शर्मा यांच्या विधानाचं कुणीच समर्थन करू शकत नाही, मात्र एखाद्या व्यक्तीचा गळा चिरून हत्या करणं हा दहशतवाद असल्याचं ते म्हणाले होते. भारत हा इस्लामिक देश नसून एक सेक्युलर देश आहे, याची आठवण त्यांनी करून दिली होती.