Nupur Sharma Comment on Prophet : नुपूर शर्मांच्या वादग्रस्त विधानाने मुस्लीम देश भडकले, येतायत संतप्त प्रतिक्रिया

भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त विधानाचे जगभर पडसाद उमटू लागले आहेत. जगातील अनेक मुस्लीम देशांनी या वक्तव्याचा निषेध केला आहे.

Nupur Sharma Comment on Prophet
नुपूर शर्माच्या विधानाचा मुस्लीम देशांकडून निषेध  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या विधानाचे जगभर पडसाद
  • मुस्लीम देशांकडून संतप्त प्रतिक्रिया
  • ही तर फ्रींज इलेमेंटची प्रतिक्रिया - भारत सरकारचं स्पष्टीकरण

Nupur Sharma Comment on Prophet : भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी एका वादविवाद कार्यक्रमात मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी वादग्रस्त विधान केलं होतं. या विधानाचे आता जगभर पडसाद उमटायला सुरुवात झाली असून अनेक मुस्लीम देशांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त करायला सुरुवात केली आहे. वास्तविक, भाजपने नुपूर यांची तत्काळ प्रवक्तेपदावरून हकालपट्टी केली आहे. तर नुपूर शर्मांनी केलेलं विधान हे सरकारचं मत नाही, असा खुलासा केंद्र सरकारनं केला आहे. दिल्लीतील प्रवक्ता नवीन कुमार जिंदल यांनीही सोशल मीडियावर याच अर्थाचं विधान केलं होतं. त्यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. नुपूर यांचं विधान हे ‘फ्रींज इलेमेंट’ कडून झालेलं विधान असून सरकार सर्व धर्मांचा सन्मान करत असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. 

दरम्यान, या विधानानंतर आता जगभरातून प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे. विशेषतः मुस्लीम देशांतून संतप्त प्रतिक्रिया नोंदवल्या जाऊ लागल्या आहेत. बघुया, कुठल्या देशाने काय प्रतिक्रिया दिली आहे. 

सौदी अरेबिया

सौदी अरेबियाचे परराष्ट्र मंत्री प्रिन्स फैसल बिन फरहान अल-सऊद यांनी काही वेळापूर्वीच सोशल मीडियावरून आपला संदेश दिला आहे. भाजप प्रवक्त्याने केलेल्या विधानावर त्यांनी कडक ताशेरे ओढले आहेत. भाजपनं नुपूर यांच्यावर केलेल्या कारवाईचं त्यांनी स्वागत केलं आहे. 

कतार

कतारच्या परराष्ट्र मंत्रालयानं भारताच्या राजदूतांशी संपर्क साधून आपला निषेध नोंदवला आहे. जगभरातील सर्व मुस्लीमांची बिनशर्त माफी मागण्यात यावी, अशी मागणी कतारने केली आहे. इस्लामविरोधी वक्तव्यांना थारा देणं आणि अशा व्यक्तीला कडक शिक्षा न करणं चुकीचं असल्याचं मत कतारनं व्यक्त केलं आहे. यामुळे जगभरातील मुस्लिमांबाबत गैरसमज पसरण्याची शक्यता असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 

अधिक वाचा - Tagore, Kalam on Currency Notes : यापुढे भारतीय नोटांवर टागोर आणि कलामांचे फोटोही दिसणार, रिझर्व्ह बँकेकडून जोरदार तयारी

कुवैत

कुवैतच्या विदेश मंत्रालयानं भारताच्या राजदूतांकडे एका पत्राद्वारे निषेध नोंदवला आहे. नुपूर आणि जिंदल या दोघांचंही निलंबन केल्याच्या कारवाईचं त्यांनी स्वागत केलं आहे. 

पाकिस्तान

पाकिस्ताननं भारताच्या राजदूतांना बोलावून खडे बोल सुनावले. भारतीय जनता पक्षानं केलेली टिप्पणी अस्विकारार्ह असल्याचं पाकिस्ताननं म्हटलं आहे. जगभरातील मुस्लीमांच्या भावना या विधानामुळे दुखावल्या गेल्याचा दावा पाकिस्ताननं केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय मुस्लिमांचे अधिकार हिरावून घेतले जात असून त्यांच्यावर अन्याय होत असल्याचं म्हटलं आहे. 

अधिक वाचा - UPSC CDS Topper : मध्यमवर्गीय कुटुंबातील तरुण युपीएससीत टॉपर, ड्रायव्हर आणि दुकानदाराच्या मुलांनी ‘करून दाखवलं’

अफगाणिस्तान

अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारनं या विधानावर कडक शब्दात निषेध नोंदवला आहे. भारत सरकारनं अशा विधानांना आणि ती विधानं करणाऱ्यांना थारा देऊ नये, असं तालिबान सरकारनं म्हटलं आहे. 

इराण

इराणनं अद्याप अधिकृत निषेध जाहीर केलेला नाही. मात्र भारतीय राजदूतांना पाचारण करून अशा प्रकारची विधानं सहन केली जाणार नाहीत, असा इशारा दिला आहे. या घटनेचा त्यांनी निषेध नोंदवला आहे. 

ओमान

ओमानने भारतातील भारतीय जनता पक्षाविरोधात आंदोलन करण्याची गरज व्यक्त केली आहे. जगभरातील सर्व मुस्लीम देशांनी एकत्र यावं, असं ओमाननं म्हटलं आहे. 

भारताचं उत्तर

भारतानं जगातील तमाम मुस्लीम राष्ट्रं आणि ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन यांना उत्तर दिलं आहे. टिप्पणी करणारे फ्रिंज इलेमेंट्स आहेत. हे भारत सरकारचे विचार नाहीत. आम्ही सर्व धर्मांचा आदर करतो, अशी प्रतिक्रिया भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी