Myanmar News : आंग सान सू की यांना भ्रष्टाचारासाठी आणखी ६ वर्षांची शिक्षा, १७ वर्ष जेलमध्ये राहावे लागणार

Myanmar court gives 6 more years in jail to Aung San Suu Kyi on corruption charges : म्यानमारच्या सैन्याने पदभ्रष्ट केलेल्या नेत्या आंग सान सू की यांना भ्रष्टाचाराच्या एका आरोपात दोषी ठरवून सहा वर्षांची शिक्षा ठोठावली. याआधी आंग सान सू की यांना देशद्रोह प्रकरणी दोषी ठरवून अकरा वर्षांची शिक्षा ठोठावली आहे.

Myanmar court gives 6 more years in jail to Aung San Suu Kyi on corruption charges
आंग सान सू की यांना भ्रष्टाचारासाठी आणखी ६ वर्षांची शिक्षा  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • आंग सान सू की यांना भ्रष्टाचारासाठी आणखी ६ वर्षांची शिक्षा
  • आंग सान सू की यांना १७ वर्ष जेलमध्ये राहावे लागणार
  • म्यानमारमध्ये २०२१ मध्ये सुरू झालेली लष्करशाही आता आणखी बळकट झाली

Myanmar News : म्यानमारच्या सैन्याने पदभ्रष्ट केलेल्या नेत्या आंग सान सू की यांना भ्रष्टाचाराच्या एका आरोपात दोषी ठरवून सहा वर्षांची शिक्षा ठोठावली. याआधी आंग सान सू की यांना देशद्रोह प्रकरणी दोषी ठरवून अकरा वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. यामुळे आता आंग सान सू की यांना सतरा वर्षे जेलमध्ये राहावे लागणार आहे. 

नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या आंग सान सू की या ७७ वर्षांच्या आहेत. त्यांना १७ वर्षांची शिक्षा झाली आहे. आणखी काही प्रकरणांमध्ये पुढील काही दिवसांत शिक्षा जाहीर होण्याची शक्यता आहे.

आंग सान सू की यांच्या सत्तेत असलेल्या नॅशनल लीग फॉर डेमोक्रसी या पक्षाने देशात झालेल्या निवडणुकीत पुन्हा एकदा मोठा विजय मिळवला होता. या विजयाच्या जोरावर आंग सान सू की सत्तेवरील आपली पकड मजबूत करणार याची जाणीव होताच सैन्याने बंड केले. आंग सान सू की आणि त्यांच्या पक्षाच्या अनेक नेत्यांना तसेच  कार्यकर्त्यांना भ्रष्टाचार आणि देशद्रोहासारखे गंभीर आरोप ठेवून कैद केले. यानंतर सैन्याने देशाची सत्ता पुन्हा एकदा स्वतःच्या ताब्यात घेतली.

इंग्रजांकडून म्यानमारला १९४८ मध्ये स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर म्यानमारमध्ये लोकशाही पद्धतीने कारभार सुरू होता. मात्र १९६२ मध्ये लष्कराने पहिल्यांदा उठाव केला. काही काळानंतर लष्कराने पुन्हा लोकशाही प्रक्रिया राबवली आणि जवान बराकीत निघून गेले. मात्र १९८८ मध्ये पुन्हा परिस्थिती चिघळली. लष्कराने उठाव केला. यावेळी दीर्घकाळ लष्करशाही अस्तित्वात होती. अखेर २०११ मध्ये निवडणूक झाली. आंग सान सू की यांच्या नॅशनल लीग फॉर डेमोक्रसी या पक्षाने ही निवडणूक जिंकून देशात सत्ता स्थापन केली. यानंतर म्यानमारमध्ये नोव्हेंबर २०२० मध्ये दुसऱ्यांदा सार्वत्रिक निवडणूक झाली. याआधी रोहिंग्यांच्या प्रश्नावरुन अस्थिर वातावारण निर्माण झाल्यामुळे वारंवार निवडणूक पुढे ढकलली जात होती. नोव्हेंबरच्या निवडणुकीत पुन्हा एकदा आंग सान सू की यांच्या नॅशनल लीग फॉर डेमोक्रसी या पक्षाचा विजय झाला. आधीच्या निवडणुकीतील विजयापेक्षा मोठा विजय नोव्हेंबरच्या निवडणुकीत मिळाला. जवळपास ८० टक्के मते मिळवत नॅशनल लीग फॉर डेमोक्रसी या पक्षाने सत्ता स्थापन केली. आंग सान सू की यांना पुन्हा एकदा देशाचा पाठिंबा मिळाला. 

निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांचा समावेश असलेली नवी लोकसभा सोमवारी सकाळी कामकाज सुरू करणार होती. मात्र काही तास आधीच म्यानमारमध्ये लष्करी उठाव झाला. म्यानमारमध्ये २०२१ मध्ये सुरू झालेली लष्करशाही आता आणखी बळकट झाली आहे. विरोधकांना जेलमध्ये टाकणे अथवा ठार करणे या पद्धतीने विरोध मोडून काढला जात आहे.

आंग सान सू की यांच्या विरोधातील खटला बंद दाराआड निवडक लोकांच्या उपस्थितीत चालविण्यात आला. आंग सान सू की यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळले पण कोर्टाने दोषी ठरवत आंग सान सू की यांना शिक्षा ठोठावली. लवकरच म्यानमारचे लष्कर एक नवा कायदा करून आंग सान सू की यांच्या नॅशनल लीग फॉर डेमोक्रसी या पक्षाला विसर्जित करण्याची शक्यता आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी