मोदींच्या मंत्रिमंडळातील एका मंत्र्याचा राजीनामा, श्रीकांत शिंदेंची केंद्रात वर्णी?

पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळातून दोन नेत्यांना डच्चू मिळण्याची जोरदार चर्चा राजधानी दिल्लीत सुरु आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांना केंद्रात मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

naqvi rcp singh may resign from modi cabinet shrikant shinde is likely to become a minister at center
दोन मंत्र्यांची विकेट पडणार, श्रीकांत शिंदेंची लागणार वर्णी? 
थोडं पण कामाचं
  • मोदींच्या मंत्रिमंडळातील दोन मंत्र्यांना डच्चू मिळणार?
  • दिल्लीच्या राजकारणातील नवी चर्चेने, महाराष्ट्राच्या सत्ताधाऱ्यांचंही लक्ष वेधलं
  • एकनाथ शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदेंची केंद्रात मंत्रिपदी लागणार वर्णी?

नवी दिल्ली: महाराष्ट्रात (Maharashtra) नुकतंच एक सत्तांतर घडलं असून यावेळी अनेक धक्कादायक असे डावपेच पाहायला मिळाले. त्यामुळे राज्याचं संपूर्ण राजकारण (Politics) हे अक्षरश: ढवळून निघालं आहे. असं असताना आता दिल्लीच्या (Delhi) राजकारणातील एक ताजी चर्चा आता समोर आली आहे. ज्यामुळे पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आलं आहे. 

त्याचं झालं असं की, मोदींच्या मंत्रिमंडळातील (Modi Cabinet) मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आपल्या केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. याशिवाय आरसीपी सिंह यांना देखील आपलं मंत्रिपद सोडावं लागणार असल्याची जोरदार चर्चा सध्या दिल्लीत सुरु आहे.  

नक्वी आणि सिंह यांचा राज्यसभेचा कार्यकाळ गुरुवारी संपत आहे. अशा स्थितीत नक्वी यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. तर सिंह हे आज किंवा उद्या मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. खरे तर बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही मंत्र्यांचे कौतुक केले. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळ बैठकीत पंतप्रधान म्हणाले की, 'दोन्ही मंत्र्यांनी देशाच्या विकासात मोठे योगदान दिले आहे.' इतकंच नाही तर पंतप्रधानांनी त्यांच्या एका ट्विटमध्ये आरसीपी सिंह यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधानांच्या या सगळ्या वक्तव्यांमुळे नक्वी आणि सिंह यांना राज्यसभा खासदार म्हणून निरोप दिला जाणार असल्याचं निश्चित झालं.

अधिक वाचा: 'आम्ही तर मंत्रिपद सोडलं;, गुलाबराव आले फॉर्मात

राज्यसभा निवडणुकीत पुन्हा संधी नाही

नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीच्या वेळी या दोन्ही नेत्यांना राज्यसभेवर जाण्याची दुसरी संधीच देण्यात आली नाही. दोन्ही नेत्यांची मंत्री म्हणून ही शेवटची बैठक असल्याचे संकेत आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आले होते. पंतप्रधानांनी दोघांबाबत जी काही वक्तव्य केली ती निरोपाच्या भाषणासारखीच होती. 

आरसीपी सिंह हे जेडीयू कोट्यातून बिहारमधून खासदार झाले होते. तर नक्वी हे भाजपच्या कोट्यातून झारखंडमधून राज्यसभेचे खासदार म्हणून निवडून आले होते. 

दरम्यान, नक्वी यांनी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली होती. मात्र, त्यानंतर आता नक्वी यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. 

नक्वी यांच्याकडे कोणती भूमिका सोपावली जाईल याबाबत संभ्रम

नक्वी यांच्यासाठी सरकारमधील पुढील भूमिका काय असेल याबाबत अद्याप कोणतंही चित्र स्पष्ट झालेले नाही. सुरुवातीला रामपूरच्या पोटनिवडणुकीसाठी त्यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा होती, मात्र त्यांना येथून उमेदवारी देण्यात आली नाही. 

आता नक्वी यांना उपराष्ट्रपती किंवा कोणत्याही केंद्रशासित प्रदेशाच्या लेफ्टनंट गव्हर्नरपदासाठी एनडीएचे उमेदवार बनवले जाण्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. 

मंत्रिपदासाठी श्रीकांत शिंदेंच्या नावाची जोरदार चर्चा 

एकीकडे दोन मंत्र्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागू शकतो अशी दिल्लीत चर्चा सुरु असताना इकडे महाराष्ट्रात याच मुद्द्यावरुन एका वेगळ्याच चर्चेला उधाण आलं आहे. रिक्त होणाऱ्या दोन मंत्रिपदांपैकी एका ठिकाणी शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

खासदार श्रीकांत शिंदे यांचे वडील एकनाथ शिंदे यांनी नुकतंच महाराष्ट्रात बंड करुन भाजपच्या साथीने सत्ता मिळवली आहे. त्यामुळेच आता याचीच बक्षिसी म्हणून त्यांच्या मुलाला देखील आरोग्य किंवा त्याच्याशी संबंधित खात्याचं मंत्री पद मिळणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी