Sushant Singh Rajput Case : रिया चक्रवर्ती आणि भाऊ शौविकसह इतरांविरोधात NCB नं दाखल केलं चार्जशिट, 12 जुलैला होणार सुनावणी

सुशांत सिंगने आत्महत्या केली की त्याची हत्या करण्यात आली, याचे उत्तर अद्याप सीबीआयला मिळालेले नाही. मात्र या प्रकऱणी NCB करत असलेल्या तपासाची चक्रं वेगाने फिरत असून रिया चक्रवर्तीविरोधात चार्जशिट दाखल करण्यात आलं आहे.

Sushant Singh Rajput Case
रिया चक्रवर्ती, शौविकवर NCB कडून चार्जशिट दाखल  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • रिया चक्रवर्ती व भाऊ शौविकविरोधात चार्जशिट
  • ड्रग्ज खरेदी करून सुशांतला पुरवल्याचा आरोप
  • पुढील सुनावणी 12 जुलै रोजी

Sushant Singh Rajput Case | अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूचं गूढ अद्याप उकललं नसून या प्रकरणाची गुंतागुंत दिवसेंदिवस वाढतच चालल्याचं चित्र आहे. सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणात अंमली पदार्थांच्या दृष्टीनेही तपास सुरू असून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या तपासाला वेग आल्याचं चित्र आहे. NCB कडून रिया चक्रवती, तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती आणि इतर आरोपींविरोधात चार्जशिट दाखल केलं आहे. या सर्व आरोपींविरोधात स्पेशल कोर्टात ड्राफ्ट चार्ज फाईल करण्यात आले आहेत. या सर्वांवर सुशांतसाठी ड्रग्ज विकत घेतल्याचा आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार यावरील सुनावणीसाठी रिया आणि शौविक हे न्यायालयात हजर होते. 

12 जुलैला होणार सुनावणी

चार्जशिटमध्ये सर्व आरोपींवरील आरोप निश्चित कऱण्यात आल्याची माहिती या प्रकऱणातील सरकारी वकील अतुल सरपंदे यांनी दिली आहे. रिया आणि शौविक यांचा ड्रग्जचा वापर केल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. या दोघांनी अंमली पदार्थ खरेदी केले आणि ते सुशांत सिंग राजपूतपर्यंत पोहोचवले, असा आरोप यात ठेवण्यात आला आहे. 

न्यायालयात सर्वांवर आरोपनिश्चितीची प्रक्रिया होणार होती, मात्र काही आरोपींनी डिस्चार्ज ॲप्लिकेशन दाखल केल्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण होऊ न शकल्याची माहिती सरकारी वकिलांनी दिली. त्यामुळे कोर्टाकडून कुठलाही निर्णय देण्यात आला नाही. डिस्चार्ज ॲप्लिकेशन्सवर निर्णय झाल्यानंतरच आरोप निश्चितीची प्रक्रिया करण्यात यावी, अशी सूचना कोर्टानं केली. विशेष न्यायाधीश व्ही. जी. रघुवंशी यांच्यासमोर पुढील प्रकरणाची सुनावणी होणार असून पुढील सुनावणी 12 जुलै रोजी होणार आहे. 

अधिक वाचा - India Covid Update: देशात आली कोरोनाची चौथी लाट! ४ महिन्यानंतर प्रथमच सापडले १७ हजारांहून अधिक रूग्ण 

सीबीआय करतेय तपास

14 जून 2020 रोजी सुशांत सिंग राजपूत यांने राहत्या घरी आत्महत्या केल्याचं निष्पन्न झालं होतं. त्यानंतर NCB कडून या मृत्यूचा ड्रग्जशी काही संबंध आहे का, या दिशेने तपास सुरू केला होता. सप्टेंबर 2020 मध्ये रिया चक्रवर्तीला या प्रकरणात अटक करण्यात आली होती. जवळपास एक महिना तुरुंगात राहिल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने तिला जामीन दिला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून सीबीआयकडे या प्रकरणाचा तपास आहे. 

अधिक वाचा - Europe Tour : या युरोपीय देशांत रुपयाचा बोलबाला, स्वस्तात होईल आठवड्याची सहल

अद्यापही काहीच सुगावा नाही

सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केली की त्याची हत्या करण्यात आली, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. त्याची आत्महत्या नसून हत्या असल्याचा दावा काहीजणांकडून करण्यात आला होता. त्यामुळे याचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. मात्र अद्याप ही हत्या की आत्महत्या याबाबत कुठलाच सुगावा सीबीआयला लागलेला नाही. हे प्रकरण माध्यमांमध्ये जोरदार गाजलं होतं. या प्रकरणाचा राजकीय कारणासाठीही उपयोग करून घेण्यात येत असल्याचे आरोप झाले होते. आता या प्रकरणावरची धूळ खाली बसली असली, तरी अद्याप या हत्येबाबत मात्र कुठलाही उलगडा करण्यात सीबीआयला यश आलेलं नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी