राष्ट्रवादी काँग्रेसला लवकरच आणखी एक धक्का बसण्याची शक्यता 

लोकल ते ग्लोबल
Pooja Vichare
Updated Aug 21, 2019 | 11:44 IST

विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना पक्ष बदलाचे वारे वाहतच असतात. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसला एकामागोमाग एक झटके बसण्याची शक्यता आहे. कारण राष्ट्रवादीतील एक नेता भाजपच्या वाटेवर आहे. 

Sharad Pawar file photo
राष्ट्रवादी काँग्रेसला लवकरच आणखी एक धक्का बसण्याची शक्यता  
थोडं पण कामाचं
  • विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना पक्ष बदलाचे वारे वाहू लागले आहेत.
  • विधानसभा निवडणुकीच्या वेळी सुद्धा राष्ट्रवादीला धक्का बसण्याची शक्यता आहे.
  • राष्ट्रवादी काँग्रेसचा आणखी एक नेता भाजपच्या गळाला लागण्याची शक्यता आहे. 
  • राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एकदा खिंडार पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
  • माजी खासदार धनंजय महाडिक हे सुद्धा महिन्याच्या शेवटी भाजपमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता आहे.

मुंबईः विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना पक्ष बदलाचे वारे वाहू लागले आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर पक्षांतराचं सत्र अजूनही सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसला एकामागोमाग एक बरेच धक्के सहन करावे लागेल. त्यातच आता विधानसभा निवडणुकीच्या वेळी सुद्धा राष्ट्रवादीला धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण आताच समोर आलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचा आणखी एक नेता भाजपच्या गळाला लागण्याची शक्यता आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एकदा खिंडार पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधले अनेक नेते आणि कार्यकर्ते भाजप- शिवसेनेच्या वाटेवर आहेत, अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. त्यातच कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक हे सुद्धा महिन्याच्या शेवटी भाजपमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवली जाते. 

मुख्यमंत्र्यांची घेतली भेट 

धनंजय महाडिक यांनी मे महिन्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. भाजपशी केलेल्या जवळीकीमुळेच महाडिक यांना कोल्हापूर मतदारसंघात पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. आता तर ते थेट भाजपमध्येच प्रवेश करतील, अशी चर्चा रंगली आहे. 

भाजपशी जवळीक

कोल्हापुरात २०१४मध्ये मोदी लाटेतही राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ वाजलं होतं. धनंजय महाडिक यांचा गट आणि काँग्रेस राष्ट्रवादीची बालेकिल्ल्यातील ताकद यामुळे महाडिक यांचा विजय साकार झाला होता. पण, पाच वर्षांत महाडिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमांना हजेरी लावली नाही. तसेच कोल्हापूर महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांनी पक्ष विरोधी भूमिका घेतली. त्याची किंमत महाडिक यांना लोकसभा निवडणुकीत मोजावी लागली. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी त्यांना निवडणुकीत साथ दिली नाही. त्यांनी उघड उघड महाडिक यांचा प्रचार केला असला तरी, त्यांच्या गटांचे मतदान शिवसेनेच्या संजय मंडलिक यांनाच झाले. त्यामुळेच नाराज असलेल्या धनंजय महाडिक यांनी भाजपची वाट धरली असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू होती.  दरम्यान धनंजय महाडिक यांनी राष्ट्रवादीला पक्षाला रामराम केला तर पक्षाला जबरदस्त धक्का बसेल. 

उदयनराजे भोसले भाजपच्या वाटेवर?

त्यातच छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट मुंबईत भेट घेतल्यानंतर उदयनराजे भोसले यांनी भाजप प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. काही दिवसांपूर्वी उदयनराजे भोसलेंचे बंधू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी भाजपत प्रवेश केला. त्यानंतर आता उदयनराजेच भाजत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. उदयनराजे भोसले यांनी भाजपत प्रवेश केल्यास त्याचा मोठा फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसणार हे निश्चित आहे.

रामराजे निंबाळकर भाजपच्या वाटेवर

तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर हे सुद्धा भाजपच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे. रामराजे निंबाळकर आणि शरद पवार यांचे खूप जवळचे संबंध आहेत. मात्र, आता हेच रामराजे निंबाळकर राष्ट्रवादीचं घड्याळ सोडून भाजपचं कमळ हाती घेणार असल्याची जोरदार चर्चा आहे.साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्यासोबत असलेल्या वादामुळेच रामराजे निंबाळकर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम करणार असल्याचं बोललं जात आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी