Netaji Subhas Chandra Bose grand statue, will be installed at India Gate, tweets PM Modi : नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करुन आज (शुक्रवार २१ जानेवारी २०२२) महत्त्वाची माहिती दिली. दिल्लीत इंडिया गेटजवळ नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा ग्रॅनाइटचा भव्य पुतळा उभारण्यात येणार असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केले. सुभाषचंद्र बोस यांच्या १२५व्या जयंतीचे औचित्य साधून पुतळा उभारण्यात येणार आहे.
पंतप्रधान मोदी यांनी ही घोषणा करताच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ट्वीट करुन पंतप्रधानांच्या घोषणेचे जाहीर स्वागत केले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा २८ फूट उंच आणि सहा फूट रूंद असेल. इंडिया गेट येथे चार खांबांचा एक मंडप आहे. या ठिकाणी आधी पाचव्या जॉर्ज राजाचा पुतळा होता. इंग्रजांच्या काळात उभारण्यात आलेला हा पुतळा १९६८ मध्ये डटविण्यात आला. यानंतर मंडपात पुतळ्याची जागा रिक्त झाली, तिथे अद्याप कोणाचाही पुतळा उभारण्यात आलेला नाही. यामुळे मंडपात आता नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा येणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
देश रविवार २३ जानेवारी २०२२ रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची १२५वी जयंती साजरी करणार आहे. या शुभ प्रसंगी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा इंडिया गेट येथे असल्यास आनंद द्विगुणीत होईल; अशा शब्दांत आपल्या भावना पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केल्या.
काँग्रेस पक्षासाठी पंतप्रधान मोदी यांचा निर्णय एक वैचारिक धक्का असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस क्रांतिकारी विचारांचे होते. दुसऱ्या महायुद्धात लढत असलेल्या इंग्रजांविरोधात सशस्त्र उठाव केला तर देशाला लवकर स्वातंत्र्य मिळेल असा विश्वास सुभाषचंद्र बोस यांना वाटत होता. त्यांच्या या विचारांना मोहनदास करमचंद गांधी यांचा तसेच पं. जवाहरलाल नेहरू यांचा विरोध होता. यामुळेच आता नेताजींचा पुतळा उभारला जाईल तेव्हा काँग्रेसची अधिकृत भूमिका काय असणार हा चर्चेचा विषय झाला आहे.
केंद्र सरकारने अमर जवान ज्योत दिल्लीतल्या युद्ध स्मारकाच्या ज्योतीत विलीन करण्याचा निर्णय घेतला आहे. सैन्यातील अनेक आजी-माजी अधिकाऱ्यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. पण काँग्रेसने या निर्णयाला विरोध केला आहे. अमर जवान ज्योत वरुन मोदी सरकार विरुद्ध काँग्रेस असे चित्र निर्माण झाले असतानाच नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याबाबतची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली आहे.