Infant buried : देव तारी त्याला कोण मारी, या म्हणीचा प्रत्यय गुजरातमध्ये (Gujrat) घडलेल्या एका घटनेच्या निमित्ताने सर्वांना आला. गुजरातच्या साबरकांठा (Sabarkantha) भागात एका नवजात बालकाला (Newborn baby) जिवंत असताना जमिनीत गाडण्यात (Buried) आलं होतं. मात्र जमिनीखाली राहूनही ते जिवंत (Alive) राहिलं. या बाळाला ना कुठल्या प्राण्याने इजा पोहोचवली, ना कुठल्या पक्ष्यांनी त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, ना गुदमरल्यामुळे त्याचा जीव गेला. मातीखाली पुरलेल्या अवस्थेत राहूनही ते जिवंत राहिलं आणि पुन्हा एकदा निसर्गाच्या चमत्काराची चर्चा सुरू झाली. मात्र त्याचवेळी बाळाला कुणी आणि का पुरलं असावं, याचा विचार सुरू होऊन स्थानिकांना संतापही आला.
गुजरातच्या सांबरकाठा परिसरात राहणारे एक शेतकरी गांभोई नावाच्या गावात शेती करतात. नेहमीप्रमाणे ते आपल्या शेतात गेले होते. त्यावेळी अचानक त्यांना जमिनीतून एक हात बाहेर आल्याचं दिसलं. नवजात बालकाचा हात असल्यामुळे तो फारच छोटा होता आणि हे नेमकं काय आहे, ते दुरून त्यांना नीटसं समजलं नाही. त्यासाठी ते जवळ गेले आणि बाहेर आलेला हात मानवी आहे की इतर काही याची खातरजमा त्यांनी केली. त्यावेळी हा छोट्या बाळाचा हात असल्याचं त्यांना दिसलं. त्यांनी आजूबाजूची माती हळूवारपणे दूर करत बाळाला बाहेर काढलं आणि हातात घेतलं. हे बाळ जिवंत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. एवढे दिवस जमिनीत गाडलं गेलं असूनही हे बाळ जिवंत असणं हा निसर्गाचा चमत्कारच आहे, असं त्यांना वाटलं. त्यांनी बाळावर तातडीने उपचार करण्याचा निर्णय घेतला. त्याला अँब्युलन्समधून शेजारच्या शहरातील हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं.
डॉक्टरांनी बाळाची तपासणी केली असून त्याची प्रकृत्ती उत्तम असल्याचं म्हटलं आहे. केवळ त्याला श्वास घेण्यात काही अडचणी येत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. इतके दिवस जमिनीखाली गाडले गेल्यामुळे त्याच्या श्वसनाच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण झाले आहेत. मात्र लवकरच हे बाळ ठणठणीत बरं होणार असून त्याला अनाथाश्रमात दाखल केलं जाणार आहे.
अधिक वाचा - Vice Presidential Election : उपराष्ट्रपतीपदासाठी शनिवारी मतदान
एखाद्या बाळाला जन्म दिल्यावर त्याला जिवंतपणीच जमिनीत गाडून टाकावं, असं एखाद्या आईवडिलांना का वाटत असावं, असा प्रश्न या निमित्ताने चर्चिला जात आहे. बाळाला नऊ महिने पोटात वाढवायचं आणि त्याचा जन्म झाल्यावर त्याला असं गाडून टाकताना त्याच्या आईला काहीच वाटत नसेल का, अशीही चर्चा सुरू झालीय. आईला फसवून कुणी या बाळाला बाहेर आणून गाडून टाकण्याचा प्रयत्न केला असेल का, याचीही शक्यता काहीजण व्यक्त करत आहेत.
या मुलाच्या आईवडिलांचा शोध घ्यायला पोलिसांनी सुरुवात केली आहे. बाळाचा खून करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा त्याच्या आईवडिलांविरोधात दाखल कऱण्यात आला आहे.