निर्भयाच्या गुन्हेगारांच्या फाशीचा मार्ग मोकळा, सुप्रीम कोर्टाने पुनर्विचार याचिका फेटाळली

लोकल ते ग्लोबल
Updated Jan 14, 2020 | 16:29 IST | टाइम्स नाऊ मराठी

२०१२मध्ये दिल्लीत झालेल्या निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणात आज दोषींची पुनर्विचार याचिका फेटाळली आहे. त्यामुळे आता या नराधमांना फाशी देण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

Nirbhaya rape and murder case: SC dismissed the curative petition by 2 convicts
निर्भयाच्या गुन्हेगारांच्या फाशीचा मार्ग मोकळा, सुप्रीम कोर्टाने पुनर्विचार याचिका फेटाळली   |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • २०१२मध्ये दिल्लीत झालेल्या निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणात आज दोषींची पुनर्विचार याचिका फेटाळली आहे.
  • या नराधमांना २२ जानेवारीला सकाळी सात वाजता फाशी दिली जाणार आहे.
  • पतियाळा हाऊस कोर्टाने दोषींना डेथ वॉरंट जारी केल्यानंतर दोषी विनय कुमार आणि मुकेश कुमार या दोघांनी सुप्रीम कोर्टात धाव घेत पुनर्विचार याचिका दाखल केली.

नवी दिल्ली: २०१२मध्ये दिल्लीत झालेल्या निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणात आज दोषींची पुनर्विचार याचिका फेटाळली आहे. त्यामुळे आता या नराधमांना फाशी देण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. या नराधमांना २२ जानेवारीला सकाळी सात वाजता फाशी दिली जाणार आहे. दोषींनी दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेवर सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायाधीशांनी सुनावणी केली. या प्रकरणातील जिवंत असलेल्या चार दोषींपैकी विनय शर्मा आणि मुकेश कुमार या दोन दोषींनी फाशीच्या शिक्षेविरोधात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. त्यावर आज सुनावणी करत ही याचिका आज सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे.

पतियाळा हाऊस कोर्टाने दोषींना डेथ वॉरंट जारी केल्यानंतर दोषी विनय कुमार आणि मुकेश कुमार या दोघांनी सुप्रीम कोर्टात धाव घेत पुनर्विचार याचिका दाखल केली. न्यायधीश एन व्ही रमण्णा, न्यायाधीश अरूण मिश्रा, न्यायाधीश आर एफ नरीमन, न्यायाधीश आर भानुमती आणि न्यायाधीश अशोक भूषण यांच्या खंडपीठाने एकमताने दोषींची पुनर्विचार याचिका फेटाळून लावली आहे.

दोषींकडे उरला आहे एकच पर्याय

पुनर्विचार याचिका हा न्यायालयाकडून दोषींसाठी पर्याय असतो. पुनर्विचार याचिका फेटाळल्यानंतर राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल करण्याचा एकमेव पर्याय दोषींकडे आहे. राष्ट्रपती राज्यघटनेतील अनुच्छेद-७२ आणि राज्यपाल अनुच्छेद-१६१नुसार दया याचिकेवर सुनावणी घेऊ शकतात. यादरम्यान राष्ट्रपती गृहमंत्रालयाकडून अहवाल मागवतात. मंत्रालयाकडून राष्ट्रपतींना शिफरस पाठवली जाते आणि त्यानंतर राष्ट्रपती दया याचिका निकाली काढतात. राष्ट्रपतींनी दया याचिका फेटाळून लावली तर गुन्हेगारांच्या फाशीचा मार्ग मोकळा होतो. दया याचिका निकाली काढण्यात अकारण विलंब झाला तर त्याआधारे गुन्हेगार पुन्हा सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल करू शकतो.

या प्रकरणातील गुन्हेगार विनयने दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेत सामाजिक, आर्थिक परिस्थिती, त्याचे आजारी आई-वडील आणि कुटुंबातील अवलंबून असलेल्या व्यक्ती, तुरूंगातील चांगले वर्तन आणि त्यात सुधारण्याची शक्यता या सर्वांचा विचार केला गेला नाही आणि त्यामुळे माझ्यासोबत न्याय झाला नाही असे म्हटले होते.

निर्भयाची आई आशा देवी यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर समाधान व्यक्त केले आहे. “मी सात वर्षांपासून संघर्ष करत आहे. मात्र सर्वात मोठा दिवस २२ जानेवारी हा असेल. त्यादिवशी दोषींना फाशी दिली जाणार आहे”, असे त्या म्हणाल्या आहेत. सुनावणीअगोदर निर्भयाच्या आईने पुनर्विचार याचिका फेटाळली जावी अशी अपेक्षा व्यक्त केली होती. “प्रकरणाची प्रक्रिया रोखण्यासाठी त्यांनी ही पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. मला अपेक्षा आहे की, त्यांची याचिका फेटाळली जाईल. त्यांना २२ जानेवारीला फाशी होईल आणि निर्भयाला न्याय मिळेल”, असे त्या म्हणाल्या.

 

 

विनय आणि मुकेशसह इतर दोन दोषी पवन आणि अक्षय यांनाही २२ जानेवारी रोजीच सकाळी सात वाजता फाशी दिली जाणार आहे. एकूणच या प्रकरणात आता दोषींना कोणतीही पळवाट उरलेली नाही. तेव्हा २२ जानेवारीची पहाट त्यांच्यासाठी शेवटची ठरेल यात शंका नाही. १६ डिसेंबर २०१२ रोजी रात्री दिल्लीमध्ये एका चालत्या बसमध्ये २३ वर्षीय निर्भयावर अमानवी बलात्कार करून तिची हत्या करण्याचा प्रयत्न या नराधमांनी केला होता. काही दिवसांनी सिंगापूरमधील एका रूग्णालयात तिचा मृत्यू झाला होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी