Railway Half Ticket : ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे प्रवासासाठी हाफ तिकीट सुरु? छे छे, ही तर अफवा!

ज्येष्ठ नागरिक आणि हाफ तिकीट हे गेल्या कित्येक वर्षांचं समीकरण कोरोनाच्या काळात बंद पडलं. आता सगळं काही सुरळीत होत असताना रेल्वेकडून ज्येष्ठ नागरिकांना हाफ तिकीटाची सुविधा सुरू होत असल्याच्या बातम्या माध्यमात झळकल्या होत्या. मात्र त्या खोडसाळ आणि खोट्या असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे.

Railway Half Ticket
ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे प्रवासासाठी हाफ तिकीट सुरु?  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • रेल्वे प्रवासात ज्येष्ठ नागरिकांना हाफ तिकीट नाही
  • माध्यमात आलेले वृत्त खोडसाळपणाचे आणि चुकीचे
  • केंद्र सरकारने दिले स्पष्टीकरण

Railway Half Ticket | भारतीय रेल्वेकडून (Indian Railway) ज्येष्ठ नागरिकांना (Senior Citizens) अर्ध्या तिकीटात (Half Ticket) प्रवास करण्याची सवलत पुन्हा सुरू करण्यात आल्याचं वृत्त खोडसाळ आणि चुकीचं असल्याचं केंद्र सरकारच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे. येत्या 1 जुलैपासून ज्येष्ठ नागरिकांना अर्ध्या तिकीटात प्रवास करता येईल, अशा बातम्या काही प्रसारमाध्यमांत झळकल्या होत्या. त्यामुळे देशभरातील ज्येष्ठ नागरिकांमध्ये आशेचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र प्रत्यक्षात असं काहीही घडणार नसल्याचं केंद्र सरकारच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे. माहिती प्रसारण खात्याच्या प्रेस ब्युरोनं आपल्या ‘फॅक्ट चेक’ हँडलवर ही बाब जाहीर केली आहे. 

कोरोनापूर्वी सुरू होती सवलत

कोरोनापूर्व काळात रेल्वेनं प्रवास करताना ज्येष्ठ नागरिकांसाठी तिकीटाच्या दरात सवलत दिली जात होती. वयाची 58 वर्षं पूर्ण केलेल्या महिलांना रेल्वे प्रवासासाठीच्या तिकीटात 50 टक्के सवलत दिली जायची, तर 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना तिकीट दरात 40 टक्के सवलत दिली जात होती. कोरोना काळात अनेक रेल्वे गाड्या बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याच काळात ही सवलतदेखील बंद करण्यात आली. आता रेल्वेचं वेळापत्रक सुरळीत होऊन काही महिने लोटले असले तरी अद्याप ज्येष्ठ नागरिकांना पूर्ण तिकीट काढूनच प्रवास करावा लागतो. केंद्र सरकार ही सवलत पुन्हा लागू करेल आणि ज्येष्ठ नागरिकांना दिलासा देईल, अशी आशा अनेकांना वाटत होती. त्यामुळेच प्रसारमाध्यमांत याबाबतची बातमी आल्यानंतर ती खरी आहे, असं अनेकांना वाटतं. मात्र सरकारी पातळीवर खातरजमा केल्यावर ही बातमी खोटी असून खोडसाळपणे कुणीतरी हे वृत्त पसरवल्याचं समोर आलं आहे. 

अधिक वाचा - Agneepath scheme: कृषी कायद्यांप्रमाणे अग्निपथ योजना देखील मागे घ्यावी लागेल - राहुल गांधी

अपंगांची सवलत सुरू

शारीरिकदृष्ट्या अपंग व्यक्तींना रेल्वेच्या तिकीटात सवलत दिली जाते. ही सवलत रेल्वेनं अद्यापही सुरूच ठेवली आहे. शारीरिक अपंग, रुग्ण आणि विद्यार्थी यांना मिळणारी सवलत अबाधित आहे. मात्र ज्येष्ठ नागरिकांना मिळणारी सवलत बंद करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या तिजोरीवर भार येत असल्यामुळे सध्या तरी ही सवलत सुरू होण्याची कुठलीही शक्यता नसल्याचं रेल्वे खात्यातील सूत्रांनी म्हटलं आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना सध्या तरी पूर्ण तिकीट काढूनच रेल्वेचा प्रवास करावा लागणार आहे. केंद्र सरकारने पूर्वीची ही सवलत लवकरात लवकर लागू करावी, अशी अपेक्षा रेल्वे प्रवासी व्यक्त करत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी