लस वितरणात राजकारण नाही, महाराष्ट्राला सर्वाधिक लस पुरवठा ; केंद्रीय आरोग्यमंत्री

कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आणि लसीच्या तुटवड्यामुळे लसीकरणाला आलेली संथ गती यावरुन केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात कुलगीतुरा बघायला मिळाला.

No politics in vaccine distribution, maximum vaccine supply to Maharashtra Union Health Minister
लस वितरणात राजकारण नाही - केंद्रीय आरोग्यमंत्री  |  फोटो सौजन्य: Indiatimes

थोडं पण कामाचं

  • राज्य सरकारांनी तीन महिन्यांपर्यंत फक्त राजकारण केले
  • लसींचा पुरवठा करण्यात राजकारण नाही - हर्ष वर्धन राठोड
  • महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान या तीन राज्यांना १ कोटींपेक्षा जास्त लसींचा पुरवठा

नवी दिल्ली : कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आणि लसीच्या तुटवड्यामुळे लसीकरणाला आलेली संथ गती यावरून केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात कुलगीतुरा बघायला मिळाला. केंद्राकडून लस वितरणात दुजाभाव होत असल्याचा आरोप राज्यातून केला गेला. तर दुसरीकडे केंद्राकडून राज्याचे आरोप फेटाळून लावण्यात आले होते. लस वाटपावरून पेटलेल्या मुद्द्यावर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी भूमिका मांडली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी एका कार्यक्रमात बोलताना लस तुटवडा आणि पुरवठ्यावरून सुरू असलेल्या वादावर भाष्य केले आहे.

हर्ष वर्धन म्हणाले,”अनेक लसीकरण केंद्रावर लस संपल्याचे सांगितले जात आहे, पण केंद्र सरकार थेट लसीकरण केंद्रापर्यंत लस पुरवठा करत नाही. केंद्र राज्य सरकारला लस पुरवठा करते. त्यानंतर लसीकरण केंद्रापर्यंत लस घेऊन जाणे राज्य सरकारची जबाबदारी आहे. निर्धारित वेळेत लसीचे डोस लसीकरण केंद्रापर्यंत घेऊन जाणे हे राज्य सरकारचे काम आहे. यात जर कुठल्या राज्याने नियोजन केलेले नसेल आणि लसीचे डोस खराब होत असतील, तर ते राज्य सरकारचे अपयश आहे. लस वितरणात कोणतेही राजकारण केले जात नाहीये,” असे हर्ष वर्धन यांनी सांगितले.

 

लस वितरण लोकसंख्येनुसार होत नाही
 

महाराष्ट्र राज्यालाला कमी  लसींचा पुरवठा केला जात असल्याचा आरोप राज्य सरकार केला होता. या आरोपांचे खंडन हर्ष वर्धन यांनी केले आहे.  ''आज जरी बघितले, तर सर्वाधिक लसीचे डोस कुणाला दिले असेल, ते महाराष्ट्राला दिले आहेत. महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान या तीन राज्यांना १ कोटींपेक्षा जास्त लसीचे डोस पुरवण्यात आले आहेत. लस वितरणात लोकसंख्येचा निकष नाही. लोकसंख्येचा विचार करायला गेले, तर मग सर्वाधिक लस उत्तर प्रदेशला मिळायला हवी होती. पण, तसे झालं नाही,” अशी भूमिका केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी मांडली.

राज्य सरकारांचे राजकारण 


राज्यांना दिल्या जाणाऱ्या लसींच्या वितरणावर बोलताना केंद्रीय आरोग्यमंत्री म्हणाले,”कोव्हॅक्सिनवरून महाराष्ट्र आणि छत्तीसगढमध्ये राजकारण केले जात आहे. छत्तीसगढमध्ये आम्ही जानेवारीमध्ये कोव्हॅक्सिन लसीचे डोस पाठवले होते. दोन महिन्यांपर्यंत त्यांनी लसीकरणच सुरू केले नाही. मी आरोग्यमंत्र्यांना दोन वेळा पत्र पाठवले. मुख्यमंत्र्यांना एक पत्र पाठवलं. कोव्हॅक्सिन लस लोकांना देणार नाही म्हणत तीन महिन्यांपर्यंत फक्त राजकारण करत राहिले.आता मार्च अखेरीपासून लसीकरण सुरू केले आहे,” असेही ते म्हणाले.

काय आहे महाराष्ट्राची  स्थिती 

देशात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्र सातत्याने प्रथम क्रमांकावर असून आज राज्याने त्यात विक्रमी नोंद केली असून आतापर्यंत सुमारे १ कोटीहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे. आतापर्यंत १ कोटी ३८ हजार ४२१ जणांना लस देण्यात आली असून सायंकाळपर्यंत या आकडेवारीत अजून वाढ होईल, असे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप  व्यास यांनी सांगितले. याविक्रमी कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यंत्रणेचे कौतुक केले आहे.  दरम्यान वाढत्या रुग्ण संख्येमुळे रुग्णांना रुग्णालयात बेड मिळत नसल्याची स्थिती आहे. नांदेड जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयं कोरोना रुग्णांनी फुल्ल झाली आहेत. अनेक रुग्णालयामध्ये रुग्णांना बेड मिळत नसल्याने नातेवाईकांची वणवण होत आहे.   

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी