Noida Supertech Twin Tower Demolition To Cost Nearly Rs 20 Crore : भारतात उत्तर प्रदेशमधील नोएडा सेक्टर ९३ ए येथे आहेत सुपरटेक ट्विन टॉवर. या देशातील सर्वात उंच इमारती म्हणून ओळखल्या जातात. सुमारे ७० कोटी रुपये खर्चून बांधलेले हे ट्विन टॉवर २० कोटी रुपये खर्चून पाडले जातील. सुपरटेक ट्विन टॉवर उद्या (रविवार २८ ऑगस्ट २०२२) दुपारी अडीच वाजता नियंत्रित स्फोट करून पाडले जातील. बटण दाबले की दोन सेकंदांनंतर स्फोटांना सुरुवात होईल आणि १० सेकंदात सुपरटेक ट्विन टॉवर जमीनदोस्त होतील. पूर्ण प्रक्रिया १२ सेकंदात पूर्ण होईल.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सुपरटेक ट्विन टॉवर पाडले जातील. ही कारवाई तज्ज्ञांच्या देखरेखीत होईल. ट्विन टॉवर पाडत असताना कोणत्याही जीवितहानी किंवा वित्तहानी होऊ नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे.
जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते
विमान प्रवासादरम्यान चुकूनही करू नका 'या' गोष्टी, अन्यथा...
तुम्हीही डिजिटल पेमेंट करता? मग ही बातमी वाचाच....
सुपरटेक लिमिटेड ही एक खासगी मर्यादीत (लिमिटेड) कंपनी आहे. या कंपनीची स्थापना ७ डिसेंबर १९९५ रोजी झाली. कंपनीची स्थापना आरके अरोड़ा यांनी केली आहे. याच आरके अरोड़ा यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात मिळून ३४ कंपन्या स्थापन केल्या आहेत. नागरी विमान वाहतूक, सल्लागार (कन्सलटन्सी) , शेअरमार्केटमधील ब्रोकर, प्रिटिंग, फिल्म्स, घरांसाठी वित्तपुरवठा (हाउसिंग फायनान्स), बांधकाम (कन्स्ट्रक्शन) अशा वेगवेगळ्या क्षेत्रात व्यवसाय करण्यासाठी आरके अरोड़ा यांनी ३४ कंपन्यांची स्थापना केली. यानंतर आरके अरोड़ा यांची पत्नी संगीता अरोड़ा यांनी सुपरटेक बिल्डर्स अँड प्रमोटर्स प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी सुरू केली. दिल्ली एनसीआरसह देशातील १२ शहरांमध्ये सुपरटेक कंपनीने रिअल इस्टेट प्रकल्प सुरू केले. नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनने (NCLT) मार्च २०२२ मध्ये सुपरटेक कंपनी दिवाळखोर झाल्याचे जाहीर केले. कंपनीवर अद्याप ४०० कोटींपेक्षा जास्त रकमेचा कर्जभार आहे.
सुपरटेक ट्विन टॉवर बांधण्यासाठी ९३३ रुपये प्रति चौरस फूट (पर स्क्वेअर फीट) एवढा खर्च झाला. ट्विन टॉवर म्हणजे साडेसात लाख चौरस फुटांचे बांधकाम आहे. यासाठी सुमारे ७० कोटी रुपयांचा खर्च झाला. आता ट्विन टॉवर पाडण्यासाठी स्फोटके पेरणे विशिष्ट यंत्रणेचा वापर करून नियंत्रित स्फोट करणे यासाठी खर्च होणार आहे. यामुळे ट्विन टॉवर पाडण्यासाठी २३७ रुपये प्रति चौरस फूट (पर स्क्वेअर फीट) एवढा खर्च होणार आहे. सोप्या शब्दात सांगायचे तर ट्विन टॉवर पाडण्यासाठी सुमारे २० कोटी रुपयांचा खर्च होणार आहे.
ट्विन टॉवर पाडण्यासाठी सुपरटेक कंपनी पाच कोटी रुपये देणार आहे. उर्वरित १५ कोटी रुपये हे पाडलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्यातील धातूचा भंगार विकून उभारला जाईल. प्राथमिक अंदाजानुसार चार हजार टन स्टीलसह एकूण ५५ हजार टन भंगार इमारतीच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढून विकला जाणार आहे. नियंत्रित स्फोट करताना आसपासच्या इमारतींचे काही नुकसान झाले तर ते भरून काढण्यासाठी १०० कोटी रुपयांचा विमा काढण्यात आला आहे.
सुपरटेक एमराल्ड कोर्ट प्रोजेक्टमधील एका थ्री बीएचके फ्लॅटची किंमत १.१३ कोटी रुपये होती. ट्विन टॉवरमध्ये ९१५ निवासी फ्लॅट होते. यापैकी ६३३ फ्लॅटचे बुकिंग झाले होते. कंपनीला १८० कोटी रुपये मिळाले होते. व्यवहारांची उर्वरित रक्कम यायची होती. ट्विन टॉवरचे सर्व फ्लॅट विकून कंपनी १२०० कोटी किंवा त्यापेक्षा जास्त कमाई करेल असा अंदाज व्यक्त होत होता. आता कंपनी ज्यांच्याकडून पैसे घेतले त्यांना १२ टक्के व्याजदराने घेतलेले पैसे परत करणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार परतावा दिला जाणार आहे.
ट्विन टॉवरचा ढिगारा हटविण्यासाठी ३ महिन्यांचा कालावधी लागेल असा अंदाज आहे. या कालावधीत तीन हजार किंवा त्यापेक्षा जास्त ट्रक भरून ढिगारा हटविला जाईल.