प्योंगयांग : कोरोना महामारीशी झुंज देत असलेल्या उत्तर कोरियाने (North Korea) पुन्हा एकदा बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली आहे. दक्षिण कोरियाच्या जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफने (Joint Chiefs of Staff) सांगितले की, रविवारी पहाटे बॅलेस्टिक क्षेपणास्त्राप्रमाणे (Ballistic missile) या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली आहे. या क्षेपणास्त्राच्या मार्गावर दक्षिण कोरियाच्या लष्कराची नजर होती. दरम्यान आर्थिक निर्बंध असूनही, किम जोंग उनने आपल्या देशाचा शस्त्रास्त्र विकास कार्यक्रम सुरू ठेवला आहे. या नव्या शस्त्रामुळे उत्तर कोरियाची आण्विक युद्ध क्षमता मोठ्या प्रमाणात वाढू शकते, असा दावा केला जात आहे.
दक्षिण कोरियाच्या जॉइंट चीफ ऑफ स्टाफने रविवारी सकाळी सांगितले की, "उत्तर कोरियाने पूर्व समुद्रात एक अज्ञात बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागले. हे क्षेपणास्त्र जपानच्या समुद्रातून गेले आहे. काही दिवसांपूर्वीच अमेरिका आणि दक्षिण कोरियाने इशारा दिला होता की, उत्तर कोरिया लवकरच सातवी अणुचाचणी करू शकतो. गेल्या महिन्यात उत्तर कोरियाने तीन क्षेपणास्त्रांची चाचणी करून दहशत निर्माण केली होती. यामध्ये आंतरखंडीय क्षेपणास्त्र ह्वासॉन्ग-17 चा समावेश होता.
उत्तर कोरियाने 2022 मध्ये आतापर्यंत 13 शस्त्रास्त्रांच्या चाचण्या घेतल्या आहेत. अशा परिस्थितीत येत्या काही दिवसांत उत्तर कोरिया लवकरच अण्वस्त्रांसह अणुबॉम्बची चाचणी घेईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. या चाचण्यांचा उद्देश उत्तर कोरियाचे अण्वस्त्र बळकट करणे आणि रखडलेल्या राजनैतिक चर्चेत प्रतिस्पर्धी देशांवर दबाव आणणे हा आहे. उत्तर कोरियाचे अधिकृत माध्यम, कोरियन सेंट्रल न्यूज एजन्सीने सांगितले की, किम जोंग उन यांनी चाचणीचे निरीक्षण केले. या चाचणीमुळे देशाच्या सामरिक अणुऊर्जा आणि लांब पल्ल्याच्या तोफखान्याची मारक क्षमता बळकट होईल, असे संस्थेने म्हटले आहे.
KCNA ने दावा केला आहे की नवीन शस्त्रामुळे लांब पल्ल्याच्या तोफखाना युनिट्सच्या फायर पॉवरमध्ये मोठी सुधारणा होईल. तथापि, KCNA ने याबद्दल सविस्तर माहिती दिली नाही, तसेच प्रक्षेपण केव्हा आणि कुठे झाले. मात्र, या काळात Tactical Nuclear हा शब्द नक्कीच वापरला गेला. अशा स्थितीत हे शस्त्र युद्धभूमीवर आण्विक वारहेडसह हल्ला करण्यास सक्षम असल्याची माहिती आहे. अशा स्थितीत हे शस्त्र अमेरिकेच्या लष्करी प्रतिष्ठानांसह दक्षिण कोरियामधील सामरिक लक्ष्यांना लक्ष्य करू शकते.
सोलमधील इवा विद्यापीठाचे प्राध्यापक लीफ-एरिक इझले म्हणाले की, उत्तर कोरिया केवळ अमेरिकन शहरांना लक्ष्य करण्यासाठी लांब पल्ल्याच्या आण्विक क्षेपणास्त्रे तैनात करण्याचा प्रयत्न करत नाही. तर ते सियोल आणि आशियातील अमेरिकेच्या तळांना धोका देण्यासाठी सामरिक अण्वस्त्रे देखील तैनात करत आहे. प्योंगयांगची उद्दिष्टे इतर देशांच्या हल्ल्यापासून संरक्षण करणे आणि त्याचे शासन टिकवणे यापेक्षा जास्त आहे.