Owaisi on Nupur Sharma | मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे भाजपकडून निलंबित करण्यात आलेल्या नेत्या आणि माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा या लवकरच भाजपच्या मोठ्या नेत्या म्हणून नावारुपाला येतील आणि पक्षाकडून मोठी जबाबदारी त्यांना दिली जाईल, असा अंदाज एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी व्यक्त केला आहे. नुपूर शर्मा यांच्या अटकेची मागणी ओवैसींनी केली आहे. भाजपने केवळ तोंडदेखली कारवाई केली असून प्रत्यक्षात नुपूर शर्मा यांना भाजपच्या मोठ्या नेत्या बनवण्याच्या हालचाली पडद्यामागे सुरू असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. थोड्याच दिवसात नुपूर शर्मा हा भाजपच्या मोठ्या नेत्या झालेल्या असतील आणि दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारही असतील, असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.
नूपुर शर्मा की गिरफ़्तारी हो और भारत के क़ानून के दायरे में रहकर उनके ख़िलाफ़ कार्रवाई हो। मुझे यकीन है कि 6-7 महिनों में नूपुर शर्मा फिर आएंगी और उनको एक बड़ी नेत्री के रूप में पेश किया जाएगा। हो सकता है कि वे दिल्ली की मुख्यमंत्री पद की दावेदार बन जाएं: असदुद्दीन ओवैसी, AIMIM pic.twitter.com/hJEZOmkrXr — ANI_HindiNews (@AHindinews) June 18, 2022
नुपूर शर्मांनी मोहम्मद पैगंबरांविषयी केलेलं वादग्रस्त विधान आंतरराष्ट्रीय स्तरावर भोवल्यामुळेच भाजपनं त्यांच्यावर नाममात्र कारवाई केली आहे. प्रत्यक्षात भारतातील कायद्यांची अंमलबजावणी करून नुपूर शर्मा यांना तातडीने अटक करण्याची गरज आहे. मात्र प्रत्यक्षात उलटंच घडत असल्याचा आरोप ओवैसींनी केला आहे. नुपूर शर्मा यांना मोठ्या नेत्या बनवण्याच्या हालचाली भाजपने सुरू केल्या असून दिल्लीच्या पुढील विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवारही भाजप जाहीर करू शकतं, असा अंदाज ओवैसींनी व्यक्त केला. दाखवण्यापुरती कारवाई करणारा भाजप प्रत्यक्षात नुपूर शर्मांना वाचवण्याचा प्रयत्न करतंय, असा जाहीर आरोप ओवैसींनी शनिवारी केला.
एवढा तमाशा होऊन आणि आंतराष्ट्रीय पातळीवर बदनामी होऊनही पंतप्रधान नरेंद्र मोदी नुपूर शर्मांबाबत एकही शब्द बोलत नाहीत. नुपूर शर्मांवर कारवाई करा अशी मागणी देशभरातून होत असताना त्याबाबत पंतप्रधान मूग गिळून गप्प आहेत, असा टोला ओवैसींनी लगावला आहे. आम्ही नुपूर शर्माविरोधात तक्रार नोंदवली असून पोलिसांनी तातडीनं पावलं उचलण्याची गरज आहे. या देशात कायदा सर्वश्रेष्ठ आहे आणि कुणी सुव्यवस्था आणि सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करत असेल, तर कायदेशीर शिक्षा होईल, हा संदेश दिला जाणं गरजेचा असल्याचं ओवैसी यांनी म्हटलं आहे.
अधिक वाचा - Agnipath Protest : JDU सोबतच्या वादात केंद्राचा मोठा निर्णय, भाजपच्या १२ नेत्यांना Y ग्रेड सुरक्षा
नुपूर शर्मा या भाजपच्या प्रवक्त्या होत्या. त्यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना मोहम्मद पैगंबरांविषयी वादग्रस्त विधान केलं होतं. या महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात तमाम मुस्लीम देशांनी या घटनेचा निषेध नोंदवला होता. त्यानंतर भाजपनं नुपूर शर्मा यांना ‘फ्रिंज इलेमेंट’ ठरवत त्यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. नुपूर शर्मा यांच्या विधानाशी आम्ही सहमत नसून सर्व धर्मांचा आणि श्रद्धांचा आदर करतो, असं परिपत्रक देशाच्या परराष्ट्र खात्याला काढावं लागलं होतं. मात्र नुपूर शर्मांच्या या विधानाबद्दल त्यांच्यावर कुठलीही कायदेशीर कारवाई अद्याप झालेली नाही.