नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून राज्यातल्या राजकारणात बऱ्याच घडामोडी घडताना दिसत आहेत. शिवसेनेच्या आमदारांनी (Shiv Sena MLAs) बंडखोरी केली आणि राज्यात नवं सरकार स्थापन केलं. राज्यात सत्तांतर (New Government) झाल्यानंतर शिवसेनेतल्या आमदारांपाठोपाठ आता खासदारांनी उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) साथ सोडली आहे. आमदारांनंतर 12 खासदार आता शिंदे गटात (Shinde group) सामील झाले आहेत. शिंदे गटाला लोकसभेतल्या (Lok Sabha) शिवसेनेच्या 12 खासदारांनी (MPs) पाठिंबा दिला आहे.
खासदारांनी शिंदे गटाला पाठिंबा दिल्यानंतर लोकसभेच्या शिवसेना संसदीय पक्षाच्या नेतेपदी राहुल शेवाळे आणि प्रतोदपदी भावना गवळी यांची नियुक्ती केल्याचं पत्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना देण्यात आलं. त्यानंतर शिवसेनेच्या संसदीय पक्षाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे राहुल शेवाळे यांची शिवसेनेच्या संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवड केली आहे. तर भावना गवळी यांच्या प्रतोदपदी नियुक्तीला मान्यता देण्यात आली आहे.
अधिक वाचा- शिंदे गटाला भाजपचा पहिला धक्का, मुख्यमंत्र्यांच्या जवळील 'त्या' तिघांच्या हाती भाजपचं कमळ
काल लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची शिवसेनेच्या खासदारांनी भेट घेतली. या भेटीदरम्यान खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र दिलं. या पत्रात राहुल शेवाळे यांची लोकसभेत गटनेता म्हणून तर भावना गवळी यांची मुख्य प्रतोद म्हणून निवड व्हावी, अशी मागणी करण्यात आली होती. शिंदे गटाला लोकसभेतील शिवसेनेच्या 12 खासदारांनी पाठिंबा दिला आहे. यात राहुल शेवाळे, भावना गवळी, कुपाल तृपाणे, सदाशिव लोखंडे, हेमंत गोडसे, प्रतापराव जाधव, संजय मंडलिक, धैर्यशील माने, हेमंत पाटील, अप्पा बारणे, राजेंद्र गावित, डॉ. श्रीकांत शिंदे या खासदारांचा समावेश आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांनी काल 12 खासदारांसोबत महाराष्ट्र सदनात पत्रकार परिषद घेतली. दरम्यान लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शेवाळे यांना गटनेतेपदी तर भावना गवळी यांना प्रतोदपदी मान्यता दिल्यामुळे शिवसेनेचे उरलेले 6 खासदार अडचणीत आले आहेत. शिवसेनेच्या या 6 खासदारांना लोकसभेत भावना गवळी यांचा व्हिप मान्य करावा लागेल. विनायक राऊत, अरविंद सावंत, गजानन किर्तीकर, ओमराजे निंबाळकर, संजय जाधव, राजन विचारे आणि कलाबेन डेलकर यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिलेला नाही.