Omicron Crisis : भारतात कोरोनाची तिसरी लाट येणार का?; प्रत्येकांच्या मनात घर करून बसलेला प्रश्न, काय म्हणाल्या WHOच्या डॉ. पूनम खेत्रपाल

Omicron Crisis : जगभरात कोरोना (Corona)  चा नवा प्रकार ओमायक्रॉन व्हेरिएंटने (Omicron variant) चिंता वाढवली असून या नवीन व्हेरिएंटमुळे अनेक देशांमध्ये अचानक रुग्णसंख्या वाढू लागली आहे. जगभरातल्या तब्बल 59 देशांमध्ये हा व्हेरिएंट (variant) पसरला आहे.

third wave of corona
तिसरी लाट येणार का?; प्रत्येकांच्या मनातील प्रश्न   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • परिस्थिती आणखी वाईट होईल असं नाही पण परिस्थिती नक्कीच अधिक अनिश्चित असेल - डॉ. पूनम खेत्रपाल
  • जगभरातल्या तब्बल 59 देशांमध्ये Omicron हा व्हेरियंएट पसरला आहे.
  • जगाच्या इतर भागांमध्ये वाढत असलेली कोरोनाबाधितांची संख्या यामुळे जागतिक स्तरावर कोरोनाचा धोका कायम

Omicron Crisis : नवी दिल्ली : जगभरात कोरोना (Corona)  चा नवा प्रकार ओमायक्रॉन व्हेरिएंटने (Omicron variant) चिंता वाढवली असून या नवीन व्हेरिएंटमुळे अनेक देशांमध्ये अचानक रुग्णसंख्या वाढू लागली आहे. जगभरातल्या तब्बल 59 देशांमध्ये हा व्हेरिएंट (variant) पसरला आहे. ओमिक्रॉनला थांबवण्यासाठी जगभरातील देश नवीन निर्बंध आणत आहेत. भारतातही ओमायक्रॉनचा शिरकाव झाला असून देशातील पाच राज्यात ओमायक्रॉनचा प्रभाव अधिक आहे. सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आहेत, यामुळे आता देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं सावट तयार होत आहे.

मास्कचा वापर टाळणे आणि लसीकरणास होणारा विलंब याविरुद्ध सरकारने इशारा दिला आहे. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) दक्षिण पूर्व आशियाच्या प्रादेशिक संचालक डॉ. पूनम खेत्रपाल यांनी याविषयीची महत्वाची माहिती दिली आहे. त्या म्हणाल्या, “नवीन व्हेरिएंट आला आहे याचा अर्थ असा नाही की परिस्थिती आणखी वाईट होईल, परंतु परिस्थिती नक्कीच अधिक अनिश्चित असेल.” एनडीटीव्हीशी बोलताना डॉ. पूनम म्हणाल्या, “महामारीचा धोका अजूनही कायम आहे. कोरोनाचे नवीन व्हेरिएंट आणि जगाच्या इतर भागांमध्ये वाढत असलेली कोरोनाबाधितांची संख्या यामुळे जागतिक स्तरावर कोरोनाचा धोका कायम आहे. त्यामुळे विशेषतः दक्षिण आशियामध्ये निष्काळजीपणा करण्यात येऊ नये. या भागात कोरोना रुग्णांवर लक्ष ठेवणे, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था मजबूत करणे आणि कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यासह लसीकरण वाढवणे आवश्यक आहे.”

“ओमायक्रॉनचा जागतिक प्रसार आणि मोठ्या प्रमाणात उत्परिवर्तनांसह काही वैशिष्ट्यांचा लक्षणीय परिणाम होऊ शकतो. त्याचा नेमका काय परिणाम होईल हे जाणून घेणे थोडे कठीण आहे. त्यामुळे WHO ने देशांना अधिकाधिक डेटा सबमिट करण्यास सांगितले आहे. डेटाचे विश्लेषण करण्यासाठी हजारो तज्ञांना पाचारण करण्यात आले आहे. ओमायक्रॉनच्या संसर्गाची क्षमता, तीव्रता, पुन्हा संसर्ग होण्याचा धोका, इतर घटकांसह मूल्यांकन करण्यासाठी अभ्यास चालू असल्याचं त्या म्हणाल्या.”

“दक्षिण आफ्रिकेतून येणारा डेटा ओमिक्रॉनमधून पुन्हा संसर्ग होण्याचा धोका दर्शवत आहे. परंतु आम्हाला पुढील निष्कर्ष काढण्यासाठी अधिक माहितीची आवश्यकता आहे. घाईत काहीही सांगणे योग्य ठरनार नाही,” असं डॉ. पूनम म्हणाल्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी