Omicron Sub Variant : देशात आला ओमायक्रॉनचा सब व्हेरिएंट BA.2 , समूह संसर्ग सुरू पुढील 14 दिवसांत कोरानाचा पीक शक्य

Omicron Sub Variant: देशात करोनाच्या तिसऱ्या लाटेने थैमान घातले असतानाच ओमायक्रॉन व्हेरिएंटबाबत चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. ओमायक्रॉनच्या सब व्हेरिएंटचाही फैलाव भारतात होत आहे.

Omicron Sub Variant News
देशात आला ओमायक्रॉनचा सब व्हेरिएंट BA.2  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • देशातील सद्यस्थिती लक्षात घेता ओमायक्रॉन व्हेरिएंटने समूह संसर्गाची स्टेज गाठली आहे.
  • गेल्या 24 तासांत देशात 3 लाख 6 हजार 64 नवीन कोरोना रुग्णांची नोंद
  • ओमायक्रॉनचा सब व्हेरिएंट BA.2 भारतातील अनेक भागांत फैलावला असल्याची माहिती

Omicron Sub Variant News : नवी दिल्ली: ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे (Omicron Variant) भारतात कोरोना (corona) संसर्गाची तिसरी लाट धडकली आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची (corona patient) संख्या झापट्याने वाढू लागली आहे. गेल्या 24 तासांत देशात 3 लाख 6 हजार 64 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर  देशातील दिल्ली (Delhi), मुंबई (Mumbai), कोलकाता (Kolkata) आणि चेन्नई (Chennai) या शहरांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतील रुग्णसंख्येच्या पीकचा टप्पा पार केला आहे. या मोठ्या शहरांनंतर आता इतर शहरे व ग्रामीण भागात कोरोना संसर्ग वेगाने फैलावत आहे. अशातच आणखी चिंता वाढवणारी बाब समोर आली आहे. 

देशात ओमायक्रॉन व्हेरिएंटचा समूह संसर्ग सुरू झाला आहे आणि त्याचवेळी ओमायक्रॉनचा सब व्हेरिएंट BA.2 भारतातील अनेक भागांत फैलावला असल्याची माहिती समोर आली आहे. चिंतेत भर घालणारी ही  माहिती भारताच्या सार्स कोव्ह-२ जीनोमिक्स कन्सोर्टियम ( Indian SARS-CoV-2 Genomics Consortium ) यांनी जारी केलेल्या बुलेटिनमध्ये देण्यात आली आहे. जानेवारी 10 तारखेचं हे बुलेटिन रविवारी प्रसिद्ध करण्यात आले आहे. ओमायक्रॉनचा सब व्हेरिएंट BA.2 बाबत या बुलेटिनमध्ये महत्त्वाची माहिती दिली गेली आहे. हा सब व्हेरिएंट देशातील बऱ्याच भागांत आढळून आला आहे, असे नमूद करत सावध करण्यात आले आहे. 

'जगभरात ओमायक्रॉन व्हेरिएंटचा वेगाने फैलाव होत आहे. त्यात भारतात कोरोना आणि ओमायक्रॉन बाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. देशातील सद्यस्थिती लक्षात घेता ओमायक्रॉन व्हेरिएंटने समूह संसर्गाची स्टेज गाठली आहे. महानगरांमध्ये या संसर्गाचा अधिक प्रादुर्भाव दिसत आहे. तिथे रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे', असे सार्स कोव्ह-२ जीनोमिक्स कन्सोर्टियमच्या बुलेटिनमध्ये नमूद करण्यात आले आहे.  रविवारीच जाहीर केलेल्या 3 जानेवारीच्या बुलेटीनमध्ये म्हटले की, ओमायक्रॉन आता भारतात सामुदायिक प्रसाराच्या स्तरावर आहे. दिल्ली आणि मुंबईत डेल्टा व्हेरिएंटवरही वरचढ ठरत आहे. जेथे जास्त रुग्ण आढळत आहेत, तेथे याचा प्रसार आता विदेशी नागरिकांमार्फत नव्हे तर देशांतर्गतच होत असल्याची शंका आहे. ‘इन्साकॉग’ने आतापर्यंत 1,50,710 नमुन्यांचे सिक्वेन्सिग तर 1,27,697 नमुन्यांचे विश्लेषण केले ओ. ‘इन्साकॉग’च्या मते नुकत्याच सापडलेल्या आयएसयू (बी.1.640.2) व्हेरिएंटचेही मॉनिटरिंग केले जात आहे. तो वेगाने वाढत असल्याचे काेणतेच पुरावे नाहीत. तो रोगप्रतिकार प्रणालीला गुंगारा देतो. मात्र हा व्हेरिएंट ऑफ कन्सर्न नाही. आतापर्यंत देशात याचा एकही रुग्ण सापडलेला नाही.

पुढील 14 दिवसांत कोरानाचा पीक शक्य 

मद्रास आयआयटीने रविवारी म्हटले की, 14 ते 21 जानेवारीदरम्यानच्या आठवड्यात देशातील आर फॅक्टर घटून 1.57 वर आला आहे. 7ते 13 जानेवारीपर्यंत तो 2.2 आणि 1 ते 6 जानेवारीदरम्यान 4 आणि 25 ते 31 डिसेंबरदरम्यान 2.9 नोंदवला गेला होता. आर फॅम्टरमुळेच कोरोना विषाणूचा प्रसार किती वेगाने होत आहे आणि एक संसर्गित किती लोकांना बाधित करतो हे कळते. हा आर फॅक्टर 1 पेक्षा कमी झाल्यास महामारी नियंत्रणात आल्याचे मानले जाते. आयआयटी मद्रासचे डॉ. जयंत झा यांच्या मते, मुंबईत आर फॅक्टर 0..06 दिल्लीत 0.98, चेन्नईत 1.2 आणि कोलकात्यात 0.56 नोंदवला गेला. मुंबई आणि कोलकात्यातील आर फॅक्टरमुळे लक्षात येते की, तेथे पीक आला आहे. 

भारतासाठी BA.2 का आहे धोकादायक?

कोलकाता येथे सहा दिवसांतील 80 टक्के नमुन्यांमध्ये ओमायक्रॉनचा सब व्हेरिएंट BA.2 आढळून आला आहे. 22 ते 28 डिसेंबर दरम्यान जीनोम सीक्वेन्सिंगसाठी हे सर्व नमुने पाठवण्यात आले होते.
BA.2 ला छुपा विषाणू म्हणता येईल. केवळ जीनोम सीक्वेन्सिंगच्या माध्यमातूनच त्याची लागण झाली आहे की नाही हे कळू शकते. यात BA.1, BA.2 आणि BA.3 असे तीन उपप्रकार आहेत.
BA.2 हा अजून 'व्हेरिएंट ऑफ कन्सर्न' मानला गेलेला नाही. वैज्ञानिक सध्या याचा अभ्यास करत आहेत. त्याचवेळी सर्वांना सतर्क राहण्याचे आवाहन मात्र करण्यात आलेले आहे.
ब्रिटनमध्ये या सब व्हेरिएंटचे 426 रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत भारतासह 40 देशांत BA.2 चा फैलाव झाला आहे.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी