Omicron Variant Crisis: नवी दिल्ली : कोरोनाचा (Corona) नवा प्रकार असलेल्या ओमायक्रॉन (Omicron) चा प्रसार वेगाने होत आहे. आतापर्यंत देशातील १२ राज्यांमध्ये ओमायक्रॉनचे १४३ रूग्ण आढळून आले आहेत. त्यात ओमायक्रॉनमुळे भारतात कोरोनाची तिसरी लाट (Corona Third Wave) येईल, असा दावा नॅशनल कोविड-१९ सुपरमॉडेल समितीने (National Covid-19 Supermodel Committee) केला आहे. येत्या फेब्रुवारीत तिसऱ्या लाटेचा पीक (सर्वोच्च पातळी) येण्याची शक्यता आहे. समितीच्या मते, कोरोनाची तिसरी लाट फेब्रुवारी २०२२ पर्यंत येऊ शकते. परंतु, दिलासादायक बाब म्हणजे ही तिसरी लाट दुसऱ्या लाटेपेक्षा कमी धोकादायक असेल.
समितीचे प्रमुख एम. विद्यासागर शनिवारी म्हणाले, ‘ओमायक्रॉन जसजसा डेल्टा व्हेरिएंटची जागा घेत जाईल तसतसे रुग्ण वाढत जातील. तिसरी लाट पुढील वर्षाच्या सुरुवातीस येऊ शकते. देशात लोकांत मोठ्या प्रमाणात इम्युनिटी असल्याने ही लाट दुसऱ्या लाटेपेक्षा कमी घातक असेल.’ आयआयटी हैदराबादचे प्रो. विद्यासागर म्हणाले, आधीच्या तुलनेत तिसऱ्या लाटेत रोजचे रुग्ण कमीच असतील. सर्वात भीषण स्थितीतही रोजचे रुग्ण दोन लाखांपेक्षा जास्त नसतील''.
"सध्या भारतात कोरोनाचे रोजचे ७ हजार ५०० च्या आसपास रूग्ण आहेत. परंतु ओमायक्रॉनने डेल्टा या मुख्य विषाणूचे स्वरूप धारण केले तर, कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढेल. ओमायक्रॉन हा डेल्टापेक्षा जास्त वेगाने पसरतो."
सेरो सर्वेक्षणाच्या आधारे विद्यासागर म्हणाले की, "आपल्या देशात अद्याप बऱ्याच लोकांना डेल्टाचा फटका बसला नाही. अशा परिस्थितीत येणारी तिसरी लाट दुसऱ्या लाटेपेक्षा जास्त धोकादायक ठरणार नाही. याशिवाय, यावेळी देश कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी सज्ज आहे. देशानेही आपली क्षमता वाढवली आहे. हे पाहता आपला देश या येणाऱ्या आव्हानाला तोंड देऊ शकेल."दरम्यान, लोकनायक जयप्रकाश नारायण रुग्णालयाचे एमडी डॉ. सुरेशकुमार यांच्यानुसार, दिल्लीत आढळलेल्या २० ओमायक्रॉन रुग्णांपैकी १८ जणांत कोणतीही लक्षणे नाहीत.
विद्यासागर म्हणाले की, "कोरोनाची तिसरी लाट आली तर देशात दररोज किमान 2 लाख कोरोनाचे रूग्ण आढळून येण्याची शक्यता आहे." मात्र, हा केवळ अंदाज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संख्या यापेक्षा जास्त किंवा कमी असू शकते.
कर्नाटकात शनिवारी ६ नवे ओमायक्रॉनबाधित रुग्ण आढळले आहेत. एकूण बाधितांचा आकडा १४ झाला आहे. या ६ पैकी ५ रुग्ण दोन शिक्षण संस्थांतील आहेत. हा क्लस्टर आऊटब्रेक समजण्यात आला आहे.
युगांडातून ९ डिसेंबरला महाराष्ट्रात परतलेले दांपत्य आणि त्यांच्या १३ वर्षीय मुलीत ओमायक्रॉन व्हेरिएंट आढळला आहे. त्यांची ५ वर्षीय मुलगीही पॉझिटिव्ह आहे. मात्र तिच्यात ओमायक्रॉन व्हेरिएंट नाही.
तामिळनाडूने केंद्र सरकारला आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या कोरोना टेस्टबाबत जारी मागदर्शक तत्त्वे बदलण्याची विनंती केली आहे. राज्यात बिगर जोखमीच्या देशातून आलेल्या प्रवाशात ओमायक्रॉन संसर्ग आढळला आहे. हा राज्यातील पहिलाच रुग्ण आहे. तामिळनाडूत येणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांची कोविड-१९ चाचणी करण्याची परवानगी देण्याची मागणी राज्याने केली आहे. आजवर फक्त जोखमीच्या देशांतून येणाऱ्या प्रवाशांचीच सक्तीची चाचणी केली जाते. राज्यात शुक्रवारपर्यंत २८ आंतरराष्ट्रीय प्रवासी आले. त्यात ओमायक्रॉन व्हेरिएंटचा संकेत देणारा ‘एस’ जीन ड्रॉप आढळला आहे.