माजी सीएम कमलनाथांच्या प्रेस कॉन्फ्रेंसमधील पत्रकार कोरोना पॉझिटिव्ह

लोकल ते ग्लोबल
Updated Mar 25, 2020 | 20:43 IST | टाइम्स नाऊ मराठी

Coronavirus positive journalist: देशातील कोरोना व्हायरसमुळे संक्रमित लोकांची संख्या वाढत चाललीय. तत्कालीन मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या पत्रकार परिषदेत उपस्थित पत्रकाराला कोरोनाचं संक्रमण झालंय.

Kamalnath PC
मप्र: तत्कालीन सीएम कमलनाथच्या पीसीमधील पत्रकार कोरोनाग्रस्त  |  फोटो सौजन्य: PTI

थोडं पण कामाचं

  • मध्यप्रदेशात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या गेली १५ वर
  • आज कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या पत्रकाराची मुलगी गेली होती लंडनला, पत्रकाराची उपस्थिती असलेल्या कमलनाथ यांच्या पत्रकार परिषदेतील अनेकांची तपासणी
  • मध्यप्रदेशात सर्वाधिक रुग्ण आढळले जबलपूरमध्ये, इंदूरमध्ये उपचार घेत असलेल्या ५ रुग्णांपैकी कुणीही केला नाही परदेश दौरा.

भोपाळ: मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्ये एका पत्रकाराची मुलगी कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह आढळली आहे. त्यामुळे मध्यप्रदेशातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता १५ झालीय. पत्रकाराची ही मुलगी काही दिवसांपूर्वी लंडनहून आली होती. त्यामुळे तिच्यासोबतच तिचे वडील असलेले पत्रकार सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. दरम्यान, या पत्रकारानं राजीनामा देण्यापूर्वी कमलनाथ यांनी बोलावलेल्या पत्रकार परिषदेला हजेरी लावली होती. त्यावेळी या पत्रकाराला सुद्धा कोरोनाचं संक्रमण झालं होतं. त्या पत्रकार परिषदेला कमलनाथ सरकारमधील अनेक मंत्री उपस्थित होते. त्यामुळे आता पत्रकार आणि त्याच्या मुलीच्या संपर्कात आलेल्या सर्वांना होम क्वॉरंटीन करण्यात आलंय.

मध्यप्रदेशात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या झाली १५

भोपाळमध्ये बुधवारी दुपारी कोरोना व्हायरसमुळे संक्रमित झालेल्या आणखी एका रुग्णांची भर पडलीय. त्यामुळे आता एकूण कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या राज्यात १५ झालीय. भोपाळचे चीफ मेडिकल ऑफिसर सुधीर डेहरिया यांनी सांगितलं की, भोपाळमध्ये २६ वर्षीय महिलेचे वडील कोरोना प़ॉझिटिव्ह आढळले आहेत. ही महिला १८ मार्चला लंडनहून भोपाळला परतली होती आणि शहरातील कोरोना व्हायरसनं संक्रमित झालेली पहिली रुग्ण होती. आता तिचे वडीलही कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. जे की पत्रकार आहेत. त्यामुळे भोपाळ शहरातील रुग्णांची संख्या २ झालीय. त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आलीय.

भोपाळमध्ये २, जबलपूरमध्ये ६ आणि इंदूरमध्ये ५ पॉझिटिव्ह

यापूर्वी बुधवारी इंदूरच्या विविध हॉस्पिटलमध्ये भरती असलेल्या दोन महिलांसह ५ रुग्ण कोरोना संक्रमित असल्याचं आढळून आलं होतं. यातील ४ इंदूरचे राहणारे आहेत, तर १ रुग्ण उज्जैनचा आहे. तर आता मध्यप्रदेशात व्हायरसमुळे संक्रमित लोकांची संख्या एकूण १५ झालीय. यातील ६ रुग्ण जबलपूर, ५ इंदूर, २ भोपाळ आणि १-१ शिवपुरी, उज्जैन आणि ग्वालियरचे राहणारे आहेत. सर्वांची प्रकृती सध्या स्थिर आहे.

इंदूर आणि उज्जैनमध्ये कर्फ्यू

इंदूरच्या मेडिकल ऑफिसर डॉ. प्रवीण जडीया यांनी बुधवारी सांगितलं की, शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये अॅडमिट असलेल्या दोन महिलांसह ५ रुग्णांमध्ये (४ इंदूर, १ उज्जैनचे) कोरोना संक्रमण झाल्याचं निश्चित झालंय. यातील कुठल्याही व्यक्तीनं परदेश यात्रा केली नव्हती. म्हणजे शहरातच त्यांना कोरोनाची लागण झालीय. डॉक्टरांनी सांगितलं की, कोरोना पॉझिटिव्ह आढळलेली ६५ वर्षीय महिला शेजारच्या उज्जैन जिल्ह्यातील राहणारी आहे, मात्र तिच्यावर इंदूरच्या शासकीय महाराजा यशवंतराव हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. डॉ. जडिया यांनी पुढे सांगितलं की, कोरोना व्हायसर पॉझिटिव्ह आढळलेल्या इतर चार रुग्ण हे इंदूरच्या वेगवेगळ्या भागारत राहणारे आहेत. यात ५० वर्षीय महिला, ४८ वर्षीय पुरुष, ६८ वर्षीय पुरूष आणि ६५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. हे रुग्ण शहरातील दोन खाजगी हॉस्पिटलमध्ये अॅडमिट आहेत. इंदूर आणि उज्जैनमध्ये कोरोना संक्रमणाचे रुग्ण आढळल्यानंतर आता जिल्हा प्रशासनानं दोन्ही शहरांमध्ये कर्फ्यू लावला आहे.

५ रुग्णांपैकी कुणीही केला नाही परदेश दौरा

चीफ मेडिकल ऑफिसरनं सांगितलं की, या ५ रुग्णांपैकी कुणीही परदेश दौरा केलेला नाहीय. यातील २ पुरुष एकमेकांचे मित्र आहेत जे याच महिन्यात एकत्र वैष्णोदेवी यात्रेला गेले होते आणि काही दिवसांपूर्वीच परतले आहेत.

कोरोना व्हायरस संक्रमणाच्या माहितीनंतर ७ जिल्ह्यांमध्ये कर्फ्यू

आतापर्यंत कोरोना व्हायरस संक्रमण आढळलेल्या सात जिल्ह्यांमध्ये कर्फ्यू लावला गेला आहे. यात भोपाळ, इंदूर, जबलपूर, ग्वालियर, शिवपुरी, उज्जैन आणि छतरपूर जिल्ह्यांचा समावेश आहे. तसं तर छतरपूर जिल्ह्यात अजून कुणी कोरोना व्हायरस रुग्ण आढळला नाहीय. मात्र ग्वालियरच्या कोरोना व्हायरस संक्रमित रुगणानं काही दिवसांपूर्वी खजुराहो (छतरपूर)चा प्रवास केला होता. म्हणून छतरपूर जिल्ह्यातील राजनगर आणि खजुराहोमध्ये कर्फ्यू लावला आहे.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी