इस्लामाबाद : भारताच्या (India) शेजारील देश पाकिस्तानातही (Pakistan) भारतासारखी परिस्थीती आहे. भारतातही ज्या पद्धतीने देश सोडण्याचा सल्ला दिला जातो तसाच सल्ला पाकिस्तानात दिला जातो. फक्त फरक इतकाच कि, पाकिस्तानात थेट पंतप्रधानांनाच (Prime Minister) देश सोडण्याचा सल्ला दिला जातो. काही दिवसांपूर्वी सत्ता संकटात सापडलेले पाकचे पंतप्रधान इमरान खान (Prime Minister Imran Khan) यांनी भारताचं कौतुक केलं होतं. या कौतुकामुळे त्यांना देश सोडण्याचा सल्ला त्याचे विरोधक देत आहेत.
भारताचं कौतुक केल्याने पाकिस्तानच्या (Pakistan) विरोधकांची चांगलीच आग झाली आहे. विशेषत: पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (PLM-N) च्या नेत्या मरियम नवाझ (Maryam Nawaz)यांनी भारताचे नाव ऐकल्यानंतर संतप्त होत त्यांनी इमरान खान यांना थेट पाकिस्तान सोडून भारतात जाण्याचा सल्ला दिला.
इमरान खान यांनी शुक्रवारी देशाला संबोधित करताना भारताचे कौतुक केलं. रशियाबाबत आपलं धोरण काय असावं हे भारताला सांगण्याचे धाडस कोणत्याही युरोपियन राजदूतात नाही, असं ते म्हणाले होते. भारतातील जनता खूप प्रामाणिक असल्याचंही इमरान खान यांनी म्हटलं. मात्र माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची मुलगी मरियम नवाज यांना इमरान यांनी भारताचं अशाप्रकारे केलेलं कौतुक आवडलेलं नाही.
मरियम नवाज शरीफ यांनी ट्विट करून म्हटलं आहे की, ' खुर्ची जाताना पाहून वेडा झालेल्या या माणसाला कुणीतरी सांगावं की त्यांना आपल्याच पक्षाकडून हटवलं जात आहे. जर तुम्हाला भारत इतकाच आवडत असेल तर पाकिस्तानमधील आयुष्य सोडून भारतात जा. इतकंच नाही तर मरियम नवाझ शरीफ असंही म्हणाल्या की, भारताचे गुणगान करणाऱ्यानं हेही जाणून घेतलं पाहिजे की, भारताच्या वेगवेगळ्या पंतप्रधानांविरुद्ध 27 वेळा अविश्वास प्रस्ताव आणला गेला आहे. मात्र कोणीतरी संविधान, लोकशाही आणि त्याच्या तत्त्वांशी तडजोड केलेली नाही.
भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा उल्लेख करत मरियम म्हणाल्या की, एका मतानं पराभूत झाल्यानंतर ते घरी गेले होते. त्यांनी तुमच्या (इमरान खान) सारखे देश आणि राज्यघटना गहाण ठेवली नव्हती. विशेष म्हणजे, गुरुवारी, पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने उपसभापती कासिम सूरी यांनी विरोधकांनी मांडलेला अविश्वास प्रस्ताव फेटाळणे चुकीचे असल्याचे म्हटलं होतं.