Jammu Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, दोन जवान शहीद 

Terrorists attack Security Forces in Srinagar: जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी सुरक्षादलाच्या तुकडीवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले आहेत. भारतीय सैन्य दलाकडून परिसरात सर्च ऑपरेशन सुरू

Indian Army
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: PTI

श्रीनगर : दहशतवाद्यांनी (Terrorirsts) भारतीय सैन्यदलाच्या तुकडीवर हल्ला केला आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले आहेत. श्रीनगर जवळील एचएमटी येथे गस्त घालत असलेल्या सैन्य दलाच्या तुकडीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. दहशतवाद्यांनी हल्ला करुन पळ काढला आहे. या हल्ल्यानंतर भारतीय सैन्य दलाने संपूर्ण परिसराला घेरलं असून सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हा हल्ला श्रीनगर शहराबाहेरील एचएमटी परिसरात झाला आहे. श्रीनगरच्या खुसीपोरा, एचएमटी येथे लष्कराच्या क्विक रिअॅक्शन टीमवर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. हा परिसर दाटीवाटीचा असल्याने नागरिकांना इजा होऊ नये यासाठी भारतीय सैन्य दलाने संयम ठेवला. दहशतवाद्यांनी केलेल्या या हल्ल्यात भारतीय सैन्य दलाचे दोन जवान गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल कऱण्यात आले मात्र, त्यांचे निधन झाले. 

कारमधून दहशतवाद्यांचं पलायन 

काश्मीरचे आयजी म्हणाले, "तीन दहशतवाद्यांनी आमच्या सैन्य दलावर गोळीबार सुरू केला. दहशतवाद्यांनी केलेल्या या हल्ल्यात दोन जवान गंभीर जखमी झाले होते. दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने या परिसरात आपल्या दहशतवादी कारवाया वाढवल्या आहेत. हे दहशतवादी हल्ला केल्यावर कारमधून पळून गेले आहेत आणि त्यांच्याकडे शस्त्र आहेत. या तिघांपैकी दोन बहुतेक पाकिस्तानी आणि एक स्थानिक आहे."

रविवारी दहशतवाद्याला केली होती अटक

रविवारी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातून एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली होती. भारतीय सैन्य दलाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, उत्तर काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील हंदवाडा भागातील एक व्यक्ती दक्षिण काश्मीरमधील छतपूरा परिसरात लपून बसल्याची सूचना मिळाली होती आणि त्यानुसार परिसरात शोधमोहीम सुरू केली. या सर्च ऑपरेशन दरम्यान एका दहशतवाद्याला पकडण्यात आले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी