Pakistan opens airspace: भारतीय प्रवासी विमानांसाठी पाकिस्तानी हवाई सीमा खुली

लोकल ते ग्लोबल
Updated Jul 16, 2019 | 16:27 IST | टाइम्स नाऊ मराठी

Pakistan opens airspace: पाकिस्तानाने भारतीय विमानांना हवाई क्षेत्रातून उडण्याची मनाई केली होती. आता त्यांनी भारतीय विमानांसाठी हवाई सीमा खुली केली आहे. प्रवासी विमान कंपन्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.

Air India
पाकिस्तानची हवाई सीमा खुली   |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • भारतीय प्रवासी विमानांसाठी पाकिस्तानची हवाई सीमा खुली
  • भारतीय विमान कंपन्यांना होणार फायदा
  • एअर इंडियाला सोसावा लागला कोट्यवधींचा तोटा

इस्‍लामाबाद : Pakistan opens airspace: भारतात जम्मू-काश्मीरमध्ये १४ फेब्रुवारीला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव निर्माण झाला होता. भारताने पुलवामाचे प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानातील बालाकोट येथील दहशतवाद्यांच्या कथित ठिकाणांवर हवाई हल्ले केले होते. त्यानंतर परिस्थिती आणखीनच चिघळली होती. पाकिस्तानाने भारतीय विमानांना हवाई क्षेत्रातून उडण्याची मनाई केली होती. आता पकिस्तानाने भारतीय विमानांसाठी आपली हवाई सीमा खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी रात्री १२ वाजून ४१ मिनिटांनी हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे आता भारतीय विमाने पाकिस्तानी हवाई सीमेतून पूर्वी प्रमाणे उड्डाण करू शकणार आहेत. पाकिस्तान सरकारच्या या निर्णयामुळे द्विपक्षीय तणाव थोडा कमी होण्याची शक्यता असली तरी, भारत सध्याच्या परिस्थितीत पाकिस्तानशी चर्चा करण्यास तयार नसल्याचे सांगितले जात आहे.

विमान कंपन्यांना दिलासा

पाकिस्तानने हवाई सीमा खुली करण्याचा घेतलेला निर्णय एअर इंडियासाठी फार दिलासादायक आहे. पाकिस्तानी हवाई सीमा बंद असल्यामुळे प्रवासी विमानांना देखील पाकिस्तानला वळसा घालून जावे लागत होते. परिणामी इंधनावरील खर्च वाढला होता. दिल्लीहून युरोप किंवा अमेरिकेसाठी जाणारी विमाने मार्ग बदलून जात होती. दिल्लीहून जाणाऱ्या अनेक विमानांची री शेड्युलिंग करावे लागले होते. यामुळे जवळपास ४९१ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. केवळ एअर इंडियाच नव्हे तर, स्पाइस जेट, इंडिगो, गोएअर यांसारख्या खासगी विमान कंपन्यांनाही कोट्यवधींचे नुकसान सोसावे लागले होते. सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव असला तरी, तो निवळत असल्याचे बोलले जात आहे. पण, भारताने पाकिस्तानचा चर्चेसाठीचा कोणताही प्रस्ताव अद्याप स्वीकारलेला नाही. बिष्केक येथील आंतरराष्ट्रीय परिषदेतही भारताने याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे.

भारतानंतर पाकिस्तानचा निर्णय  

भारताने पुलावामा हल्ल्यानंतर २६ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानातील बालाकोट येथे एअर स्ट्राईक केला होता. त्यानंतर पाकिस्तानने भारतीय प्रवासी विमानांसाठी हवाई सीमा बंद केली होती. पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने एअर स्ट्राईक केला होता. हवाई सीमा बंद केल्यानंतर पाकिस्ताने ११ पैकी केवळ दोन मार्ग खुले ठेवले होते. दक्षिण पाकिस्तानला लागून गुजरातमधील दोनच रूट खुले होते. भारतानेही आपल्या हवाई सीमेवर काही प्रतिंबध घातले होते. पण, ३१ मे रोजी ते हटवण्यात आल्याची घोषणा हवाई दलाकडून करण्यात आली होती. पण, पाकिस्तानने आपली सीमा खुली न केल्याने भारताच्या निर्णयाचा प्रवासी विमान कंपन्यांना फायदा झाला नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी