Pakistan Army And Tehrik E Taliban Pakistan TTP Impending Deal Opposition Grows On Sharia Law In Khyber Pakhtunkhwa : पाकिस्तानच्या लष्कराने शरणागती पत्करली. आता पाकिस्तानमधील पश्तून बहुल भागात तेहरिक ए तालिबान पाकिस्तान या संघटनेची सत्ता असेल. ज्या तेहरिक ए तालिबान पाकिस्तान अर्थात टीटीपीची सत्ता असेल त्या भागात शरियत कायदा लागू केला जाईल.
पाकिस्तानचे लष्कर आणि टीटीपी यांच्यात सुरू असलेला संघर्ष थांबला आहे. पाकिस्तानच्या सैन्याने शरणागती पत्करून टीटीपीसोबत शांतता करार केला आहे. या करारानुसार पाकिस्तानच्या तुरुंगांमध्ये असलेल्या टीटीपीच्या सर्व सदस्यांना सोडले जाणार आहे. टीटीपी सदस्यांविरोधात वेगवेगळ्या कोर्टात सुरू असलेले खटले मागे घेतले जाणार आहेत. पाकिस्तानमधील पश्तून बहुल भागातून पाकिस्तानचे सैनिक इतर ठिकाणी असलेल्या सैन्य तळांवर जातील.
खैबर पख्तुनख्वा प्रांतातील मलकंदमध्ये टीटीपी शरियत कायदा लागू करणार आहे. लवकरच शरियत कायदा संपूर्ण पश्तून बहुल भागात लागू होणार असल्याचे वृत्त आहे.
अमेरिका आणि तालिबान यांच्यात अफगाणिस्तानमध्ये लढाई सुरू असताना पाकिस्तानमध्ये सैन्याविरोधात शस्त्र हाती घेऊन दहशतवादी कारवाया सुरू झाल्या. टीटीपीची स्थापना २००७ मध्ये झाली. पण मागील काही आठवड्यांत टीटीपीची ताकद वाढल्याचे चित्र आहे.
पाकिस्तानात २०१४ मध्ये पेशावर आर्मी पब्लिक स्कूल येथे टीटीपीने हल्ला केला होता. या हल्ल्यात टीटीपीने १३२ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना ठार केले होते. या घटनेनंतर पाकिस्तानचे सैन्य आणि टीटीपी यांच्यातील संघर्षाची तीव्रता वाढत गेली. पण ताज्या घडामोडींमध्ये पाकिस्तानच्या सैन्याने टीटीपीसमोर शरणागती पत्करली.
मागील चौदा वर्षांपासून सुरू असलेला संघर्ष थांबविण्यासाठी ठोस पावले उचलत असल्याचे पाकिस्तान सरकारने आणि पाकिस्तानच्या सैन्याने सांगितले. पण पाकिस्तानच्या या निर्णयावर पेशावरमध्ये ज्यांची मुलं ठार झाली त्यांचे आईवडील नाराज आहेत.
पाकिस्तान सरकार आणि पाकिस्तानचे सैन्य यांच्या निर्णयामुळे पाकिस्तानचे मोठे नुकसान होणार आहे. तालिबानला हातपाय पसरण्याची संधी मिळणार आहे. निर्णय घेणाऱ्यांचा या मागील विचार मोठा संघर्ष टाळणे हा असेल. पण यामुळे एका भूभागातील लाखो नागरिकांना अनिच्छेने नवा सत्ताधाऱ्यांना आणि शरियत कायद्याला सामोरे जावे लागेल, असे तज्ज्ञांचे मत आहे. पाकिस्तान सरकारने २००८ आणि २००९ मध्येही असे तडजोडीचे निर्णय घेतले. पण नंतर पाकिस्तानच्या लष्कराने हे निर्णय बासनात गुंडाळले होते. यावेळी तसे झाले तर ठीक नाही तर पाकिस्तानसाठी वाईट परिस्थिती निर्माण होईल; अशी भीती पाकिस्तानचे माजी खासदार अफ्रासाइब खटक यांनी व्यक्त केली. मागच्यावेळी आधी माघार घेऊ नंतर प्रतिहल्ला करण्यासाठी चालून गेलेल्या पाकिस्तानच्या सैन्याला मोठी मोहीम राबवावी लागली याची त्यांनी आठवण करून दिली. पण यावेळी पाकिस्तानच्या लष्कराच्या निर्णयांवर देशातूनच मोठ्या प्रमाणावर टीका होत असल्याचे चित्र आहे.