जम्मू-काश्मीर: शांतता भंग करण्यासाठी पाकिस्तान ड्रोनमधून टाकतो शस्त्रे

लोकल ते ग्लोबल
Updated Sep 19, 2020 | 16:12 IST | टाइम्स नाऊ मराठी

पाकिस्तान जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना शस्त्रांचा पुरवठा करण्यासाठी ड्रोनचा वापर करतो - डीजीपी दिलबाग सिंग, जम्मू-काश्मीर

J&K DGP Dilbagh Singh
जम्मू-काश्मीरमधील शांतता भंग करण्यासाठी पाकिस्तान ड्रोनमधून शस्त्रास्त्रे टाकत आहे: डीजीपी दिलबाग सिंह  |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • पाकिस्तान जम्मू-काश्मीरमधील शांतता भंग करण्यासाठी ड्रोनमधून हत्यारे पाठवत असल्याचा डीजीपी दिलबाग सिंगांचा आरोप
  • ‘लष्कर’च्या तीन दहशतवाद्यांना अटक, पाकिस्तानने ड्रोनद्वारे पाठवलेली शस्त्रे जप्त
  • सप्टेंबरमध्ये पाकिस्तानी सैन्याने नियंत्रणरेषेजवळ ३१ वेळा केले आहे शस्त्रसंधीचे उल्लंघन

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरचे डीजीपी (Jammu and Kashmir DGP) दिलबाग सिंग (Dilbagh Singh) यांनी शनिवारी म्हटले की जम्मू-काश्मीरमधील शांतता भंग (disturb peace in J&K) करण्यासाठी पाकिस्तान ड्रोनद्वारे शस्त्रे (Pakistan dropping weapons by drones) पाठवत आहे, पण अशा प्रकारच्या हालचाली रोखण्यात सुरक्षादलांना (forces thwart these attempts) यश आले आहे.

“जम्मू-काश्मीरमधील शांतता भंग करण्यासाठी पाकिस्तान ड्रोनद्वारे शस्त्रे पाठवत आहे. ते दहशतवाद्यांना भारतात पाठवण्याचाही प्रयत्न करत आहेत. ड्रोनद्वारे हत्यारे पाठवणे हे अवघड आहे, पण आम्ही अशा हालचाली थांबवत आहोत आणि आम्हाला यशही मिळत आहे.” असे डीजीपींनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले.

त्यांनी पुढे असेही सांगितले की भारताचा हा शेजारी या प्रदेशातील आतंकवादी संघटनांना मदत करून या भागात दहशतवाद पसरवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत आहे.

सिंग म्हणाले, “पाकिस्तान या प्रदेशातील आतंकवादी संघटनांना मदत करून या भागात दहशतवाद पसरवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत आहे. आम्ही ड्रगची तस्करी करणाऱ्यांशी कडक व्यवहार करूच. पाकिस्तान दहशतवादाला पैसा पुरवण्यासाठी अंमल पदार्थ आणि दहशतवाद अशा संयुक्त मार्गाचा वापर करत आहे.”

याआधी आज लष्कर-ए-तोयबाच्या तीन संशयित दहशतवाद्यांना राजौरी जिल्ह्यातून सुरक्षादलांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे ड्रोनद्वारे पाकमधून आलेली अनेक शस्त्रास्त्रे मिळाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

हे तिन्ही संशयित दहशतवादी दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील असून त्यांची नावे राहिल बशीर, आमिर जान आणि हाफिज युनिस वानी अशी आहेत. पोलिसांनी सांगितले आहे की ते पाकिस्तानकडून ड्रोनद्वारे पाठवण्यात आलेली शस्त्रे घेण्यासाठी राजौरीला गेले होते.

जम्मूचे पोलीस आयजी मुकेश सिंग यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे जप्त करण्यात आलेल्या शस्त्रांमध्ये २ AK-56 रायफल्स, १८० राऊंड्सच्या ६ AK-मॅगझीन, २ चिनी पिस्तुले, ३० राऊंड्सच्या ३ पिस्तुल मॅगझीन्स, ४ ग्रेनेड्स आणि १ लाख रुपये रोख रक्कम होती.

पाकिस्तानच्या निशाण्यावर नियंत्रण रेषेजवळील भाग

पाकिस्तानच्या सैन्याने शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी पूँछ जिल्ह्यातील निंयंत्रणरेषेजवळ मोठा गोळीबार आणि मॉर्टर शेलिंग केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या या हालचालींना सडेतोड उत्तर दिले आहे.

संरक्षण प्रवक्त्याने म्हटले आहे, “आज पहाटे ४:३०च्या सुमाराला पाकिस्तानच्या सैन्याने अकारण शस्त्रसंधीचे उल्लंघन करत छोट्या हत्यारांनी गोळीबार आणि मॉर्टर्स शेलिंग केले.” पाकिस्तानी सैन्याने या महिन्यात ३१ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी