Pakistan ex-PM Imran Khan booked under anti-terror law : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांना पुढील काही तासांत अटक होण्याची शक्यता आहे. इमरान खान यांच्या विरोधात राजधानी इस्लामाबादमधील मारगल्ला पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल झाली आहे. ही एफआयआर दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत दाखल झाली आहे.
सत्र न्यायालयाच्या एका अतिरिक्त न्यायाधीशाला आणि एका पोलीस अधिकाऱ्याला धमकावल्याचा आरोप इमरान खान यांच्यावर ठेवण्यात आला आहे. न्यायदंडाधिकारी अली जावेद (मॅजिस्ट्रेट अली जावेद) यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी एफआयआर दाखल केली आहे. ही एफआयआर दहशतवादविरोधी कायद्यातील सातव्या क्रमांकाच्या तरतुदी अंतर्गत दाखल झाली आहे.
पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ (पीटीआय) या पक्षाचे अध्यक्ष इमरान खान यांनी पक्षाच्या एका सभेदरम्यान अतिरिक्त सत्र न्यायाधीश झेबा चौधरी आणि पोलीस अधिकाऱ्यांना धमकाविले असा आरोप ठेवून एफआयआर दाखल करण्यात आली आहे. न्यायव्यवस्था आणि पोलीस यंत्रणा यांना कायद्यानुसार काम करण्यापासून प्रतिबंध करण्याच्या उद्देशानेच धमकाविण्यात आले असाही आरोप इमरान खान यांच्यावर होत आहे. सभेत भाषण करताना इमरान खान यांनी दहशत पसरविण्यासाठी आणि कायदा सुव्यवस्थेला बाधा निर्माण करून सरकारी यंत्रणेच्या कामात अडथळे आणण्यासाठी चिथावणी दिल्याचा गंभीर आरोपही इमरान खान यांच्यावर होत आहे.
याआधी इमरान खान समर्थक शाहबाझ गिल यांना इस्लामाबादमध्ये मिळत असलेल्या वागणुकीविषयी इमरान खान यांनी नाराजी व्यक्त केली. इस्लामाबादचे पोलीस महानिरीक्षक, उप महानिरीक्षक आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश झेबा चौधरी यांनी जे वर्तन केले आहे त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील, असे इमरान खान जाहीरपणे म्हणाले. गिल यांची कोठडीत रवानगी होत असेल तर सत्ताधारी आणि त्यांचे समर्थक यांचीही व्हायला हवी. कोणी आम्हाला घाबरविण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांनी ते प्रयत्न सोडून द्यावे अशा स्वरुपाचे वक्तव्य इमरान खान यांनी केले. यानंतर इमरान खान यांच्या विरोधात तक्रार दाखल झाली आहे.
याआधी इमरान खान यांचे सरकार विरोधकांनी एकत्र येऊन पाडले. अचानक इमरान खान यांचे अनेक समर्थक विरोधकांच्या सोबत उभे राहिले. सरकार अडचणीत आहे आणि पु्न्हा लगेच बहुमत मिळवणे कठीण आहे याची जाणीव होताच इमरान खान यांनी पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान सोडून स्वतःचे खासगी निवासस्थान गाठले. या घटनेनंतर इमरान खान आणि त्यांचे राजकीय विरोधक यांच्यात संघर्ष सुरू झाला.
इमरान खान यांच्या राजकीय विरोधकांनी पाकिस्तानमध्ये सत्ता स्थापन केली. यानंतर इमरान खान आणि त्यांचे राजकीय विरोधक यांच्यातील संघर्ष सुरू झाला. आता हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.