दहशतवाद्यांना पैसा देणारा होणार पाकिस्तानचा पंतप्रधान

Pakistan PM In Waiting Shehbaz Sharif Funded Hafiz Saeed Jamaat Ud Dawa As Punjab CM : पाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांची निवड सोमवारी होणार आहे. पण या पदासाठी चर्चेत असलेली व्यक्ती दहशतवाद्यांना पैसा पुरवणारी म्हणून ओळखली जाते. ही बाब भारताची चिंता वाढवणारी आहे.

Pakistan PM In Waiting Shehbaz Sharif Funded Hafiz Saeed Jamaat Ud Dawa As Punjab CM
दहशतवाद्यांना पैसा देणारा होणार पाकिस्तानचा पंतप्रधान  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • दहशतवाद्यांना पैसा देणारा होणार पाकिस्तानचा पंतप्रधान
  • भारताची चिंता वाढवणारी बाब
  • शहबाज शरिफ पंतप्रधान झाल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंध कसे असतील यावरून चर्चा सुरू

Pakistan PM In Waiting Shehbaz Sharif Funded Hafiz Saeed Jamaat Ud Dawa As Punjab CM : इस्लामाबाद : पाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांची निवड सोमवारी होणार आहे. पण या पदासाठी चर्चेत असलेली व्यक्ती दहशतवाद्यांना पैसा पुरवणारी म्हणून ओळखली जाते. ही बाब भारताची चिंता वाढवणारी आहे.

पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीत अविश्वासदर्शक ठरावाला बहुमताने मंजुरी मिळाली आणि इमरान खान सरकार पडले. नव्या पंतप्रधानांची औपचारिक निवड सोमवार ११ एप्रिल २०२२ रोजी होणार आहे. या पदावर पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरिफ यांच्या भावाची म्हणजेच शहबाज शरिफ यांची निवड होणार असल्याची चर्चा आहे. 

शहबाज शरिफ हे पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या (पीपीपी) नवाझ गटाचे नेते आहे. नॅशनल असेंब्लीचे सदस्य होण्याआधी ते पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री होते. पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री असताना शहबाज शरिफ यांनी दहशतवादी हाफिझ सईद याच्या फायद्याचे निर्णय घेतले होते. 

लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख असलेल्या हाफिझ सईदने जमात-उल-दावा नावाच्या संघटनेची स्थापना केली. ही संघटना धार्मिक आणि सामाजिक कार्य करण्याच्या नावाखाली निधी संकलन करते. या पैशांतून पाकिस्तानच्या नव्या पिढीमध्ये मध्ययुगीन विचारांचा प्रचार प्रसार करते. धार्मिक शिक्षण देण्याच्या नावाखाली मुलांमधून दहशतवादी विचारांची पिढी घडविते. नंतर निवडक मुलांना पुढील प्रशिक्षणासाठी दहशतवाद प्रशिक्षण तळावर पाठवते. या तळावर तयार झालेले दहशतवादी भारतविरोधी कारवाया करतात. मागील काही वर्षांत वेगवेगळ्या देशांमध्ये पाकिस्तानमधून दहशतवादी पाठविण्यात आले. या दहशतवाद्यांपैकी अनेकांच्या जडणघडणीशी जमात-उल-दावा या संघटनेचा संबंध आहे.

धक्कादायक बाब म्हणजे पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री असताना शहबाज शरिफ यांनी जमात-उल-दावा या संघटनेला वेगवेगळ्या पद्धतीने आर्थिक मदत पुरविली होती. जून २०१३ मध्ये पंजाब प्रांताच्या सरकारी खजिन्यातून जमात-उल-दावा या संघटनेला ६.१ कोटी रुपये देण्यात आले. हा पैसा जमात-उल-दावा या संघटनेच्या 'मरकज-ए-तोयबा'साठी देण्यात आला होता. तसेच 'मरकज-ए-तोयबा'च्या 'नॉलेज पार्क'साठी ३५० दशलक्ष रुपयांची तरतूद शहबाज शरिफ यांच्या कार्यकाळात पंजाब प्रांताने केली होती. पाकिस्तानच्या पंजाब प्रांताने शहबाज शरिफ मुख्यमंत्री असताना 'मुरीदकी मरकज'ला ६१.३५ दशलक्ष रुपयांचे अनुदान दिले होते. 

शहबाज शरिफ यांच्या कार्यकाळात हाफिझ सईदच्या संघटनेला केलेल्या आर्थिक मदतीच्या नोंदी पंजाब प्रांताच्या सरकारी कागदपत्रांमध्ये दिसतात. हाफिझवर मुंबईत झालेल्या २६/११च्या हल्ल्याचा आरोप असूनही पाकिस्तानच्या पंजाब प्रांताने मुक्तहस्ते त्याच्या संघटनेला पैसा दिला. 

एवढे ठोस पुरावे असल्यामुळेच शहबाज शरिफ पंतप्रधान झाल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंध कसे असतील यावरून चर्चा सुरू झाली आहे. जाहीरपणे शहबाज शरिफ काश्मीरच्या मुद्यावर भारताशी चर्चा करण्यास उत्सुक असल्याचे सांगत आहे. तसेच भारतासोबत शांततेसाठी चर्चा करण्यास तयार असल्याचेही सांगत आहेत. पण भारताने अद्याप त्यांना प्रतिसाद दिलेला नाही. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी