पाकिस्तानमध्ये हिंदू मंदिरावर हल्ला

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील रहीमयार खान जिल्ह्यात एका गणपती मंदिरावर मुस्लिमांनी हल्ला केला. कडव्या विचारांच्या मुस्लिमांच्या हल्ल्यात मंदिराचे नुकसान झाले. या घटनेचे व्हिडीओ व्हायरल झाले

 pakistan supreme court takes note of mob attack on hindu temple
पाकिस्तानमध्ये हिंदू मंदिरावर हल्ला 

थोडं पण कामाचं

  • पाकिस्तानमध्ये हिंदू मंदिरावर हल्ला
  • मंदिरावरील हल्ल्याचे व्हिडीओ व्हायरल
  • पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील रहीमयार खान जिल्ह्यात एका गणपती मंदिरावर हल्ला

लाहोर: पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील रहीमयार खान जिल्ह्यात एका गणपती मंदिरावर मुस्लिमांनी हल्ला केला. कडव्या विचारांच्या मुस्लिमांच्या हल्ल्यात मंदिराचे नुकसान झाले. या घटनेचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. पाकिस्तानमधील मीडियाने या घटनेची दखल घेतली आहे. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी इमरान खान सरकारला आणि पंजाब प्रांताच्या सरकारला नोटीस बजावली आहे. pakistan supreme court takes note of mob attack on hindu temple

देशातील अल्पसंख्यांक सुरक्षित नाहीत. अल्पसंख्यांकांवर तसेच त्यांच्या धार्मिक स्थळांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे. पाकिस्तानमध्ये हिंदू, बौद्ध, खिस्ती (ईसाई) असुरक्षित आहेत. सरकार या अल्पसंख्यांकांचे संरक्षण करण्यात सातत्याने सपशेल अपयशी ठरत आहे. या प्रकरणी स्पष्टीकरण द्या तसेच अल्पसंख्यांकांच्या आणि त्यांच्या धार्मिक स्थळांच्या सुरक्षेसाठी काय करत आहात आणि काय करणार आहात त्याची सविस्तर माहिती द्या; अशा स्वरुपाची नोटीस पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने बजावली आहे. पाकिस्तानमधील अनेक मानवाधिकार संघटना तसेच अल्पसंख्यांकांशी संबंधित संघटनांनी गणपती मंदिरावरील हल्ल्याचा जाहीर निषेध केला आहे.

पाकिस्तानमधील घटनेची भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने गंभीर दखल घेतली आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानमध्ये हिंदू, बौद्ध, खिस्ती (ईसाई) यांच्यासह सर्व अल्पसंख्यांक आणि त्यांच्या धार्मिक स्थळांवर होत असलेले हल्ले तसेच ताज्या गणपती मंदिरावरील हल्ल्याचा तीव्र शब्दात जाहीर निषेध केला. पाकिस्तानने अल्पसंख्यांक आणि त्यांच्या धार्मिक स्थळांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाय करावे, असे भारताने पाकिस्तानला सुनावले.

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील लाहोर शहरापासून ५९० किमी. अंतरावर रहीमयार खान जिल्ह्यात भोंग येथे गणपतीचे मोठे मंदिर आहे. हिंदू धर्मिय मोठ्या संख्येने नियमितपणे या मंदिरात दर्शनासाठी येतात. या मंदिरावर हजारोंच्या संख्येने जमावाने संघटीत हल्ला केला. व्यवस्थित नियोजन करुन मंदिरात घुसखोरी करणाऱ्या जमावाने मूर्तींची तोडफोड केली. मंदिराच्या बांधकामाची नासधूस केली. मंदिरात सजावटीसाठी लावलेले दिवे, झुंबर, कलाकृती यांची मोडतोड करण्यात आली. मंदिरातील काचेचे सामान आणि लाकडाचे फर्निचर नष्ट करण्यात आले. जमावाने यथेच्छ धूडगूस घातल्यानंतर मंदिराला आग लावली. मंदिर आणि भोवतालचा परिसर याचे जास्तीत जास्त नुकसान करण्याचा हेतूने जमावाने नियोजन करुन हल्ला केला. जमावाच्या हिंसेला स्थानिक पोलीस यंत्रणेचा मूक पाठिंबा होता. जमाव निघून जाईपर्यंत घटनास्थळी एकही पोलीस आला नव्हता. 

याआधी डिसेंबर २०२० मध्ये पाकिस्तानच्या खैबरपख्तूनख्वामधील कराक जिल्ह्यात एका हिंदू मंदिरावर जमावाने नियोजन करुन हल्ला केला होता. त्यावेळी पण जमावाने धूडगूस घातल्यानंतर मंदिराला आग लावली होती. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी