इस्लामाबाद : पाकिस्तानच्या खैबर पख्तुनवा (अफगाणिस्तान सीमेजवळचा पाकिस्तानच्या वायव्य भागातील प्रांत) प्रांतात दहशतवादी हल्ल्यात दहा चिनी नागरिकांचा मृत्यू झाला आणि २६ चिनी नागरिक जखमी झाले. या नागरिकांच्या नातलगांना पाकिस्तानचे शहबाझ शरिफ सरकार ११.६ दशलक्ष डॉलर अर्थात ९१ कोटी ३० लाख रुपयांची भरपाई देणार आहे. पाकिस्तानचे अर्थमंत्री मिफ्ता इस्माइल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका बैठकीत हा निर्णय झाला.
कोहिस्ता जिल्ह्यात दासू जलविद्युत प्रकल्पाजवळ चिनी नागरिकांच्या वाहनाला लक्ष्य करून आत्मघातकी बॉम्बस्फोट करण्यात आला. या हल्ल्यात १३ ऑगस्ट २०२१ रोजी झालेल्या हल्ल्यात दहा चिनी नागरिकांचा मृत्यू झाला आणि २६ चिनी नागरिक जखमी झाले. या घटनेमुळे जलविद्युत प्रकल्पाच्या कामावर परिणाम झाला. चीन सरकार संतापले. पाकिस्तानने प्रकल्पाचे ठिकाण आणि आसपास पुरेसा बंदोबस्त ठेवणे अपेक्षित होते. पण पाकिस्तानकडून हलगर्जीपणा झाला असे चीन सरकारचे म्हणणे होते. पाकिस्तानला चिनी दबाव सहन करणे कठीण झाले. अखेर पाकिस्तान सरकारने मृतांच्या नातलगांना भरपाई आणि जखमींना उपचारासाठी आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला. चिनी नागरिकांना ११.६ दशलक्ष डॉलर अर्थात ९१ कोटी ३० लाख रुपयांची भरपाई देणार असल्याचे पाकिस्तानने सरकारने जाहीर केले.
आधीच आर्थिक अडचणींमधून जात असलेल्या पाकिस्तानवर आता चिनी नागरिकांना भरपाई देण्याची घोषणा केल्यामुळे नवा आर्थिक भार येणार आहे. सध्या अमेरिकेचा एक डॉलर म्हणजे पाकिस्तानचे २४० रुपये ९२ पैसे अशी स्थिती आहे. डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानच्या रुपयाची मोठी घसरण सुरू आहे.
विदेशी गंगाजळी आणि महसुली उत्पन्न या दोन्हीमध्ये घट झाली आहे. यामुळे पाकिस्तान समोर आर्थिक प्रश्न दिवसागणिक गंभीर होत आहेत. जीवनावश्यक वस्तूंचे दर पाकिस्तानमध्ये आकाशाला भिडले आहेत. सातत्याने महागाई वाढत आहे. सामान्यांसाठी जगणे कठीण झाले आहे.
अर्थव्यवस्था सावरण्यासाठी पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे १.२ अब्ज डॉलरचे कर्ज मागितले आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने यावर अद्याप निर्णय जाहीर केलेला नाही. परिस्थिती एवढी बिकट आहे की नोव्हेंबर २०२२ मध्ये निवृत्त होणार असलेले पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल बाजवा लष्करी विषय बाजुला ठेवून आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अधिकाऱ्यांना भेटून पैसे लवकर मिळावेत यासाठी प्रयत्न करत आहेत. या प्रयत्नांना अद्याप यश मिळालेले नाही. यामुळे पाकिस्तानची अवस्था बिकट होत आहे.