भुयारातून घुसखोरी, ड्रोनद्वारे शस्त्र पुरवठा; पाकिस्तानचा डाव उघड

pakistan using tunnel for insurgency पाकिस्तानमधून दहशतवादी भुयारी मार्गाने जम्मू काश्मीरमध्ये घुसखोरी करतात. या घुसखोरीसाठी पाकिस्तान वेगवेगळ्या ठिकाणी जंगलात भुयारे खणतो.

pakistan using tunnel for insurgency
भुयारातून घुसखोरी 

थोडं पण कामाचं

  • भुयारातून घुसखोरी, ड्रोनद्वारे शस्त्र पुरवठा; पाकिस्तानचा डाव उघड
  • पाकिस्तानमधून दहशतवादी भुयारी मार्गाने जम्मू काश्मीरमध्ये घुसखोरी करतात
  • सांबा जिल्ह्यातील गलार गावाजवळ १७० मीटर लांबीचे भुयार आढळले

जम्मूः जम्मू काश्मीरच्या (Jammu Kashmir) पोलीस (Police) प्रमुखांनी रविवारी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी पाकिस्तान दहशतवाद्यांना भारतात पाठवण्यासाठी करत असलेल्या अनेक उद्योगांची पुराव्यांसह माहिती सादर केली. 

पाकिस्तानमधून दहशतवादी भुयारी मार्गाने जम्मू काश्मीरमध्ये घुसखोरी करतात. या घुसखोरीसाठी पाकिस्तान वेगवेगळ्या ठिकाणी जंगलात भुयारे खणतो. या भुयारांची सुरुवात पाकिस्तानमध्ये होते आणि त्यांचे दुसरे टोक भारताच्या हद्दीत तयार केले जाते. याच भुयारी मार्गाने दहशतवादी ये-जा करतात. दहशतवाद्यांसाठी शस्त्र, पैसा अशी महत्त्वाची मदत भुयारी मार्गानेच पाठवली जाते. या व्यतितिरिक्त मोठ्या प्रमाणावर मोठ्या प्रमाणावर शस्त्र पुरवायची असल्यास ड्रोनची मदत घेतली जाते. 

मालवाहक ड्रोन मोठा शस्त्रसाठा घेऊन पाकिस्तानमधून उड्डाण करतात. आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेजवळ अनेक ठिकाणी भारतात घनदाट जंगल आहे. या जंगलात रात्रीच्या वेळी प्रवेश करुन ड्रोन एखाद्या निश्चित केलेल्या ठिकाणी शस्त्र टाकून वेगाने निघून जाते. पाकिस्तानचे हे नवे डावपेच लक्षात येताच भारतीय सुरक्षा पथके आणखी सक्रीय झाली आहेत. आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेजवळ ठिकठिकाणी भुयारांचा शोध घेण्यासाठी आधुनिक यंत्रणेची मदत घेतली जात आहे. जंगलात ज्या भागांमध्ये पाकिस्तानचे ड्रोन येऊ शकतात अशा परिसरांच्या जवळ रडार नेटवर्क पोहोचेल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. काही ठिकाणी अतिरिक्त रडार बसवण्यात आले आहेत. भारताच्या हद्दीत पाकिस्तानचे ड्रोन दिसताचक्षणी नष्ट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

भूसुरुंग शोधणाऱ्या यंत्रांसारखी भुयारांचा शोध घेणारी यंत्रणा भारताने विकसित केली आहे. या आधुनिक यंत्रणेच्या मदतीने वेगाने भुयारांचा शोध घेऊन ती नष्ट केली जात आहे. दहशतवाद्यांच्या घुसखोरीला आळा घालण्यासाठी पोलीस आणि सुरक्षा पथकांनी संयुक्त कारवाई सुरू केली आहे. परस्पर समन्वय राखून काम सुरू आहे. दहशतवाद्यांना जीवंत अथवा मृत पकडून दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी कठोर कारवाई सुरू आहे. घुसखोर विरोधी सुरक्षा पथकांची विशेष टीम सक्रीय झाली आहे. 

अलिकडेच आंतरराष्ट्रीय सीमेजवळ सांबा जिल्ह्यातील गलार गावाजवळ १७० मीटर लांबीचे भुयार आढळले. हे भुयार २० ते २५ फूट खोल होते. पाकिस्तानच्या हद्दीतून सुरू झालेले हे भुयार भारताच्या हद्दीत उघडत होते. या भुयाराचा शोध २८ ऑगस्ट रोजी लागला होता. 

जम्मू काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह (Jammu Kashmir DGP Dilbag Singh) यांनी घटनास्थळी जाऊन भुयाराची पाहणी केली. याआधी अशाच स्वरुपाचे मोठे भुयार चनयारी येथे २०१३-१४ मध्ये आढळले होते. त्यांनी भुयारी मार्ग नष्ट करुन पाकिस्तानची घुसखोरी रोखण्यासाठी ठोस उपाय करण्याचे आदेश दिले.

जानेवारी २०२० मध्ये नगरोटा येथे झालेल्या चकमकीत जैश ए मोहम्मद संघटनेचे तीन दहशतवादी ठार झाले. हे दहशतवादी एका भुयारातून भारतात आले होते अशी माहिती गुप्तचर यंत्रणेला मिळाली. मात्र हे भुयार नेमके कोणत्या ठिकाणी आहे हे कळले नव्हते. त्यामुळे सुरक्षा पथकांनी शोध सुरू केला होता. अखेर भुयार सापडले आणि नष्ट करण्यात आल्याचे जम्मू काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह म्हणाले.

आणखी अशा स्वरुपाची भुयारे असतील, त्यामुळे सीमा सुरक्षा दलाच्या मदतीने भुयारांचा शोध घेण्यासाठी मोठी मोहीम हाती घेतल्याचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी सांगितले. ही मोहीम वेळखाऊ असली तरी अत्यावश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. 

भारत-चीन सीमेवर तणाव आहे. या तणावाचा गैरफायदा घेत पाकिस्तान जम्मू काश्मीरमध्ये घातपात करू नये यासाठी पुरेशी खबरदारी घेत असल्याची माहिती पोलीस महासंचालकांनी दिली. त्यांनी पोलीस यंत्रणा दक्षता घेत असल्याचे सांगितले. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर नव्या आव्हानांचा मुकाबला करत काम करत असल्याचे ते म्हणाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी