पॅन-आधार लिंक करण्यास आणखी अवधी, मार्चपर्यंत मुदतवाढ

लोकल ते ग्लोबल
Updated Dec 31, 2019 | 12:23 IST | टाइम्स नाऊ मराठी

पॅन-आधार कार्ड लिंक करण्यासाठी केंद्र सरकारने मुदतवाढ दिली आहे. मार्च २०२० पर्यंत तुम्ही तुमचे पॅन-आधार कार्ड लिंक करू शकता. याआधी केंद्र सरकारने आज म्हणजेच ३१ डिसेंबर २०१९ ही अंतिम मुदत दिली होती.

Pan aadhaar linking deadline extended to march 2020
पॅन-आधार लिंक करण्यास आणखी अवधी, मार्चपर्यंत मुदतवाढ  |  फोटो सौजन्य: Times of India

थोडं पण कामाचं

  • पॅन-आधार कार्ड लिंक करण्यासाठी केंद्र सरकारने मुदतवाढ दिली आहे.
  • केंद्र सरकारने पॅन-आधार कार्ड लिंक करण्याची मुदत आतापर्यंत जवळपास आठ वेळा वाढवली आहे.
  • मार्च २०२० पर्यंत तुम्ही तुमचे पॅन-आधार कार्ड लिंक करू शकता.

नवी दिल्ली: तुम्ही तुमचे पॅनकार्ड आणि आधार कार्ड अद्याप लिंक केलेले नाही तर तुमच्यासाठी दिलासादायक बातमी आहे. पॅन-आधार कार्ड लिंक करण्यासाठी केंद्र सरकारने मुदतवाढ दिली आहे. मार्च २०२० पर्यंत तुम्ही तुमचे पॅन-आधार कार्ड लिंक करू शकता. याआधी केंद्र सरकारने आज म्हणजेच ३१ डिसेंबर २०१९ ही अंतिम मुदत दिली होती.

आयकर कायदा १९६१ मधील तरतूद १३९AA नुसार, तुमचे पॅन कार्ड हे आधार कार्डशी लिंक असणे गरजेचे आहे. यासाठीची मुदत आता ३१ डिसेंबर २०१९ ते ३१ मार्च २०२० करण्यात आली आहे. ही माहिती CBDT (सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस)ने आपल्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरून दिली आहे. केंद्र सरकारने पॅन-आधार कार्ड लिंक करण्याची मुदत आतापर्यंत जवळपास आठ वेळा वाढवली आहे. सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात याबाबत निर्णय दिला होता. आधार हे आयकर परतावा भरण्यासाठी आणि पॅन कार्ड मिळण्यासाठी बंधनकारक असेल असा निर्णय यावेळी देण्यात आला होता. १ जुलै २०१७ पासून पॅन कार्ड असणाऱ्या प्रत्येक नागरिकाला आधार कार्ड मिळवण्याचा अधिकार आहे.

आधार कार्ड हे युनिक आयडेंटिफिकेशन ऑथोरिटी ऑफ इंडिया (UIDAI) कडून भारतातील नागरिकाला मिळते. तसेच पॅन हा दहा अंकी क्रमांक आयकर विभागाकडून देण्यात येतो. हा क्रमांक एखाद्या व्यक्तीचा किंवा कंपनीचा असू शकतो. याआधी केंद्र सरकारने आठ वेळा मुदतवाढ करूनही अद्याप या कामाला गती मिळालेली नाही. अनेक नागरिकांना पत्ता बदलणे, नाव बदलणे, संपर्क बदलणे अशा कामांसाठी आधार केंद्र उपलब्ध नाहीत. अशावेळी नागरिकांना बॅकेतील आधार केंद्रांचा दिलासा आहे. मात्र, बॅंकेतील आधार केंद्रांमध्ये कित्येक महिने तारीख मिळत नसल्याने हे काम संथगतीने सुरू आहे. परिणामी पॅन-आधार कार्ड लिंक करण्याचे कामही धीम्या गतीने सुरू आहे. अनेक ठिकाणी सरकारी आधार केंद्र बंद झाल्याने त्याचा परिणाम पॅन-आधार कार्ड लिंक करण्यावर होत असल्याचा अंदाज आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी