कोरोना व्हायरस पसरविण्यासाठी 'हा' प्राणी जबाबदार 

Corona virus News: कोरोना व्हायरसचा धोका जगभर पसरत आहे. दरम्यान, दक्षिण चीनमधील संशोधकाने याबद्दल मोठा खुलासा केला आहे.

pangolins may be intermediate hosts of novel corona virus research in china 
कोरोना व्हायरस पसरविण्यासाठी 'हा' प्राणी जबाबदार   |  फोटो सौजन्य: PTI

बीजिंग: Corona Virus: दक्षिण चीन कृषी विद्यापीठाच्या संशोधकांनी धोकादायक कोरोना व्हायरस पसरण्यामागील एक नवीन अहवाल तयार केला आहे. कोरोना व्हायरस हा कोणता प्राण्यामुळे सर्वाधिक वेगाने पसरत आहे याचा शोध या संशोधकांनी लावला आहे. सुमारे १००० नमुन्यांची तपासणी केल्यानंतर ते या निष्कर्षावर पोहोचले आहेत. संशोधकांनी आपल्या अहवालात नमूद केलं आहे की. खवले मांजर (पॅन्गोलिन) नावाचा प्राणी हा विषाणूचा प्रमुख वाहक आहे. याच्यामुळेच कोरोना व्हायरस वेगाने पसरत आहे. आण्विक जैविक शोध तंत्रज्ञानाच्या मदतीने, संशोधकांना असे आढळले आहे की ७०% कोरोना व्हायरस हे खवल्या मांजरीत आढळले आहेत.

शुक्रवारी दक्षिण चीन कृषी विद्यापीठाचे संशोधक आणि प्राध्यापक शेन योंगयी यांनी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. दरम्यान त्यांनी हे देखील स्पष्ट केलं की, खवले मांजर हा काही कोरोना व्हायरसचा एकमेव वाहक असू शकत नाहीत. परंतु ते कोरोना व्हायरसच्या पसरविण्यातील तो एक प्रमुख घटक असू शकतो.त्यांनी याबाबत असंही म्हंटलं की, लवकरच आपला संशोधन अहवाल देखील ते प्रसिद्ध करणार आहेत. याचवेळी पत्रकार परिषदेत त्यांनी लोकांना सल्ला दिला की, लोकांनी काही दिवस तरी शक्य तितक्या वन्य प्राण्यांपासून दूर राहिलं पाहिजे.

त्यांनी असेही म्हटले आहे की, आम्हाला आशा आहे की आमच्या या संशोधनामुळे जगातील इतर संशोधकांना हे शोधण्यात मदत होईल की कोरोना व्हायरससाठी मुख्यतः कोणते प्राणी जबाबदार आहेत आणि कोण त्याचे वाहक आहेत.

अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

सोशल मीडिया वर करोना विषयी विविध अफवा पसरत आहेत, त्यावर विश्वास ठेवू नये. विशेषतः चिकन खाल्ल्याने किंवा मांसाहार केल्याने कोरोनाची बाधा होऊ शकते असे संदेश फिरताना दिसत आहेत. या प्रकारच्या संदेशामध्ये काहीही तथ्य नाही. आरोग्याच्या दृष्टीने मांसाहार करताना तो पूर्णपणे शिजलेला असावा, कच्चे किंवा अर्धवट शिजलेले मांस खाऊ नये, हे महत्वाचे आहे. सोशल मिडियावरील प्रत्येक बाबीची अधिकाधिक स्त्रोतांमार्फत खातरजमा करावी, असेही आवाहन विभागामार्फत करण्यात येत आहे.

बाधित भागातून येणा-या व्यक्तींना भेदभावाची वागणूक नको 

चीन किंवा इतर करोना बाधित भागातून येणा-या व्यक्तींना कामावर रुजू करुन घेताना भेदभावाची वागणूक दिली जाते, असे लक्षात आले आहे. अनेक कंपन्यांमध्ये या कर्मचा-यांना वैद्यकीय प्रमाणपत्राची किंवा प्रयोगशाळा अहवालाची मागणी केली जाते, हे चुकीचे आहे. बाधित भागातून येणा-या व्यक्तींनी १४ दिवस घरी थांबावे आणि त्या काळात आरोग्य विभागामार्फत त्यांचे दैनंदिन सर्वेक्षण करण्यात येते. या काळात कोणतेही लक्षण न आढळलेल्या व्यक्तींना कोणत्याही तपासणीची गरज नाही. त्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र अथवा प्रयोगशाळा तपासणी अहवाल मागण्याची काहीही आवश्यकता नाही.

बाधित भागातून राज्यात आलेल्या एकूण १३५ प्रवाशांपैकी ५७ प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आतापर्यंत १६ हजार ६३ प्रवासी तपासण्यात आले आहेत, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी