Issue at IGI : दिल्ली विमानतळावर स्पाईसजेटचा बेपर्वा कारभार, बस न आल्याने प्रवासी टरमॅकवरून चालत विमानतळाकडे

विमान लँड झालं मात्र प्रवाशांना विमानतळापर्यंत घेऊन जाणारी बसच आली नाही. दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्पाईसजेटच्या प्रवाशांना त्यामुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागला.

Issue at IGI
दिल्ली विमानतळावर स्पाईसजेटचा बेपर्वा कारभार  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • स्पाईसजेटचा सावळा गोंधळ
  • लँडिंगनंतर विमानतळावर जायला बसच नाही
  • प्रवाशांनी केली पायी चालायला सुरुवात

Issue at IGI : कुठल्याही विमान (Flight) जेव्हा एखाद्या विमानतळावर (Airport) लँड (Landing) होतं, तिथे उतरणाऱ्या प्रवाशांना विमानतळावर घेऊन जाण्यासाठी बसची (Bus) सोय असते. विमान लँड झाल्यानंतर लगेचच या बसची सोय करण्यात आलेली असते, जेणेकरून प्रवाशांचा वेळ वाया जाऊ नये. त्यामुळे विमानातून उतरल्या उतरल्या समोर थांबलेल्या बसमध्ये प्रवासी बसतात आणि त्यांना एअरपोर्टपर्यंत सोडलं जातं. मात्र स्पाइसजेटच्या (Spicejet) एका विमानाने आलेल्या प्रवाशांसाठी अशी बस वेळेत न पोहोचल्याने त्यांना चालत विमानतळाकडे जावं लागण्याची घटना समोर आली आहे. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (IGI) ही घटना घडली आहे. 

अशी घडली घटना

हैदराबादवरून दिल्लीला आलेलं स्पाईलजेटचं विमान वेळेत लँड झालं खऱं, मात्र विमानातून उतरल्यावर प्रवाशांना बसच मिळाली नाही. प्रवाशांनी सुमारे 45 मिनिटं बसची वाट पाहिली आणि त्यातील काही प्रवाशांनी चालत चालतच विमानतळ गाठण्याचा निर्णय घेतला. प्रवासी आपापल्या बॅगा आणि इतर साहित्य घेऊन पायीच चालू लागले. टरमॅकवरून चालत चालत ते विमानतळाकडे निघाले. एखादं विमान लँड झाल्यानंतर ती विमान कंपनी आपल्या बसचा उपयोग करून प्रवाशांना विमानतळावर सोडत असते. मात्र स्पाईसजेटच्या बस वेळेत का पोहोचल्या नाहीत, याची चौकशी आता डीजीसीएकडून केली जाणार आहे. 

स्पाईसजेटने आरोप फेटाळले

दरम्यान, स्पाईसजेट कंपनीने मात्र प्रवाशांचे आरोप फेटाळले आहेत. काही तांत्रिक कारणामुळे बस वेळेवर पोहोचू शकली नाही. मात्र बसची सोयच करण्यात आली नव्हती, हा आरोप चुकीचा असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. बस विमानापर्यंत पोहोचायला काहीसा उशीर झाला. मात्र त्यानंतर सर्व प्रवाशांना बसमध्ये बसवूनच विमानतळावर पोहोचव्यात आल्याचा दावा कंपनीनं केला आहे. काही लोकांनी विमानतळाच्या दिशेने चालायला सुरुवात केली होती. मात्र त्यांनादेखील अखेर बसमधूनच विमानतळावर सोडण्यात आलं. हे प्रवासी अवघे काही मीटर अंतरच चालून गेले होते. त्यामुळे त्यांची फार गैरसोय झाली, हा दावाही चुकीचा असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. 

अधिक वाचा - Poor Thief : जेलमध्ये जाण्यासाठी मुद्दाम केली चोरी, कारण ऐकून येईल चोराची दया

टरमॅकवरून चालणे धोक्याचे

विमान जेव्हा कुठल्याही विमानतळावर उतरलं, तेव्हा तिथून विमानतळ हे काही मीटरच्या अंतरावर असतं. विमान लँड होण्याच्या जागेपासून विमानतळापर्यंत जाण्यासाठी बसना एक मार्ग निश्चित करून दिलेला असतो. या मार्गावरून फक्त बस जाणं अपेक्षित असतं. तिथे कुणीही पायी चालत जात नाही. या मार्गावरून चालत जाणं धोक्याचं असल्याचं सांगण्यात येतं. मात्र प्रवाशांना 45 मिनिटे वाट पाहूनही बस न आल्यामुळे चालत जावं लागलं, असं काही प्रत्यक्षदर्शी सांगत आहेत. 

अधिक वाचा - OMG! आठवी-नववीत शिकणारी पाच मुलं पोहोचली दुसऱ्या राज्यात, सुरु होती लग्नाची तयारी, तेवढ्यात पोहोचले पोलीस..

व्हिडिओ होतोय व्हायरल

या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. विमानापाशी थांबलेले काही लोक आणि चालत विमानतळाकडे जाणारे प्रवासी या व्हिडिओत दिसत आहेत. नेमकं काय घडलं, कशामुळे बसला उशीर झाला या गोष्टींची माहिती चौकशीनंतरच समोर येणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी