मुंबई : गुजरातचे (Gujarat) प्रसिद्ध पाटीदार नेते (Patidar leader) हार्दिक पटेल (Hardik Patel) यांनी आज भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला. तत्पूर्वी काँग्रेस नेत्या श्वेता ब्रह्मभट्ट यांनी प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. कधीकाळी भाजप टीकेची झोड उठवणारे हार्दिक पटेल यांनी काँग्रेसच्या हाताची साथ सोडून यांनी हातात कमळ घेतलं आहे. या वर्षाच्या अखेरीस गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. त्याआधीच हार्दिक पटेल भाजपात प्रवेश केला आहे, यामुळे हा काँग्रेससाठी धक्का समजला जात आहे.
राज्यात 20 वर्षांहून अधिक काळ भाजपची सत्ता आहे. हार्दिक यांच्या भाजप प्रवेशामुळे भाजपला सत्तेतून खाली खेचण्यासाठी काँग्रेसकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना धक्का बसला असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी हार्दिकने कोबा परिसर ते भाजप कार्यालय 'कमलम' असा रोड शो केला, ज्यामध्ये हजारो लोक उपस्थित होते. यानंतर त्यांनी 12.39च्या विजय मुहूर्तावर भाजपात प्रवेश केला. हार्दिकच्या कमलममध्ये मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांच्या उपस्थितीत होते, त्यांच्याच उपस्थिती हार्दिकनं भाजपचं कमळ आपल्या हाती घेतलं आहे.
पक्षात येण्यापूर्वी हार्दिक यांनी एक पोस्टर जारी केले. पोस्टरनुसार भाजपमध्ये प्रवेश करण्याचा कार्यक्रम सकाळी होणार आहे. तत्पूर्वी त्यांनी निवासस्थानी दुर्गा पठण केले. दुर्गापूजेनंतर हार्दिक स्वामीनारायण येथे जाऊन गाईची पूजा केली.
काँग्रेसचे माजी नेते हार्दिक पटेल म्हणाले- मी आजपर्यंत पदाच्या लालसेपोटी कुठेही मागणी केलेली नाही. मी काँग्रेसही काम मागून सोडली आणि भाजपमध्येही कामाच्या व्याख्येत सामील होत आहे. कमकुवत लोक पदाबद्दल चिंता करतात. बलवान लोक कधीही याची चिंता करत नाहीत.
दीर्घकाळापासून काँग्रेसविरोधात नाराजी व्यक्त करणाऱ्या हार्दिक यांनी 17 मे रोजी ट्विटरवरून राजीनामा जाहीर केला होता. त्यांनी राहुल गांधींवर अनेक आरोप केले. राजीनाम्यानंतर ते सातत्याने भाजपच्या कार्याचे कौतुक करत होते आणि स्वतःला हिंदुत्वाचे समर्थकही म्हणवत होते. तेव्हापासून ते भाजपमध्ये जाण्याची चर्चा होती.
2015 मध्ये गुजरातमध्ये शासकीय नोकरी आणि शिक्षणात पाटीदार समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मोठे आंदोलन सुरू झाले होते. या आंदोलनाचा मुख्य चेहरा हार्दिक पटेल होते. संपूर्ण गुजरातमध्ये हे आंदोलन पेटले होते. या आंदोलनाचे नेतृत्व हार्दिक पटेलकडे असल्याने अनेकांच्या नजरा 28 वर्षीय हार्दिककडे वळल्या होत्या.
या आंदोलनात काही ठिकाणी हिंसाचारही उफाळून आला होता. एका आंदोलनातील हिंसाचारा दरम्यान एका पोलिसासह 10 जणांचा मृत्यू झाला होता. त्याशिवाय सार्वजनिक मालमत्तांचेही मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर हार्दिक पटेलविरोधात आयपीसी 124(ए), 121(ए) आणि 120 (बी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर 2016 पासून हार्दिक पटेल जामिनावर आहेत. राज्यातील भाजप सरकारनेदेखील 2015 मधील आरक्षण आंदोलनाच्याबाबतीत हार्दिक पटेल आणि इतरांविरोधात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
कुर्मी, पाटीदार आणि गुर्जर समुदायाचा समावेश ओबीसींमध्ये करावा आणि त्यांना सरकारी नोकरी देण्याच्या मागणीसाठी हार्दिक पटेल यांनी 9 सप्टेंबर 2015 मध्ये पटेल नवनिर्माण सेनेची स्थापना केली होती. त्याच वर्षी 18 ऑक्टोबर रोजी हार्दिक पटेलविरोधात राष्ट्रध्वाजाचा अपमान करण्याचा आरोप लावण्यात आला होता.
हार्दिक पटेलने काँग्रेसमध्ये येण्यापूर्वी 2017 मध्ये काँग्रेसला पाठिंबा दिला होता. या विधानसभा निवडणुकीत हार्दिक पटेलशिवाय अल्पेश ठाकोर आणि जिग्नेश मेवाणी यांच्या मदतीने काँग्रेस पूर्ण उत्साहात मैदानात उतरली होती. काँग्रेसला काही जागांवर निसटता पराभव स्वीकारावा लागला होता. विधानसभा निवडणुकीनंतर ठाकोर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचा पराभव झाला.
मार्च 2019 मध्ये अहमदाबाद येथे काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत तत्कालीन पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत हार्दिक पटेलने काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
मेहसाणा दंगल प्रकरणी जुलै 2018 मध्ये सत्र न्यायालयाने हार्दिक पटेल यांना दोषी ठरवले होते. यानंतर हार्दिकने गुजरात हायकोर्टात जाऊन शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी केली होती. मात्र हायकोर्टाने त्यांची याचिका फेटाळल्याने ते निवडणूक लढवू शकला नाही. त्यानंतर हार्दिकने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली, मात्र तेथूनही दिलासा मिळाला नाही.
जुलै 2020 मध्ये, काँग्रेसच्या अंतरीम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी हार्दिक पटेल यांची गुजरातचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. गुजरात काँग्रेसचे कार्याध्यक्ष म्हणून मला आव्हानात्मक जबाबदारी देण्यात आली आहे. यावरून हे देखील स्पष्ट होते की, पक्ष सामान्य पार्श्वभूमीतील लोकांना प्रोत्साहन देतो आणि 2022 मध्ये काँग्रेस दोन तृतीयांश बहुमताने सत्तेवर येईल, असा विश्वास त्यावेळी हार्दिक पटेल यांनी व्यक्त केला होता.
हार्दिक यांची काँग्रेसबद्दलची नाराजी आता कोणापासून लपून राहिलेली नाही. याआधीही त्यांनी काँग्रेसवर नाराजी व्यक्त केली आहे. एका निवेदनात त्यांनी असेही म्हटले होते की, काँग्रेसमध्ये त्यांची अवस्था अशी झाली आहे की, नव्या वराची नसबंदी करण्यात आली आहे. मात्र, आपण राहुल गांधी किंवा प्रियांका गांधी यांच्यावर नाराज नसून प्रदेश नेतृत्वावर नाराज असल्याचे त्यांनी सांगितले.
काँग्रेसमध्ये असताना हार्दिक यांच्यावर अनेक आरोप झाले. पाटीदार नेत्यावर राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याचा आरोप होता, त्यामुळे त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. याशिवाय त्यांचे एक सीडी स्कँडलही खूप गाजले होते. सीडी कांडात ते एका मुलीसोबत आक्षेपार्ह अवस्थेत दिसले होते. याप्रकरणी हार्दिक यांनी स्पष्टीकरण दिले होते की, मी तरुण आहे आणि हे माझे वैयक्तिक आयुष्य आहे.