Self Marriage : कुछ तो लोग कहेंगे…! हनीमून कसा करणार, मुलं कशी होणार? स्वतःशी लग्न करणाऱ्या क्षमा बिंदूला लोक विचारतायत विचित्र प्रश्न

स्वतःशीच लग्न करण्याची कल्पना मांडणाऱ्या आणि प्रचंड विरोधानंतरही ती प्रत्यक्षात उतरवणाऱ्या क्षमा बिंदूला काही लोक चित्रविचित्र प्रश्न विचारून भंडावून सोडत आहेत. तर काहीजण तिच्या या निर्णयाचं कौतुक करत आहेत.

Self Marriage
स्वतःशी लग्न करणारी क्षमा होतेय ट्रोल  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • ठरलेल्या तारखेच्या तीन दिवस आधीच क्षमानं केलं स्वतःशी लग्न
  • लोकांकडून क्षमावर चित्रविचित्र प्रश्नांचा भडिमार
  • अनेकांनी केलं नव्या संकल्पनेचं कौतुक

Self Marriage | गुजरातमधील (Gujrat) वडोदरात (Vadodara) राहणाऱ्या क्षमा बिंदूनं (Kshama Bindu) अखेर स्वतःशी लग्न (Married to Self) केलंच. थाटामाटात, वाजतगाजत आणि तिला हव्या तशा पारंपरिक थाटात हे लग्न पार पडलं. ठरलेल्या तारखेच्या तीन दिवस आधीच तिनं आपलं शुभमंगल उरकलं. समाजातून होणारा विरोध लक्षात घेता आयत्या वेळी कुठलं नवं संकट उभं राहायला नको, असा विचार करून तिने तीन दिवस आधीच लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि तो पार पाडला. 

उत्साहात पार पडलं लग्न

आपल्या लग्नात क्षमा आनंदी आणि उत्साही असल्याचं लग्नाच्या फोटोंवरून दिसून येत आहे. या लग्नाला काही राजकीय संघटनांनी विरोध केला होता. कुठल्याही मंदिरात अशा प्रकारचं लग्न होऊ देणार नाही, अशा इशारा वडोदराच्या माजी उपमहापौरांनी दिला होता. परिस्थिती तापत असल्याचं पाहून हे लग्न लावण्यासाठी येणाऱ्या भटजींनीही माघार घेतली होती. त्यामुळे ऑनलाईन मंत्र लावून हा विवाहसोहळा पार पडला. एका चांगल्याशा साउंड सिस्टिमवर लग्नाचे मंत्र लावण्यात आले आणि क्षमा स्वतःसोबतच विवाहबंधनात अडकली. स्वतःच्याच गळ्यात मंगळसूत्र घालत आणि स्वतःसोबत अग्निभोवती फेरे घेत तिनं संसारात प्रवेश केला. लग्नाच्या लाल ड्रेसमधील तिचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. तिच्या या फोटोवर युजर्सकडून चित्रविचित्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

युजर्सचे विचित्र प्रश्न

लग्न तर केलं, पण आता एकटीच सुहागरात कशी करणार, हनीमून कशी करणार असे प्रश्न तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर विचारले जाऊ लागले आहेत. काहीजण तिचे मीम्स तयार करत आहेत तर काही विचित्र प्रश्न विचारत आहेत. एकाने लिहिलंय, “तुमची पिढी कशी वाढणार?” तर दुसऱ्यानं लिहिलं आहे, “नव्या पिढीवर तुम्ही तुमच्या कृतीनं चुकीचे संस्कार करत आहात.”  तर आणखी एकजण म्हणतो, “लग्न तर केलं पण तुम्ही एकट्या सुहागरात कशी साजरी करणार, या विचारानं मन खायला उठत आहे.”

अनेकांकडून कौतुक

क्षमाच्या या निर्णयाचं स्वागत करणारेही अनेकजण आहेत. एकाने लिहिलं आहे, “हाय मेरी दुल्हनिया. तुम बहुत अच्छी लग रही हो. ढेर सारा प्यार, मेरी और मेरे अम्मा की तरफ से. वह तुम्हारे लिए बहुत खुश है.” बिंदूवर टीका करणाऱ्यांना काहीजणांनी खडे बोलही सुनावले आहेत. तिच्या आयुष्यात तिने काय करावं, हा तिचा प्रश्न आहे. तुम्हाला टीकाच करायची असेल, तर जे बलात्कार, अत्याचार करतात, त्यांच्यावर करा. बिंदूनं काहीच चुकीचं केलेलं नाही. आपल्या धर्मशास्त्रातही हेच सांगितलं आहे. जी व्यक्ती स्वतःवर प्रेम करते, तीच इतरांवर प्रेम करू शकते. यात चुकीचं काय आहे, असा सवाल त्यांनी विचारला आहे. 

क्षमा चालली हनीमूनला

आपल्या लग्नाविषयी कोण काय म्हणतंय, याचा विचार करायला क्षमाकडे मात्र अजिबात वेळ नाही. लग्नाची धावपळ संपल्यानंतर आता ती स्वतःसोबत गोव्याला हनीमूनला जाण्यासाठी सज्ज आहे. दोन आठवडे गोव्यात स्वतःसोबत घालवून ती परतणार आहे आणि आपल्या नेहमीच्या कामाला सुरुवात करणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी